या मुंबईच्या गँगस्टरमुळंच दाऊदसकट सगळ्या डी कंपनीला दुबईचं बस्तान हलवावं लागलं…

दाऊद इब्राहिम कासकर उर्फ डी. आजही दाऊदचं नाव कुठं ऐकलं, पाहिलं की आपले कान टवकारतात. दाऊद हे असं गूढ आहे जे आपल्याला अजूनही उलगडलेलं नाही. तो जिवंत आहे की नाही, यावर चर्चा घडत राहतात. तो पाकिस्तानात असल्याच्या कथाही सतत सांगितल्या जातात. पण मुंबई सोडलेला दाऊद आधी सेटल झाला तो दुबईमध्ये. आता भले पाकिस्तान त्याच्यासाठी सेफहाऊस असेल, पण दाऊदचा खरा किल्ला होत तो ‘दुबई’.

दुबईमधून मुंबईतल्या घडामोडींवर वचक ठेवणं दाऊदसाठी सोपं होतं. दुबईत पैसाही खोऱ्यानं कमावता येत होता. एकेकाळी दाऊदच्या कंट्रोलमध्ये असणाऱ्या बॉलिवूडमधल्या सिताऱ्यांच्या दुबईवाऱ्या निर्धोकपणे सुरू होत्या. दाऊदनं दुबईमध्ये दुसरी डोंगरी उभी केली असती, कारण तिथं त्याच्या साम्राज्याला धक्का पोहचवणारं कुणी नव्हतं.

अर्थात सावत्याच्या खुनामुळं दुबईतलं वातावरण जरा अस्थिर झालं होतं, पण हा खून दाऊदच्याच टोळीतल्या अंतर्गत राड्यामुळं पडला होता.

तेव्हा दुबईत मॉल, मोठमोठी हॉटेल्स, टोलेजंग इमारती हे सगळं नुकतंच उभं राहत होतं, साहजिकच दाऊदला मुंबईत आहे, त्यापेक्षा मोठं साम्राज्य उभं करण्याची संधी दुबईमध्ये होती.

पण दाऊदला दुबई सोडावी लागली, तेही सगळ्या डी कंपनीसकट. याचं कारण होता, त्याचा एकेकाळचा मित्र आणि नंतर कट्टर शत्रू बनलेला

अली बाबा बुदेश.

माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार पुण्याजवळच्या बोर्डिंग स्कुलमध्ये शिक्षण घेतलेला अली बुदेश मुंबईला स्थायिक झाला. त्याची आई भारतीय होती, तर वडील अरब. मुंबईच्या विक्रोळी भागात भुरट्या चोऱ्या आणि छोटे-मोठे गुन्हे करण्यापासून अली बुदेशनं आपल्या या लाईनमधल्या करिअरला सुरुवात केली होती. पण त्याला अजून कुणी गॉडफादर मिळाला नव्हता. विक्रोळीच्या झोपडपट्टी एरियामध्येच त्याचं आयुष्य सुरू होतं.

एक दिवस मुंबईत राडा झाला आणि पोलिसांनी दाऊदच्या काही माणसांचा पाठलाग सुरू केला. पोलिसांपासून पळता पळता ही पोरं विक्रोळीत घुसली, पण त्यांना लपायला जागा मिळेना. तेव्हा त्यांच्या मदतीला धाऊन आला अली बुदेश.

या मदतीच्या बदल्यात बुदेशला एक छोटंसं गिफ्ट मिळालं, त्याला दुबईला जाऊन दाऊदला भेटता आलं. इथून सुरू झाला अली बुदेशचा टॉपचा भाई बनण्याचा प्रवास.

असं सांगतात की, दाऊदनंच अली बुदेशला क्राईमच्या लाईनीत मोठं व्हायला मदत केली. अली बुदेश मग बिल्डर्स, फिल्म प्रोड्युसर्स, हॉटेल मालक यांच्याकडून खंडणी वसूल करु लागला. सुरुवातीला तो दाऊदसाठीच काम करायचा, मग हळूहळू त्याचंही या लाईनीतलं वजन वाढू लागलं. जसा त्याच्याकडे येणारा पैसा आणि त्याची दहशत वाढू लागली, तसा तो पोलिसांच्याही रडारवर आला. साहजिकच मुंबई सोडणं गरजेचं होतं.

मुंबईच्या इतर डॉन लोकांप्रमाणं त्यानंही कल्टी मारली, पण दुबईला न जाता त्यानं निवडलं बहारीन.

