पोलिसात तक्रार, अंनिसचं आव्हान आणि दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या बागेश्वर महाराजांनी पळ काढला…
पीके पिक्चरमध्ये जसं दाखवलंय, किंवा सिंघम-२ मध्ये ज्याप्रमाणे महाराज दाखवलाय, त्याचा दरबार दाखवलाय आणि त्या दरबारात महाराज लोकांच्या समस्यांचं निवारण करताना दाखवलंय तसेच एक महाराज खऱ्या जगात सुद्धा आहेत.
त्यांचा पत्ता आहे बागेश्वर धाम, गाव गढा, पोस्ट गंज जिल्हा छतरपूर, राज्य मध्यप्रदेश.
मध्यप्रदेशातल्या छतरपूर जिल्ह्यातल्या गढा गावात हा बागेश्वर धाम भरतो. या गढा गावात हनुमान व शंकराचं जागृत देवस्थान आहे. या हनुमानाच्या मंदिरात ३०० वर्षांपूर्वी बालाजी महाराज होवून गेले. बालाजी महाराजांना दिव्यशक्ती असल्याची लोकमान्यता होती. मात्र बालाजी महाराजांच्या पश्चात इथे विशेष अस काहीच नव्हतं.
आपल्या गावात जसं एखादं साधं मंदिर असतं जिथे गावतल्या दोन चार लोकांच्या पलीकडे कोणी येत नाही असच हे मंदिर होतं. पण ते चर्चेत आलं आणि जगप्रसिद्ध झालं ते बागेश्वर धाम महाराज यांच्या दिव्य दरबारांच्या प्रसिद्धीनंतर…
आता हा दरबार नेमका काय असतो याविषयी बोलायचं झालं तर, हे बागेश्वर महाराज आपल्या आसनावर बसलेले असतात. समोर सामान्य लोक असतात. त्या सामान्य लोकांपैकी एक जण महाराजांच्या समोर येतो. तो व्यक्ती समोर येताच महाराज आपल्या हातात असणाऱ्या कागदावर लिहू लागतात. त्यानंतर तो व्यक्ती आपली माहिती, नाव, गाव व समस्या सांगतो. व्यक्तीचं सांगून होईपर्यंतच महाराज आपल्या हातातला कागद त्या व्यक्तीच्या समोर धरतात. समोरच्यानं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी महाराजांनी पूर्वीच लिहलेल्या असतात. समोरच्याने न सांगितलेली गोष्ट देखील महाराजांनी लिहलेली असते.
त्यानंतर जय सीतारामच्या घोषणा होतात आणि महाराज उपाय सांगतात. हे उपाय देखील कठोर असे नसतात. काम होईल, लाभ होईल इतकं सांगून विषय संपवला जातो. कधीकधी एखाद्याच्या अंगात भूत येतं. महाराज मग त्या भूताला प्रश्न करतात. हाताची बोटे मोडतात. मग तो माणूस अगदी सामान्य वागू लागतो. पुन्हा दरबारामध्ये जय सीतारामच्या घोषणा होतात. तर, हा असा असतो बागेश्वर महाराजांचा दरबार.
असे हे दिव्यशक्ती प्राप्त असल्याचा दावा करणारे बागेश्वर महाराज महाराष्ट्रात आले होते. नागपुरात ५ जानेवारी ते १३ जानेवारी असा महाराजांचा कार्यक्रम ठरलेला होता. ठरल्याप्रमाणे महाराज आले, महाराजांचा दरबारही भरला. दरबारात गर्दीही झाली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बागेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं.
सगळं व्यवस्थित सुरू होतं. म्हणजे मध्यप्रदेशमधून आलेल्या या बाबांची महाराष्ट्रात चर्चा व्हावी यासाठी पूरक वातावरण तयार झालं होतं. पण, १० तारखेला या महाराजांविरोधात एक तक्रार दाखल झाली. तक्रार केली जादूटोणाविरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समितीच्या सहअध्यक्ष या नात्याने श्याम मानव यांनी.
