बद्रुद्दीन अजमल आधी वादग्रस्त विधान करतात अन् वातावरण तापल्यावर माफी मागतात

ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे अध्यक्ष आणि खासदार बद्रुद्दीन अजमल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अजमल यांनी बोलताना हिंदू धर्मातील लोकांना लग्न करण्याचा आणि मुलं जन्माला घालण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे.

अजमल म्हणाले की, 

“मुस्लिम पुरुष २०-२२ वर्षात लग्न करतात तर मुली कायद्यानुसार १८ वर्षात लग्न करतात. मात्र हिंदू लग्नापूर्वी एक, दोन किंवा तीन अवैध बायका ठेवतात. ते मुलं जन्माला घालत नाहीत, फक्त आनंद घेतात आणि पैशांची बचत करतात. यावर हिंदूंना मुसलमानांचा फॉर्म्युला वापरून स्वतःच्या मुलांचं लग्न कमी वयात केलं पाहिजे. १८-२० वर्षात मुलींचं लग्न झालं तर मग कशी भरपूर मुलं जन्माला येतात ते बघा.”

अजमल यांच्या या वादग्रस्त विधानानंतर अनेक जणांनी त्यांच्यावर टीका केलीय, भाजपने अजमल यांना औरंगजेबाचं दुसरं रूप म्हटलंय.

तर ‘कोणी कधी लग्न करावं आणि किती मुलं जन्माला घालावीत हे ज्याचं त्याने ठरवावं,’ असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलंय.

भाजप नेते गिरीराज सिंग यांनी पौराणिक दाखले देत

ते म्हणाले की,

“सनातन धर्मात सदैव प्रेमाची पूजा करण्यात आली आहे. याचंच प्रतीक असलेल्या श्रीकृष्णाला १६ हजार प्रेमिका आणि ८ पत्नी होत्या. तर आमचे पूर्वज राजा सागर यांना ६० हजार मुलं होती.”

अजमल यांच्यावर झालेल्या टीकेनंतर त्यांनी या प्रकरणावर माफी मागितली आहे.

परंतु आधी वादग्रस्त वक्तव्य करून नंतर माफी मागण्याची बद्रुद्दीन अजमल यांची ही पहिलीच वेळ नाही.

एआययूडीएफचे संस्थापक बद्रुद्दीन अजमल यापूर्वीही अनेकदा वादात सापडले आहेत. त्यांनी अनेकदा हिंदू आणि मुस्लिम धर्मांवर वादग्रस्त विधान केलंय. पत्रकारांना धमकावलं आहे आणि जेव्हा ते वातावरण तापलंय तेव्हा त्याची माफी मागितली आहे.

१) २०१२ च्या आसाम दंग्यातील वादग्रस्त वक्तव्य

२०१२ साली आसाममधील स्थानिक बोडो आणि मुसलमानांमध्ये दंगे झाले होते. या दंग्यांमध्ये दोन्ही बाजूंच्या अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. परंतु बंगाली मुस्लिमांचे नेते असलेल्या बद्रुद्दीन अजमल यांनी म्हटलं होतं की, ‘हे दंगे बोडो आणि मुसलमानांमध्ये झाले नव्हते तर बोडोंनी बंगाली मुस्लिमांवर हल्ला केला होता.’ अजमल यांच्या या वक्तव्यावर आसाममधील अनेक जणांनी टीका केली होती. 

त्यानंतर अजमल यांनी माफी मागत या विषयावर पडदा टाकला होता.

२) २०१४ मध्ये भाजपच्या विजयावर केलेल्या विधानामुळे निवडणूक आयोगाने अजमल यांना नोटीस बजावली होती.

भाजपच्या विजयावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

ते प्रचारात म्हणाले होते की.

“राज्यात भाजपची एक जरी सीट निवडून आली तर अल्लाह कुणाला माफ करणार नाही, भाजपला हरवणे हे प्रत्येक मुसलमानाचं कर्तव्य आहे.”

अजमल यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर आसामच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी आदर्श आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावली होती.

३) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी एका पत्रकाराला धमकावलं होतं.

