भाजपसाठी आसाममधला मुख्य शत्रू काँग्रेस नाही तर ‘हा’ माणूस आहे..

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालीये. नेहमीप्रमाणेच आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने पूर्ण जोर लावलेला दिसून येतो. विशेषतः आसाममध्ये त्यांचा प्रचार चांगलाच पेटलेला दिसून येतोय. तिथे भाजप विरुद्ध काँग्रेस आणि त्याचा सहयोगी पक्ष एआययूडीएफ अशी मुख्य लढत असल्याच चित्र सध्या दिसत आहे.

मात्र या आसाममध्ये भाजप आपला मुख्य शत्रू कॉंग्रेसला सोडून वेगळ्याच पक्षाला आव्हान देताना दिसतय. कोण आहे तो पक्ष ? काय आहेत या मागची कारणं ?

भाजपचा मुख्य निशाना एआययूडीएफ पक्षावर आहे. मागच्या काही दिवसांपूर्वीच भाजप नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनी एआययूडीएफच्या अध्यक्षावर घणाघात केला होता. ते आसामचे शत्रू असल्याच त्यांनी म्हंटल. त्यामुळे देशभर शर्मांच्या विधानाची चर्चा रंगली होती.

याच अनुषंगाने आपण जाणून घेणार आहोत एआययूडीएफच्या अध्यक्षांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल. आणि त्यांच्या वादग्रस्त विधानांबद्दल. त्याचं नाव म्हणजे

बदरुद्दीन अजमल

जमीयत उलेमा-ए-हिंद  हे भारतीय विद्वान मुस्लीमांच संघटन आहे. ज्यांची स्थापन १९१९ साली तत्कालीन मुस्लीम विद्वानांनी केली. सांगायचा मुद्दा हा की, बदरुद्दीन अजमल यांची राजकीय कारकीर्द जमीयत उलेमा-ए-हिंदच्याच मदतीने झाली होती. 

साल होत २००५. जमीयत उलेमा-ए-हिंदच्या आसाम विभागाने गुहावटीत एक मोठी रॅली आयोजित केलेली. त्यावेळी जमीयत उलेमा-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना असद मदनी यांच्यासोबत आसामचे दिग्गज नेते उपस्थित होते. जमीयत उलेमा-ए-हिंदच्या व्यासपीठावरून मौलाना असद मदनी भाषणाला सुरुवात केली. आणि मुस्लिमांच्या हक्काची मागणी करत असताना तत्कालीन सरकार पाडण्याची धमकी दिली.

विशेष म्हणजे त्यावेळी आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई व्यासपीठावरच होते. रॅलीला उपस्थित असणारे आसामचे राज्यपाल अजय सिंग आणि माजी मुख्यमंत्री प्रफुल्ल कुमार महंत यांच्यासमवेत सगळे नेते मौलाना असद मदनी याचं हे विधान पाहून आवाक झाले होते.

याच जमीयत उलेमा-ए-हिंदच्या ताकदीचा उपयोग करत मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी राजकारणाला सुरुवात केली.आसाममधील  जमीयत उलेमा-ए-हिंदची ताकद आणि आसाम राजकारणातील मुस्लिमांच महत्व ओळखून अजमल यांनी किंग मेकर होण्याच ठरवलं.

ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंटची स्थापना

आसामची मुस्लीम जनता आसामच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडते हे लक्षात घेता २००५ साली अजमल यांनी स्वताचा राजकीय पक्ष स्थापन केला. ज्याच नाव होत ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट ( एआययूडीएफ).  जेंव्हा एआययूडीएफची स्थापना झाली तेंव्हा अजमल जमीयत उलेमा-ए-हिंदच्या आसाम युनिटचे अध्यक्ष होते. आजतागायत तेच या पदावर आहेत.

पुढे आसामी, बंगाली मुस्लीमांचा नेता म्हणून अजमल यांना ओळखल जाऊ लागल. लांब दाढी, डोक्यावर टोपी, खांद्यावर आसामी गमजा, पांढरा शुभ्र पायजमा या वेशात अजमल असतात. त्यांचा  ताफा जेंव्हा रस्त्य्तावरून जात असतो, त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी हजारोंची गर्दी जमत असते.

या गर्दीत विशेषतः गरीब, मागास बंगाली मुस्लीम असल्याच दिसून येत. याच लोकांच्या बळावर अजमल यांनी आपल राजकारण फुलवलय.

धर्म गुरु म्हणून ओळख

आसाम मुस्लिमांमध्ये अजमल भयाण फेमस आहेत. एक राजकीय नेत्यासोबातच धर्म गुरु म्हणूनही त्यांना ओळखल जातय. अजमल यांच्या प्रसिद्धीच कारण म्हणजे त्यांची धार्मिक, सामाजिक, राजकीय सक्रियता. आणि वादग्रस्त विधाने. मध्यंतरीच अजमल यांनी एक खळबळजनक दावा केला होता.  एका रॅलीदरम्यान ते म्हणाले होते की,

भाजपजवळ ३५०० मशिदींची यादी आहे. आणि ते परत सत्तेत आल्यानंतर मशिदी नष्ट करणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार देखील अजमल यांनी असेच वादग्रस्त विधान करत केला आहे. ते म्हणाले होते, भाजप मुस्लीम महिलांच्या बुरख्यावर बंदी आणेल. मुस्लीम पुरुषांना दाढी ठेवण्यास परवानगी देणार नाही. डोक्यावरील टोपीला आणि माशिदेतील अजानवर बंदी आणेल.

