रोजच्या जेवणातील मीठाचे हे आहेत दुष्परिणाम.

आहाराच्या सहा चवींपैकी मीठाची खारट चव ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते. मीठ हा तसा व्यवहारातही महत्वाचा विषय आहे. ‘खाल्ल्या मीठाला जागावे’, गांधीजींनी केलेला मीठाचा सत्याग्रह, सध्याचे लहान मुलांचे व इतरांचेही नमकीन खाणे या सर्व गोष्टींना मीठाचा संदर्भ येतोच.

सैंधव मीठ हे सर्वांत औषधी आहे. याला बोली भाषेत सैंधेलोण असे म्हणतात. हिंगावाष्टक चूर्ण या पाचक औषधामध्ये सैंधवाचा उपयोग केला जातो. सैंधव योग्य प्रमाणात खाल्ल्यास ते केसांना आणि डोळ्यांनाही हिताचे ठरते.

काळे मीठदेखील खारट चवीचे आणखी एक औषधी उदाहरण आहे. आपल्याला अपचन झाल्यास ओवा आणि काळे मीठ आपण खातो ते यामुळेच. भारतीय शास्त्राने सांगितलेल्या सैंधवासारख्या पदार्थाचा वापर आपल्या दैनंदिन आहारात वाढवला तर ते आपल्या आरोग्याला नक्कीच हिताचे ठरेल पण आपल्या रोजच्या वापरातील मिठाचे दुष्परिणाम अनेक आहेत. ते जाणून घेणे गरजेचे आहे.   

खारट चवीचे पदार्थ  उष्ण गुणाचे असतात. त्याचप्रमाणे ते आपली पचन शक्तीही वाढवतात. या पदार्थांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे अन्नाला आणि तोंडालाही चव आणणे. आपल्या एकूणच अन्नातून खारट पदार्थ काढून टाकले तर अन्न बेचव होते. हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे.

खारट चवीचे पदार्थ उष्ण असल्याने ते शरीरात भेदन (फोडण्याची क्रिया) करतात, व्रण वाढतात. त्यामुळे रक्त आणि पित्तासाठी ते चांगले नसतात. खारट पदार्थ शरीरात घाम निर्माण करणारे असतात. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्ती तसेच घाम जास्त येण्याचा जास्त त्रास येणार्‍या व्यक्तींनी खारट पदार्थ जपूनच खायला हवे.

खारट चवीचे पदार्थ पचनशक्ती वाढवणारे आणि रूची वाढवणारे असले तरी त्याचे आहारातले प्रमाण अत्यंत र्मयादित ठेवावे लागते. र्मयादेपेक्षा जास्त प्रमाणात खारट पदार्थ पोटात गेले तर त्याचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात. रक्तदुष्टी आणि त्यामुळे होणारे त्वचेचे विविध आजार हे खारट पदार्थांच्या अतिसेवनामुळे प्रामुख्याने निर्माण होतात. त्याचप्रमाणे त्वचेवर अकाली सुरकुत्या पडणे हे लक्षणदेखील निर्माण होते. हल्ली अनेक जणांना वयाच्या चाळिशीपूर्वीच त्वचेवर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. 

अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये मीठ, लोणचे अशा खारट पदार्थांचे प्रमाण जास्त आहे का हे तपासून बघणे आवश्यक असते. अनेकजणांच्या त्वचेवर त्वचेखालील छोट्या रक्तवाहिन्या फुटून लाल, हिरवे, निळे असे डाग आलेले दिसतात. हेदेखील खारट पदार्थांच्या अतिसेवनानेच घडते.

वातरक्त नावाचा सांध्यांचा एक विकारही याच्या अतिसेवनाने वाढतो.

यामध्ये पायाची बोटे तसेच पायाचा घोटा सुजतो. अनेकदा त्यामध्ये आग होते आणि त्याठिकाणी खूप वेदनाही होतात. याला आयुर्वेदाने वातरक्त असे म्हटले आहे रक्ताची तपासणी केल्यास या त्रासामध्ये बर्‍याचदा युरीक अँसिड वाढलेले दिसते.

खारट पदार्थ जास्त खाल्ले तर त्याचा परिणाम आपल्या केसांवरही होतो. केस लवकर पांढरे होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे खारट पदार्थांचे अतिसेवन. डोक्यावरचे केस अकाली गळणे, लवकर टक्कल पडणे, केसांची मुळे सैल होणेया तक्रारीही खारट पदार्थांच्या अतिखाण्यामुळे घडतात.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.