२०१९ च्या लोकसभेचा निवडणुकीचा प्रचार करतांना एका पत्रकाराने अजमल यांना प्रश्न विचारले होते. तेव्हा अजमल यांनी पत्रकाराला धमकावलं होतं.

ते पत्रकाराला म्हणाले होते की, 

“चालला जा! मी तुझं डोकं फोडून टाकेन. माझ्या विरोधात केस कर, माझ्याकडे न्यायालय आहे, माझी माणसं आहेत, तुम्ही संपून जाल.”

या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. या टीकेनंतर माध्यमं ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, असं म्हणत त्यांनी माफी मागितली होती.

४) अजमल यांनी तीन तलाकविरोधी बिलला समर्थन करणाऱ्यांना दहशतवादी म्हटलं होतं.

२०१९ मध्ये जेव्हा ट्रिपल तलाकला बॅन करण्यासाठी विधेयक आणण्यात आलं होतं. तेव्हा मुस्लिम धर्मातील विचारवंतांनी या कायद्याचं समर्थान केलं आणि ट्रिपल तलाकच्या परंपरेचा विरोध केला होता. तेव्हा अजमल यांनी अशा लोकांवर टिका केली होती.

अजमल म्हणाले होते की,  

“मुसलमानांमध्ये जे लोक ट्रिपल तलकला चुकीचं मानतात ते सल्फी मसलकचे लोक आहेत, ते तर दहशतवादी आहेत.”

अजमल यांच्या या वक्तव्यानंतर मुस्लिम धर्मतील अनेक धर्मगुरूंनी त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. तेव्हा अजमल यांना लिखित माफी मागावी लागली होती.

५) २ पेक्षा जास्त अपत्य असलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरी न देणे मूर्खपणा आहे.

ऑक्टोबर २०१९ मध्ये आसाम सरकारने २ पेक्षा जास्त अपत्य असलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरी न देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा या निर्णयाला अजमल यांनी मूर्खपणा म्हटलं होतं.

ते म्हणाले होते की, 

“मुसलमान मुलं जन्माला घालतच राहतील, ते कोणाच्या सांगण्यावरून थांबणार नाहीत. मी स्वतः व्यक्तिगत रूपात मानतो आणि इस्लाममध्ये सुद्धा सांगण्यात आलं आहे की, जे जगात येऊ इच्छितात त्यांना कोणीच रोखू शकत नाही. मी तर म्हणतो, जास्तीत जास्त मुलं जन्माला घालायला हवीत आणि त्यांना शिक्षण द्यायला हवं.”

अजमल यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुस्लिम आणि हिंदू धर्मतील लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती. भाजप नेते गिरीराज सिंग यांनी म्हटलं होतं की, ‘बद्रुद्दीन अजमलच्या नजरेत इस्लाम भारतात मुलं जन्माला घालण्याची फॅक्ट्री आहे?’ असं म्हणून त्यांनी टीका केली होती.

त्यानंतर आपण अशा प्रकारे बोलून चूक केल्याचे त्यांनी सांगितले होते.

६) २०२१ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपवर केलेल्या टीकेमुळे काँग्रेस आघाडी अडचणीत आली होती.

२०२१ मध्ये आसाम विधानसभा निवडणुकीचा प्रचार करतांना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आणि भाजपला मुस्लिमविरोधी ठरवलं होतं.

ते म्हणाले होते की,

“भाजपजवळ ३,५०० मस्जिदींची यादी आहे, भाजप जर सत्तेत आली तर या सगळ्या मस्जिदी नष्ट होतील. ते महिलांना बुरखा घालून बाहेर जाऊ देणार नाहीत, टोपी घालू देणार नाहीत, मस्जिदीत नमाज अदा करू देणार नाहीत.”

अजमल यांच्या विधानानंतर भाजपने त्यांच्यावर मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करणे आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचा आरोप केला होता. या वक्तव्याचा काँग्रेसच्या आघाडीला फटका सुद्धा बसला होता. याप्रकारचे अनेक वादग्रस्त वक्तव्य करून बद्रुद्दीन अजमल वादग्रस्त ठरलेले आहेत. त्यामुळेच सध्याच्या ताज्या वादावर माफी मागितल्यानंतर सुद्धा वाद कमी होतांना दिसत नाही आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.