वाघा बॉर्डरवर शड्डू ठोकण्याचे माकड चाळे करणाऱ्या पाक बॉलरला भारतीय टीमने चांगलंच रडवलं.
गेल्या वर्षीची वाघा बोर्डर वरील हि गोष्ट आहे. वाघा बोर्डर म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या सीमा संपतात ते ठिकाण. आपण त्याला अट्टारी सीमा म्हणतो तर पाकिस्तानमध्ये वाघा सीमा म्हणतात.
दोन्ही देशातून हजारो नागरिक दररोज इथे सैनिकी परेड बघण्यासाठी येत असतात. अशीच एकदा पाकिस्तानची क्रिकेट टीम गद्दाफी कॅम्प मधून वाघा बोर्डरवर आली होती. तिथे रोजची परेड आणि झेंडा उतरवण्याचा रंगीत समारोह चालला होता.
तेव्हा पाकिस्तान क्रिकेट टीम मधील वेगवान गोलंदाज हसन अली आपल्या जागेवरून उठून परेड मध्ये आला. पुढे येऊन तो झिरो लाईन जवळ उभा राहिला आणि बीएसएफ जवान व भारतीय नागरीक यांच्याकडे बघून वेडेवाकडे चाळे करायला लागला.
एखादा पहिलवान शड्डू ठोकून युद्धाचे आव्हान देतो अगदी त्याच प्रकारे इशारे तो बिएसफ जवान व भारतीय नागरिक यांचाकडे बघून करत होता. परेडच्या रस्त्यावरून चालत तो समोर गेट पर्यंत गेला आणि पुन्हा इशारे करायला लागला. जणू काही तो कसला आनंदोत्सव साजरा करत होता.
पाकिस्तान कडून परेड समारोहात घुसून इशारे करणाऱ्या हसन अलीवर बिएसएफने कडवी प्रतिक्रिया देत तक्रार केली होती. कारण प्रोटोकोल नुसार या परेड समारोहात फक्त बिएसफ आणि पाकिस्तान रेंजर्स सहभागी होऊ शकतात. हसन अलीने त्या प्रोटोकोलचे उल्लंघन केले होते. याप्रकारानंतर भारतीय नेटकर्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले होते. अनेकांनी ट्रोल ट्विट टाकत कारगिल युद्धाची आठवणही करून दिली होती. तक्रार करूनही पुढे त्यावर काही कारवाई झाली नाही.
पण म्हणतात ना, केलेल्या कर्माची फळ कधी ना कधी भोगावीच लागतात. ती कधीच कुणाला सुटली नाही. मग हसन अली तरी कसा सुटणार होता. थोड उशिरा का होईना पण भारतीयांनी त्याचा बदला घेतलाच. तो कालच्या वर्ल्ड कपच्या पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये.
पावसामुळे मॅच होणार की नाही होणार करत करत एकदाची मॅच झाली. भारताने प्रथम फलंदाजी करत ५ विकेट्स देऊन ५० ओवेर्स मध्ये ३३६ धावा कुटल्या. भारताच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यातच तो हसन अली देखील होता.
होय, तोच वाघा बोर्डरवर येऊन बिएसएफ जवान आणि भारतीय नागरिकांचा अपमान करणारा.
कोहली आणि कंपनीने त्याची विशेष धुलाई केली. त्याच्या ९ ओवेर्समध्ये ८४ धावा कुटल्या. हसन अली रडकुंडीला आला होता. पाकिस्तानकडून ही वर्ल्ड कपमधील आतापर्यंतची सर्वात खराब गोलंदाजी ठरली आणि हसन अली सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज बनला.
यावर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर याने त्याला फटकारले व म्हणाला, वाघा बोर्डर वर जाऊन शड्डू ठोकून खोट राष्ट्रप्रेम दाखवायचं सोड आणि क्रिकेटच्या मैदानात आपला खेळ दाखव. यासोबतच अख्तरने पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याला देखील “बेक्कल कीपर” म्हणत खडे बोल सुनावले.
हे ही वाच भिडू.
- कालच्या भारत-पाकिस्तान वर्ल्डकप मॅचमध्ये हे ५ नवे विक्रम बनले आहेत.
- या खेळाडूंनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांकडून क्रिकेट खेळलंय!!!
- पाक अंपायरने मुद्दाम आउट दिलं पण त्यातूनही गावस्करने ब्रॅडमनचा विक्रम मोडला.
- त्यानंतर भारताला शिवीगाळ करण्याची हिंमत मिंयादादला झाली नाही.