पक्ष वाढवण्यात यश

‘भाजप सरकारच्या काळात मुस्लिमांना माणसासारखी वागणूक दिली जात नाही. त्यांना किड्यामुंग्यासारखी वागणूक दिली जाते. मुस्लिमांना भारतीय नागरिक समजले जात नाही. मुस्लिमांसोबत भेदभाव केला जात आहे’, अशा प्रकारची वादग्रस्त विधाने करण्यात अजमल माहीर आहेत.

अजमल यांच्या अशा भाषणामुळे ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात. विरोधक याचमुळे अजमल यांच्यावर टीकेची झोड उठवत असतात. अजमल यांच्यावर नेहमीच हिंदू-मुस्लीम विभाजन करण्याचा आरोप केला जातो. पण अशा विधानांमुळे त्यांना आसाममध्ये पक्ष वाढवण्यात यश आल्याच बोलल जातंय.

२००४ पर्यंत जमीयत उलेमा-ए-हिंद सोबत काम करून अजमल यांनी आसाम राजकारणातले खाचखळगे समजून घेतले होते. २००५ साली पक्षाची स्थापना केल्यानंतर लगेच २००६ साली झालेल्या आसाम विधानसभा निवडणुकीत त्यांनी रणशिंग फुंकल. आणि पहिल्याच झटक्यात १० आमदार निवडून आणले. १२६ पैकी ७३ ठिकाणी त्यांनी आपले उमेदवार उतरवले होते.

अजमल याचं आसाम राजकारणात वाढते महत्व

२००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजमल उतरले आणि संसदेत पोहोचले. सध्या ते धुबरी लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताहेत. या नंतर अजमल यांच्या विजयी रथाला कुणीही ब्रेक लावू शकले नाही. २०११ सालच्या विधानसभा निवडणुकीत अजमल यांच्या पक्षाला तब्बल १८ जागा मिळाल्या. त्यामुळे आसामच्या राजकारणात अजमल याचं महत्व वाढत गेले.

२०१४ साली मोदी लाटेमुळे भल्या भल्यांचा सुपडा साफ झाला होता. मात्र, अजमल यांच्या पक्षाने लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत लाज राखली होती. लोकसभा निवडणुकीत अजमल यांचे ११ पैकी ३ उमेदवार निवडून आले होते. तर विधानसभा निवडणुकीत तब्बल २४ आमदार निवडून आले होते. मात्र, २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत अजमल यांच्या पक्षाला १३ जागीच समाधान मानावे लागले होते.

भारतातल्या सर्वात श्रीमंत राजकारण्यांमध्ये अजमल यांना गणले जाते. २०१५-२०१६ साली रॉयल इस्लामिक स्ट्रैटजिक स्टडीज सेंटरने प्रकाशित केलेल्या जगातल्या प्रभावशाली ५०० लोकांच्या यादीमध्ये अजमल यांचा समावेश आहे.

मुस्लीम लोकसंख्या आणि आसामचे राजकारण

२०११ च्या लोकसंख्येनुसार आसाम मध्ये मुस्लिमांच्या संखेत विक्रमी वाढ झाली आहे. २००१ च्या लोकसंख्येनुसार आसाममध्ये ३०.९  टक्के मुस्लीम होते. २०११ च्या लोकसंख्येनुसार आसाममध्ये मुस्लिमांचे प्रमाण ३४.२ टक्के झाले आहे.

अजमल यांच्या यशाच गुपित आसाम मधील मुस्लीम लोकसंख्येत दडलय. आसाम भारतातल अस राज्य आहे जिथ जवळपास ३४ टक्के लोकसंख्या मुस्लिमांची आहे. त्यात बांगलादेशी मुस्लिमांचा  देखील समावेश आहे.

विधानसभा २०२१

अजमल यांचे विरोधकही मानतात की, अजमल याचं आसाम  मधील मुस्लिमांच्या मनात स्थान आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातले संकटात असणारे गरीब मागास मुस्लीम अजमल यांना मानतात. त्यामुळे अजमल यांची ग्रामीण भागावर पकड असल्याच स्पष्ट आहे.

अजमल आक्रमक आहे, मुसलमानांमध्ये फेमस आहे आणि आपल्या वाचाळ बोलण्यामुळे तो हिंदूंमध्ये कुप्रसिद्ध देखील आहे.

यापूर्वीपासून अजमल भाजपशी नेटाने लढा देत आले आहेत. होऊ घातलेल्या निवडणुकीत तर भाजप विरुद्ध अजमल असा सामना रंगला आहे. याला कारण म्हणजे भाजपची रणनीती. अजमल यांची मुस्लिमांमध्ये क्रेझ आहे. म्हणूनच भाजप हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत अजमल यांना टक्कर देताना दिसतय.

निवडणुकांमधील मतांची गणिते पाहून भाजपने कॉंग्रेसला आव्हान न देता अजमल यांना निशाण्यावर घेतलंय. बहुंताश मुस्लीम मतदार अजमल यांच्या बाजूने आहेत. म्हणून हिंदू मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजप अजमल यांना टार्गेट केल्याच बोलले जातंय. 

या सगळ्या रणधुमाळी मध्ये काँग्रेस आसाम मध्ये दुसरं स्थान तरी मिळवेल का हा प्रश्न पक्ष नेतृत्वाला पडला आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.