दक्षिणेतले हे मुस्लिम सुलतान स्वतःला अभिमानाने गंगू ब्राम्हणाचे वंशज मानत

आजचा इतिहास एकमेकांच्या उरावर बसण्याचा आणि जातीपातीच्या लढाया लढण्यापुरता उरला आहे. पण खऱ्या इतिहासात काही अशा गोष्टी घडलेल्या असतात ज्यांनी जाती धर्माच्या राजकारणाला मोठा तडा दिलेला असतो.

याचंच एक उदाहरण म्हणजे बहामनी साम्राज्य.

साधारण चौदाव्या शतकातली गोष्ट. भारतावर तेव्हा मोहम्मद तुघलकाचं राज्य होतं. वेडा मोहम्मद म्हणतात तो हाच. राजधानी दिल्लीवरून दौलताबादला आणणे, त्याकाळची नोटबंदी करणे वगैरे त्याचे निर्णय आजही आठवले जातात. तर असाहा हुशार आणि थोडासा विक्षिप्त समजला जाणारा तुघलक.

तर या तुघलकाच्या दरबारात एक गंगू भटजी होते. काहीजण म्हणतात त्यांचं पूर्ण नाव गंगाधर शास्त्री वाबळे. तर हे गंगू भटजीकडे देशपांडेपद होतं. त्यांच्याकडे प्रचंड जमीन होती. या जमिनीत कसायला काही गुलाम होते. त्यातच एक गुलाम होता त्याच नाव हसन.

 काही जण म्हणतात तो इराण मधून आला होता, काही जण म्हणतात तो भारतीय होता. नक्की त्याचा ठावठिकाणा कोणालाच माहित नव्हता. हा हसन उंच तगडा होता. तो प्रचंड मेहनतीदेखील  होता. कधी त्याच्या बद्दलची तक्रार गंगू भटजींकडे जायची नाही.

एकदा शेतात काम करत असताना त्याच्या नांगराचं फाळ जमिनीत अडकलं. काही तरी दगड लागला असेल म्हणून त्याने तिथली माती उकरली तर त्या जागी एक हंडा सापडला. या हंड्यात सोन्याचे दागदागिने, मोहरा होत्या. त्यातील काही मोहरा जरी काढल्या तरी हसनचा आयुष्यभराचा खाण्यापिण्याचा प्रश्न मिटणार होता.

पण हा हसन प्रामाणिक होता. त्याने एका चादरीत तो हंडा गुंडाळला व सरळ आपल्या मालकाकडे म्हणजेच गंगू भटजींकडे आला. गंगू भटजी तो सोन्याने भरलेला हंडा बघून चकित झाले. त्यांना या हसनच्या हुशारीचं आणि स्वामीनिष्ठेचं कौतुक वाटलं. त्यांनी त्याला खुश होऊन गुलामीतून मुक्त केलं आणि थेट सुल्तानाकडे घेऊन गेले. 

तुघलक देखील खुश झाला व त्याने हसनला आपल्या दरबारात मोठ्या पदावर नोकरी दिली.

असं म्हणतात की गंगू भटजींनी हसनचा हात बघून त्याला सांगितलेलं की एक ना एक दिवस तू देखील सम्राट होणार आहेस.

हसन आपल्या मालकाचे ते शब्द आणि त्याचे उपकार कधीच विसरला नाही. त्याने स्वतःच नामकरणच हसन गंगू ब्राह्मणी असं केलं. त्याच्या पुढच्या ब्राम्हणी 

मोहम्मद तुघलकाने उत्तरेतून राजधानी दक्षिणेत आणली हा तो काळ. आपली राजधानी देशाच्या मध्यवर्ती व सुरक्षित असावी, दक्षिण भारतावर देखील आपली पकड बसावी या उद्देशाने तुघलकाने राजधानी देवगिरीला आणली खरी मात्र त्याचा दक्षणित काही फायदा झाला नाही व उत्तरेतली पकड देखील ढिल्ली झाली.

उत्तरेतले सरदार व अफगाणिस्तानचे योद्धे तुघलकाच्या साम्राज्यावर हल्ला करू लागले. त्यांचा बिमोड करायला उत्तरेत गेल्यावर दक्षिणेतले सरदार उठून बसले. एकूणच तुघलकाच्या सगळ्या योजनेचा बोजवाऱ्या उडाला होता.

दक्षिणेतल्या मुस्लिम अमीर-उमरावांनी स्वतंत्र सुभे निर्माण केले आणि तुघलक सत्तेविरुद्ध उघडउघड बंड पुकारले.

त्यांनी दौलताबादचा किल्ला ताब्यात घेतला. या बंडात प्रामुख्याने इस्माइल मख, नसिरुद्दीन आणि हसन गंगू हे उमराव आघाडीवर होते. त्यांनी सर्वसंमतीने इस्माइल मख याला दक्षिणेचा सुलतान म्हणून घोषित केले. तसेच हसन गंगू यास ‘जफरखान’ ही पदवी देण्यात आली.