१० जानेवारी रोजी नागपुरचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांची भेट घेऊन त्यांना ७ व ८ जानेवारी भरलेल्या दरबारातले व्हिडीओज दाखवून त्या व्हिडीओजमधली दृश्ये कश्याप्रकारे गुन्हा सिद्ध होऊ शकतात हे सांगून मग तक्रार दाखल करण्यात आली होती. यात जादूटोणा विरोधी कायदा व ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज अॅक्ट चे उल्लंघन करणारे अनेक पुरावे उपलब्ध आहेत असा दावा करण्यात आलाय.
अंधश्रद्दा निर्मुलन समितीने दिव्यशक्ती सिद्ध करण्याचं आव्हानही दिलं होतं.
‘आपोआप नाव, वय, मोबाईल नंबर ओळखून दाखवा, शेजारच्या रूम मधील दहा वस्तू ओळखून दाखवा व चित्रफित केलेल्या दाव्यानुसार दिव्यशक्ती असल्याचे सिद्ध करून ३० लाख रुपयांचे पारितोषिक जिंका’
अश्या प्रकारचं आव्हान अंनिसकडून देण्यात आलंं होतं.
हे सगळं झाल्यानंतर या बागेश्वर महाराजांनी मात्र महाराष्ट्रात फार दिवस न थांबायचंच ठरवलं आणि ते त्यांच्या ठरलेल्या १४ तारखेच्या आधीच दोन दिवस महाराष्ट्रातून निघून गेले. त्यामुळे, त्यांनी महाराष्ट्रात आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात हे लक्षात आल्यामुळं काढता पाय घेतला अश्या चर्चा आहेत.
पण, आतापर्यंत खुले आमपणे दरबार भरवणारा आणि युट्यूबवर हे व्हिडीओज व्हायरल झालेला हा बाबा महाराष्ट्रातच का घाबरला? महाराष्ट्रातूनच त्याला काढता पाय का घ्यावा लागला? याचं उत्तर आहे महाराष्ट्रातला अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा
“महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३”,हा महाराष्ट्र राज्यातील एक गुन्हेगारी कायदा आहे, मुळात हा कायदा २००३ मध्ये जादूटोणाविरोधी कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांनी तयार केलेला आहे. हा कायदा जादूटोणा, नरबळी, आजार बरे करण्यासाठी काळ्या जादूचा वापर आणि अशाच प्रकारच्या अनेक कृती ज्यामुळे लोकांच्या अंधश्रद्धांचे शोषण होऊ शकेल त्यांना गुन्हेगारी अपराध ठरवितो.
११ डिसेंबर २०१३ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत हे विधेयक सादर केलं होतं १३ डिसेंबर २०१३ रोजी हे विधेयक मान्य करण्यात आलं. तेव्हापासून महाराष्ट्र राज्यात अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आहे.
आता हे बागेश्वर महाराज जर खरंच दिव्यशक्ती प्राप्त झालेले व्यक्ती असतील तर मग त्यांनी आपली दिव्यशक्ती सिद्ध का केली नाही असा प्रश्न उपस्थित होतो. अंनिसचं आव्हान न स्वीकारताच आणि तक्रार दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातून पळ काढलेल्या या महाराजांनी दिव्यशक्ती वगैरे प्राप्त नसून ते भोंदुगिरी करत असल्याचा आरोप अंनिसकडूनही होतोय आणि सर्वसामान्यांमध्येही या विषयाच्या चर्चेत असाच सूर आहे.
हे ही वाच भिडू:
- महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला सुरुवात दोघा केरळी माणसांमुळं झाली
- भीतीमुळे मंत्रालयातील केबिन नंबर ६०२ मध्ये बसायला कोणतेच मंत्री तयार नसतात…
- देवीला “बोकड” का कापला जातो