चप्पल चोरीला जाणाऱ्या बच्चू कडूंच्या सलग चारवेळा विजयाचा फॉर्म्युला काय ?
अमरावती जिल्ह्यातील बलोरा गाव. गावात तमाशाचा फड आलेला. बरेचजण या नादापायी बाद झालेले. काही शाळकरी मुलांनी आंदोलन करून हा तमाशाचा फड बंद पाडला. याच नेतृत्व करत होता एक नववीचा मुलगा. नाव ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ
बच्चू कडू.
अन्याय सहन करायचं नाही त्याला योग्य शब्दात उत्तर द्यायचं याची सवय लहानपणीच लागलेली. गावातल्या मुलींची छेड काढणाऱ्या गुंडांना चोप देणे वगैरे सुरु झालेलं. कब्बड्डी चांगला खेळायचा. कायम भोवताली मित्राचा गराडा असायचा.
कबड्डी खेळताना एका मित्राला रक्ताच्या उलट्या झाल्या, हृद्यविकार आहे मुंबईला न्यावं लागेल अस कळाल. पोरापोरानीच कब्बड्डी जिंकलेल्या पैशातून त्याला मुंबईला नेलं.
कधीच मुंबई पाहिली नव्हती, विदाऊट तिकीट फिरणाऱ्या या मुलांनी अखेर केईएम हॉस्पिटल शोधून काढलं. मित्राला रक्त लागणार होतं. बच्चूच वजन कमी असल्यामुळे रक्तदान करता येणार नाही अस तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं. खिशात दगड घेऊन वजनकाट्यावर उभा राहिला. मित्राला रक्त देऊन त्याचा जीव वाचवला.
गावाला परत आला ते हिरो होऊनच.
तेव्हा पासून रुग्णसेवेचा ध्यास लागला तो कमीच झाला नाही. गोरगरीब रुग्णांना मुंबईला नेणे, त्याच्या उपचाराची, औषधाची, वेळप्रसंगी ऑपरेशनच्या खर्चाची जबाबदारी बच्चू कडूनी उचलली. मुंबईत कधी कोणत्या दवाखान्यात रुग्णांना त्रास दिला गेला की आंदोलनाच हत्यार बाहेर काढलं जायचं. रुग्णसेवा हे व्रत बनलं. गावच्या लोकांसाठी बच्चू कडू हा हक्काचा माणूस झाला.
समाजकार्यात काम करता करता राजकारणाकडे ओढला गेला.
बाळासाहेबांच्या विचाराने भारावून गेलेल्या बच्चू कडूनीं राजकारणात प्रवेश केला. पंचायत समितीची निवडणूक लढवली. पंचायत समितीचे सभापतीदेखील बनले. याच काळात निकृष्ट दर्जाच्या शौचालयावरून आंदोलने केली, राज्यभर बच्चू कडू हे नाव गाजलं. दरम्यानच्या काळात शिवसेनेला रामराम करून स्वतःची प्रहार संघटना स्थापन केली.
१९९९ सालची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. डिपॉजीट भरायला सुद्धा पैसे नव्हते. गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून त्यांचं डिपॉजीट भरलं. त्या निवडणुकीत अवघ्या काहीच मतांनी त्यांचा पराजय झाला. पण बच्चू कडूचं आंदोलन थांबलं नाही. वेगवेगळी आंदोलने करून प्रश्नांकडे लक्ष वेधून घेणे त्यांचं वैशिष्ट्य होतं.
सातपुड्याजवळ बहीराम या तीर्थक्षेत्रात यात्रेच्या निमित्ताने महिनाभर तमाशाचे फड रंगायचे. त्यासोबत जुगार, नशापाणी असे अनेक उद्योग चालायचे. बच्चू कडूंच्या संघटनेने हा सगळा प्रकार बंद पाडला. तिथे लावणी महोत्सव सुरु केला. कुस्तीचे फड उभा केले. धिंगाणा बंद करून समाजप्रबोधन सुरु केले. तिथला बदल जनतेने अनुभवला.
२००४ च्या विधानसभेवेळी लोकवर्गणीतून निवडणुक लढवणारे दोन आमदार निवडून आले. राजू शेट्टी आणि बच्चू कडू.
हे दोघेही चळवळीतून आलेले दाढीवाले फाटके नेता. पण आपल्या एकाकी आवाजाने विधानसभा गाजवून सोडली. विशेषतः बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी शोले स्टाईलमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून केलेले आंदोलन गाजले. अंध अपंगांसाठीचे बैलगाडी आंदोलन डेरा आंदोलन वगैरे अनेक आंदोलने केली.
झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करायचे असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात आले होते.
त्यांना त्याच भाषेत समजवायला त्यांनी सुरवात केली. कधी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये सापच सोडला तर कधी लोकांची कामे पडली असताना ऑफिस बाहेर फिरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीचा लिलाव केला. अपंगांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणारे एकमेव नेते म्हणून राज्यभरात त्यांची ओळख बनली. आमदारांच्या वेतनवाढीविरुद्ध आवाज उठवणारे ते एकमेव नेता होते.
बच्चू कडूंच्या अभिनव आंदोलनाची चांगलीच जरब बसली. एकदा तर शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांच कान पकडून च्यावम्याव आंदोलन केले.
त्यांच्या या स्टाईलची मिडियामध्ये खूप टीका झाली. कधी कधी त्यांची वक्तव्ये सनसनाटी निर्माण करणारी ठरली. पण गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटत असेल तर मार्ग कोणता असेल याचा विचार करायचा नाही हे बच्चू कडूंच धोरण होतं आणि जनतेला तेच आवडत होतं. आपल्या आंदोलनातून सामान्य जनतेला त्रास देण्यापेक्षा स्वतःला उलटे टांगणे असे आत्मक्लेशाचे आंदोलनही केले.
एकामागोमाग एक निवडणुका येत गेल्या आणि बच्चू कडू जिंकत गेले.
त्यांची आंदोलने सुरूच राहिली. त्यांच्या सोबतच चळवळीतून राजकारणात आलेले राजू शेट्टी सत्तेच्या वळचणीच्या काही काळ नादाला लागले, कधी सत्ताधारी तर कधी विरोधी पक्षासोबत युती अशा उड्या मारल्या आणि जनतेच्या मनातून उतरले.
याच्या ठीक विरुद्ध बच्चू कडू यांनी राजकारणातील वाटचाल केली. कोणत्याही पक्षाशी युती न करता आपली एकाकी लढत चालू ठेवली, वेळप्रसंगी कायदा हातात घेतला आणि जनतेला ते आवडतच गेल. लोक त्यांच्यासाठी जीव द्यायलासुद्धा तयार होते.
कोणत्याही लाटेचा त्यांच्यावर परिणाम झाला नाही. आज ते सलग चौथ्यांदा आमदार बनले आहेत. लोक विचारतात की,
बच्चू कडूंच्या विजयाचा फॉर्म्युला काय?
यासाठी एक किस्सा सांगितला जातो.
एकदा आमदार निवासमधून बच्चू कडूंची चप्पल चोरीला गेली. एका आमदाराची चप्पल चोरीला जाते कशी यावरून चर्चा झाली. प्रसारमाध्यमांनी सुरक्षायंत्रणेवर ताशेरे ओढले. काही महिन्यांनी चप्पलेच रहस्य उघडकीस आलं. एका दिव्यांग भगिनीने त्यांच्यावरील प्रेमापोटी ते चप्पल उचलून आपल्या देवघरात नेऊन ठेवल होतं. ज्या आमदाराचं चप्पल थेट आमदार निवासातून चोरीला जात असेल तो माणूस लोकांचा असेल हे तर मान्य करावच लागतं.
अपना भिडू बच्चू कडू ही घोषणा, लोकांच निरलस प्रेम हाच बच्चू कडू यांच्या विजयाचा फॉर्म्युला आहे.
हे ही वाच भिडू.
- राजकारणाच्या राड्यात एक ऊसतोडणी कामगाराचा मुलगा आमदार झाला
- सरकारचा १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यायला लावणारा माणूस निवडणुकीत उतरलाय.
- या नेत्याने महाराष्ट्रातलं पहिलं सुशिक्षित बेकारांचं आंदोलन उभा केलं होतं.
Bachhu bhau nu 80 peksha jast vela rakt dan pan kele, tasech tyanni talukyala jaun honari kame gavat tahsildar anun kele eg. rashan card,cast crtif etc. Bachhu bhau chi shetkarya baddal asta ahe tasech garib jantecha wali, apangancha dev asi olakh ahe.
Bachhu bhau ni melghat madhe rajkumar patel, tar morshi madhe devendra bhoyar nivdun anale ahet atta sarkar vishayi tikastra anakhi majbut kartin karan tyanna 2 sathidar bhetle ahet.
आमच्या अमरावती जिल्हा मधला देव माणूस आहे
अपना भिडु बच्चु कडु
❤️
जनतेचा नेता जाणता राजा