या बंडाचा बीमोड करण्यासाठी स्वतः मुहम्मद बिन तुघलक दौलताबादवर चालून आला. त्याच्या फौजेपुढे इस्माइल मख आणि त्याच्या सैन्याचा निभाव लागला नाही. ते दौलताबाद सोडून पळून गेले. गुजरात आणि उत्तरेकडे बंड उद्भवल्यामुळे मुहम्मद परत गेला, तेव्हा बंडखोर उमराव पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी दौलताबाद किल्ला जिंकून घेतला.

या सर्व घडामोडींमध्ये अल्लाउद्दिन हसन गंगू उर्फ जफरखान याचे शौर्य व नेतृत्वगुण दिसून आले. त्याची सैन्यामधील वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन अमीरांनी अल्लाउद्दिन हसन गंगू याचा दौलताबाद येथे राज्याभिषेक करून त्यास सुलतानपद दिले.

त्याने अबुल मुझफ्फर अलाउद्दीन ब्राम्हणशाह उर्फ बहमनशाह हे नाव धारण केले आणि ३ ऑगस्ट १३४७ रोजी गुलबर्गा येथे बहमनी राज्याची स्थापना केली. पुढे सुमारे १८० वर्षे महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर बहमनी सत्तेचा अंमल होता.

हा अल्लाउद्दीन बहामनी चलाख होता. तो हिंदुधर्म द्वेष्टा नव्हता. त्याने दक्षिणेंतील अनेक हिंदु राजांना आपल्या पक्षास वळवले, देशमुख-देशपाडयांना इनामे दिली, अनेक मराठे, कानडी, तेलंगी जहागीरदार निर्माण केले. हसनचे राज्य हळू हळू वाढत गेले. त्याने आपल्या पूर्वीच्या धन्याला म्हणजेच गंगू ब्राह्मणाला न विसरता त्याला आपल्या दरबारी इतमामाने फडवणीस म्हणून ठेवले. त्याच्या स्मरणार्थ आपल्या नावास त्याने गंगू-ई-बहामनी असा किताब जोडला.

अल्लाउद्दीन हसन बहामनी इसवी सण १३५८ मध्ये मरण पावला त्यावेळी या विस्तार जवळ जवळ महाराष्ट्रभर झाला.त्याच्या पुढच्या पिढ्यानी देखील त्याचा आदर्श पुढे नेला.

बहामनी राजांनी बांधलेले नरनाळा व गाविलगडसारखे डोंगरी व भुईकोट किल्ले हेच त्यांचें चिरकाल राहणारे स्मारक आहे. मोठमोठया गांवांतून मशिदी असून त्यांस सरकारांतून नेमणुका करून दिलेल्या असत. प्रत्येक मशिदीत एक मुल्ला नेमलेला असे. तोच शाळाशिक्षकाचे ही काम पाही. मोठमोठया शहरांतून पाठशाळा असून त्यांना मोठाल्या नेमणुका करून दिलेल्या असत. तैलंगण प्रांतांत बहामनी राजांनी बांधलेले पुष्कळ तलाव हल्ली शाबूद आहेत.

बहामनी राजे शिया पंथाचे असल्यामुळे त्यांनी कट्टरता जपली नाही. त्याच्याही काळात हिंदू जनतेला उपद्रव झाला मात्र इतर सुल्तानशाह्याच्या मानाने तो फारच कमी होता असं मानलं जातं.

दक्षिणेतील विजयनगर साम्राज्य व बहामनी राजवटींमध्ये नेहमी युद्धे होत राहीली तरीही आश्चर्यकारकपणे दोन्ही राज्यांमधील अंतर्गत सुरक्षा, कायदा, सुव्यवस्था व प्रशासन मजबूत होते. त्यामुळे सततची युद्धखोरी असूनही दोन्ही राज्यांत आर्थिक सुबत्ता होती, व्यापार-उदीम कला व संस्कृती यांची भरभराट होत होती.

असं म्हणतात की बहामनी राजवटीने नर्मदे पलीकडचा उत्तर भारत व दक्षिणभारत यांच्यात सांस्कृतिक पूल बांधला. इथली संस्कृती उत्तरेतल्या राज्यकर्त्यांऐवढी आक्रमक नव्हती.

बहामनी राजांचा अखेरच्या काळात मात्र त्यांचे सरदार शिरजोर होत गेले. बहामनी राज्याचा कलिमुल्ला हा शेवटचा राजा इसवी सन १५३८ मध्ये मरण पावला व बहामनी वंशाचा अंत झाला. याच बहामनी साम्राज्याची पाच शकले होऊन निजामशाही. आदिलशाही, कुतुबशाही,बरीदशाही व इमाद शाही यांचा उदय झाला.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.