या पिक्चरमधून त्याला बाहेर काढलं नसत तर तो आज बच्चन नसता !

आज बच्चनचा वाढदिवस ! पाळन्यातल नाव इन्कलाब श्रीवास्तव. पुढे तो अमिताभ बच्चन झाला. कोणी बिग बी कोणी अँग्री यंग मॅन  तर कोणी शेहनशाह म्हणून त्याला ओळखते पण आपल्यासाठी तो बच्चनचं.

भारताने बघितलेला आत्ता पर्यन्तचा सर्वात मोठा सुपरस्टार.

कोणताही फिल्मी बॅकग्राउंड नसताना त्यान आपल स्थान या इंडस्ट्री मध्ये बनवलं .आबाआज्याच्या पिढीपासुन आजकालच्या इंस्टाग्राम पब्लिकपर्यंत सगळ्यांच्या मनावर त्याचं गारुड तसचं आहे.  कोणतही यश सहजासहजी मिळत नाहीत म्हणतात. बच्चनने याचा सगळ्यात जास्त अनुभव घेतला असणार आहे.

प्रत्येक आईला आपलं पोरगं जगात सर्वात सुंदर आहे असं वाटत असत. अमिताभच्या आईला सुध्दा तसचं वाटायचं. तिच्यामुळेच तो अलाहबाद सोडून मुंबई ला आला. मात्र या इंडस्ट्रीत पाउल टाकणे एवढ सोपं नव्हत.वडीलांचा साहित्य क्षेत्रात असलेला दबदबा इथे काही कामाचा नव्हता. अंगानं बारीकराव आणि उंचीन ताडमाड असल्यामूळ त्याला हिरोम्हणून घ्यायला कोणी तयार नव्हत. ज्या पहाडासारख्या आवाजान पुढ अख्ख्या भारताला खिळवून ठेवलं त्या आवाजाला आकाशवाणीन नाकारलं होतं. मात्र सुप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक मृणाल सेननी याच आवाजाची क्षमता ओळखून त्याला आपल्या भुवनशोम या चित्रपटात निवेदक म्हणून घेतले. अशा तऱ्हेने पडद्यामागून त्याची फिल्मइंडस्ट्रीत एन्ट्री झाली.

सात हिंदुस्तानी मध्ये सात हिरोंच्या गर्दीत त्याचं रुपेरी पडद्यावर आगमन झालं. त्यानंतर आलेल्या आनंद चित्रपटाने त्याला पहिला फिल्मफेअर मिळवून दिला, त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं. नंतर आलेल्या परवानाच्या सेटवर शत्रुघ्न सिन्हाशी जिगरी दोस्ती झाली. गुड्डीच्या सेटवर जया भादुरीच्या प्रेमात पडला.  बच्चनलाही सुनील दत्तचा रेश्मा और शेरा, मेहमूदचा बॉम्बे टू गोआ अशा चित्रपटामुळे यशाची चव चाखायला मिळाली होती. मात्र त्याच्या यशामागे मेहमूद आणि शत्रुघ्न सिन्हा या दोस्तांच्या मदतीचा हात होता हे मात्र खरे.

जया तेव्हा मोठी स्टार होती. दोघांच डेटिंग सुरु होत. ती त्याला पिक्चर निवडायला मदत करायची. पण त्याकाळात त्याची इमेज एक भावूक प्रेमी, रोमांटिक हिरो अशी होती आणि पिक्चर सुद्धा तसेच मिळायचे. जया बरोबर त्याच्या दोन मुव्हीच शुटींग सुरु होत. बन्सी बिरजू आणि एक नजर. याच दरम्यान या दोघांना कुंदनकुमार या दिग्दर्शकाने आपल्या चित्रपटासाठी साईन केलं. पिक्चरच नाव होत “दुनिया का मेला”.

काही कारणास्तव जया हा पिक्चर करू शकली नाही. ती यातून बाहेर पडली आणि एन्ट्री झाली रेखाची ! नवख्या रेखाला आणि अमिताभला घेऊन कुंदनकुमारनीं अर्धा पिक्चर बनवला ही. पिक्चरचं शुटींग सुरूच होतं तेव्हा अमिताभ आणि जयाचे दोन्ही पिक्चर तिकीटखिडकीवर साफ आपटले. आता दिग्दर्शक कुंदनकुमार आणि निर्माता रोशन यांच धाब दणाणलं. एकदा फ्लॉपचा शिक्का बसल्यावर त्या हिरोचा पिक्चर कसा चालणार? तो पर्यंत बातमी येऊन धडकली कि कोणीही डिस्ट्रीब्युटर अमिताभ हिरो असेल तर पिक्चर विकत घ्यायला तयार नाही.

