पोलिसांना दारू पाजून तो फरार झाला आणि आता हॉलिवूडच्या व्हिलनला लाजवेल असं आयुष्य जगतोय.

कानून के हात लंबे होते हे असं म्हणतात पण आजचा किस्सा असा आहे कि इथं कानुनलाच गुलिगत धोका एका गॅंगस्टरने दिला होता. याचा परिणाम पोलिसांना दीर्घकाळ सोसावा लागला आणि अजूनही हा गँगस्टर हाती लागला नाही. एखाद्या हॉलिवूडच्या व्हिलनसारखा तो राहतो. खरतर या गॅंगस्टरची स्टोरी एखाद्या सिनेमाला शोभेल अशी आहे, तर जाणून घेऊया हा नेमका काय मॅटर आहे.

बदन सिंह बद्दो उत्तरप्रदेशाचा हा कुख्यात डॉन. या डॉनबद्दल अनेक लोकांच्या मनात कुतूहल आहे कारण त्याच राहणीमान हे एखाद्या हॉलिवूडच्या व्हिलनसारखं रॉयल आहे. पण हा बदन सिंह बद्दोडॉन कसा झाला तर तो मेरठच्या पंजाबीपुरामध्ये राहायला होता. २५ वर्षांपूर्वी तो एक साधा ट्रक ड्रायव्हर होता. ट्रक ड्रायव्हर असताना त्याच आयुष्य एकदम निवांत सुरु होतं. 

याच काळात त्याच नाव हाणामारी आणि जीवघेणे हल्ल्यांमध्ये आलं. यानंतर तो हळूहळू वाईट संगतीला लागला आणि युपीच्या कुख्यात बदमाश असलेल्या सुशील मुंछ आणि भूपेंद्र बाफर यांच्या संपर्कात तो आला. इथूनच बदन सिंह बद्दोची एंट्री अधोविश्वात झाली आणि यानंतर तो कुख्यात गुन्हेगार बनला.

२०१७ साली गाजियाबादच्या न्यायालयात बदन सिंह बद्दोला मेरठचे वकील रवींद्र गुर्जर यांच्या हत्येच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. बदन सिंह बद्दो हा दोन वर्ष जेलात राहिला. यानंतर २०१९ मध्ये अजून एका घटनेत तो आरोपी आढळला आणि त्याला पुन्हा गाजियाबाद्च्या कोर्टात हजर करण्यात आलं. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पोलीस बदन सिंह बद्दोला घेऊन फतेहगढ जेलकडे रवाना झाले. 

त्याचवेळी अर्ध्या वाटेत असताना बदन सिंह बद्दोने पोलिसांना सांगितलं कि मेरठच्या रस्त्याने जायला पाहिजे. पोलिसांनीही त्याच म्हणणं ऐकलं आणि बदन सिंह बद्दोला घेऊन ते मेरठच्या मुकुट महल हॉटेलात पोहचले.

हॉटेलमध्ये पोलिसांचा चांगल्या पद्धतीने पाहुणचार करण्यात आला. बदन सिंह बद्दोने हॉटेल मालकाला विश्वासात घेऊन पोलिसांना भरपूर दारू पाजायला लावली. सगळेच पोलिसवाले नशेत झिंगलेले असताना रान मोकळं बघून बदन सिंह बद्दो फरार झाला.

आजवर आपण सिनेमात अनेक डॉन वैगरे पाहिले असतील पण बदन सिंह बद्दो हा रियल लाईफमधला डॉन आहे. तो लक्झरी लाईफचा शौकीन आहे. रॉयल कारभार का काय म्हणतात त्या टाईप सगळा तामझाम आहे. सुरक्षेसाठी आसपास आणि २४ तास बॉडीगार्डस आहेत. BMW गाड्या, महागडी घड्याळं आणि उंची कपडे अशा थाटामाटात बदन सिंह बद्दो राहतो. लाखांच्या किमतीत असलेके कुत्रे तो पाळतो.

बदन सिंह बद्दोचं बोलणसुद्धा शेक्सपियरपेक्षा कमी नाही, टाइम्स ऑफ इंडियाने घेतलेल्या एका मुलाखतीत बदन सिंह बद्दोला विचारण्यात आलं कि अपराध करणाऱ्या जगात तू कशाला आलास ? त्यावेळी बदन सिंह बद्दोने उत्तर दिलं होतं तेही शेक्सपिअरच्या बाजात कि

ये दुनिया एक रंगमंच है और हम सब इस मंच के कलाकार.

बदन सिंह बद्दोचे जवळचे लोक सांगतात कि तो फक्त आठवी पास आहे आणि बरीचशी इंग्रजी वाक्य त्याने पाठ करून ठेवली आहेत.

बदन सिंह बद्दोवर ३० पेक्षाही जास्त आरोप आहेत. यात हत्या, खंडणी, अवैध हत्यारांचा पुरवठा आणि साठवणूक करणे असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत. युपी पोलीस जीवाचं रान करून बदन सिंह बद्दोला धुंडाळीत आहे पण तो दरवेळी पोलिसांना गुंगारा देऊन जातो. अजूनही युपी पोलीस त्याला धुंडाळितच आहे. 

एकेकाळी साधा ट्र्क ड्रायव्हर असलेला बदन सिंह बद्दो युपीचा डॉन झाला तेही पोलिसांना दारू पाजून यावरून अनेकदा युपी पोलिसांची थट्टाही केली जाते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.