अखेर कुंदनकुमारनी ठरवलं अमिताभला पिक्चर मधून काढून टाकायचं.

अमिताभला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. त्याला सुद्धा निर्मात्याचं नुकसान करायचच नव्हतं. तो निमूटपणे तिथून बाहेर पडला. त्याच्या जागी तेव्हा जास्त पॉप्युलर असणाऱ्या संजय खानला घेण्यात आलं.

अमिताभच्या आयुष्यातला सर्वात खराब पिरीयड होता. त्याने मुंबई सोडायचा निर्णय घेतला होता. पण जयान त्याला रोखलं. तिला तेव्हा प्रकाश मेहरानी एका पिक्चर साठी साईन केलं होत. पिक्चरच नाव होत जंजीर! सलीम-जावेदनी याची स्क्रिप्ट लिहिली होती. आधी तो पिक्चर धर्मेंद्र करणार होता. पण नंतर राजकुमार ला विचारण्यात आलं. राजकुमारने आपल्या फटकळ स्टाईलला जागून हा पिक्चर नाकारला. कारण होतं प्रकाश मेहरा लावत असलेल्या ‘बिजनोरी तेलाचा’ वास त्याला पसंत नव्हता. मग प्रकाश मेहरा देवानंद कडे गेले. तिथे पण पिक्चर मध्ये गाणी वाढवण्याच्या मुद्द्यावर त्याचं बिनसलं.

अमिताभ मुंबई सोडू नये म्हणून जया हर तऱ्हेने प्रयत्न करत होती. तीनं आणि अमिताभनं स्वतःचेच पैसे घालून पिक्चर काढायचं ठरवलं . ऋषीकेश मुखर्जी त्याचं दिग्दर्शन करत होते. पिक्चर चा नाव होतं “अभिमान”.  जेव्हा जयाला कळालं कि जंजीरसाठी प्रकाश मेहरा नायक शोधत आहेत तेव्हा तिने अमिताभच नाव पुढ केलं. पिक्चरचे लेखक सलीम खान आणि जावेद अख्तरना अमिताभची बॉम्बे टू गोवामधली अॅक्टिंंग प्रकाश मेहराला अमिताभला घेण्यासाठी तयार केलं.

जंजीर रिलीज झाला आणि भारताला अँग्री यंग मॅन मिळाला. या पिक्चरन तिकीटखिडकीची सगळी गणितच बदलून टाकली. अमिताभची इमेज बदलली. त्याला साईन करायला अनेक निर्माते त्याच्या घराबाहेर लाईन करून उभे राहू लागले. अमिताभच्या नशिबाने त्याला योग्य वळणावर आणून ठेवले होतं. जंजीरच्या यशानंतर जया आणि अमिताभ लग्नाच्या बेडीत अडकले. त्यानंतर लगेच त्यांनी मिळून प्रोड्यूस केलेला अभिमान रिलीज झाला. अमिताभच्या अभिनयाची व्हर्साटीलिटी सर्वापर्यंत पोहचली होती.

इकडे कुंदनकुमारनी रेखाला आणि संजय खानला घेऊन तो चित्रपट पूर्ण केला. पिक्चर हिट झाला. १९८३मध्ये आलेल्या फिल्म हि फिल्म या डॉक्युमेंट्रीमध्ये अमिताभ आणि रेखा वर चित्रित झालेलं दुनिया का मेला मधलं गाणं दाखवल आहे.

जर अमिताभला या पिक्चर मधून काढल गेलं नसतं तर काय झालं असत?

वैयक्तिक आयुष्यात त्याचं आणि जयाचं नात याच संघर्षाच्या काळात घट्ट झालं. जर दुनिया का मेला मध्ये अमिताभ राहिला असता आणि रेखा नामक वादळ त्याच्या आयुष्यात आधीच आलं असतं तर काय ठाऊक जया आणि अमिताभ कदाचित वेगळ्या वाटेवर पण दिसले असते.

सगळ्यात महत्वाचं जर कुंदनकुमारनी त्याला पिक्चर मधून बाहेर काढलं नसतं तर अमिताभनं जंजीर केलाच नसता. आणि जर जंजीर केला नसता तर तो बच्चन नसता. बच्चन ही ओळख आडनावापुरतीच राहिली असती.

हे ही वाच भिडू- 

Leave A Reply

Your email address will not be published.