आता अली बुदेश बहारीनमध्ये बसून मुंबईतली सूत्रं हलवू लागला. त्याच्या दहशतीचं एक उदाहरण द्यायचं झालं, तर रेडीफच्या वृत्तानुसार साकीनाकामध्ये कॉपर चिमणी नावाच्या हॉटेल बाहेर एका वेटरचा मर्डर झाला. हा मर्डर केलेला बुदेशच्या माणसांनी. झालं असं होतं की, या हॉटेलच्या मालकाकडून बुदेशनं ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र या हॉटेलचा मालक खंडणी द्यायला टाळाटाळ करत होता. बुदेशचे फोन न उचलता हा गडी सुरतला गेला आणि बुदेशनं चिडून त्याच्या शूटर्सला सांगितलं की, ‘हॉटेलमध्ये जो दिसेल त्याला उडवा.’

या वेटरनं हॉटेलबाहेर फिरणाऱ्या शूटर्सला हटकलं आणि त्यांनी त्याचाच गेम करत बुदेशचं काम फत्ते केलं.

पण बुदेशनं आपली खरी दहशत पसरवली, ती राकेश रोशनवर झालेल्या गोळीबारामुळं. ‘कहो ना प्यार है’ नुकताच हिट झाला होता. राकेश रोशन त्यामुळं गब्बर बनला होता. बुदेशनं या पिक्चरच्या प्रॉफिटमधून शेअर मागितला, राकेश रोशनला थेट धमकी दिली. राकेश रोशन गेला पोलिसांमध्ये. चिडलेल्या बुदेशनं थेट त्याच्या घरी माणसं पाठवली आणि राकेश रोशनवर गोळीबार झाला, यात त्याच्या हातात गोळ्या घुसल्या, पण सुदैवानं तो बचावला.

दाऊद आणि बुदेशचे संबंधही चांगले होते, पण मॅटर तापला तो एका बिल्डरकडे मागितलेल्या खंडणीमुळं.

नटवरलाल देसाई नावाच्या बिल्डरकडे बुदेशनं खंडणी मागितली. आता हा बिल्डर दाऊदच्या जवळचा होता, त्यामुळं दाऊदनं मध्यस्थी केली. यावरुन या बुदेश आणि दाऊद या दोघांमध्ये भांडणं झाली. त्यात देसाईचा मर्डर झाला आणि दाऊद खवळला.

इथं फिरला गेम

दाऊदनं बुदेशला मारुन टाकण्याची धमकी दिली, बुदेशही गप्प बसला नाही. त्यानंही दाऊदला उलटी धमकी दिली. पण त्याला दाऊदपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. बुदेशनं एक सोपा प्लॅन आखला, त्यानं आधीच दाऊदच्या विरोधात असलेल्या लोकांची एक टोळी बनवायला घेतली. सुभाष सिंग ठाकूर या गुंडासोबत त्यानं दोस्ती केली. या दोघांनी मग दाऊदच्या माणसांना मारायला सुरुवात केली. पण माणसाच्या बदल्यात माणूस मारणं हे बुदेशच्या टोळीलाच नुकसान पोहोचवणारं होतं.

त्यामुळं त्यानं एक वेगळा पॅटर्न वापरला. दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम बहारीन एअरपोर्टवर पोलिसांना सापडला, त्याची टीप दिली होती अर्थात अली बुदेशनं. त्यानं मग हीच स्कीम वापरली दुबईतल्या दाऊदच्या माणसांची टीप पोलिसांना द्यायची. अनीस इब्राहिमला सोडण्यासाठी दाऊदला ५० लाख रुपये द्यावे लागले होते.

गुलशन कुमारच्या केसमध्ये रडारवर असलेल्या अबू सालेमची टीपही बुदेशनंच दिली होती. छोटा शकील, नूरा इब्राहिम या दाऊदच्या जवळच्या माणसांनाही बुदेशच्या या पॅटर्नमुळेच दुबई सोडावी लागली. दाऊदनं बुदेशचा गेम करायचे प्रयत्न केले खरे पण त्याला यश आलं नाही.

बुदेशनं आपलं डोकं आणि ताकद या दोन्ही गोष्टी वापरत दाऊदला दुबईत धोका निर्माण केला आणि अखेर दुबईतलं साम्राज्य सोडून दाऊदनं पाकिस्तान गाठलं. अली बुदेश एक लढाई जिंकला.

दाऊदनं अगदी २०२१ पर्यंत बुदेशला मारायचे प्रयत्न केले, मुंबईवरुन जान मोहम्मद नावाच्या किलरला बहारीनला पाठवल्याच्या बातम्याही आल्या होत्या. पण बुदेशला मारण्यात त्याला यश आलं नाही, एप्रिल २०२२ मध्ये बुदेश आजारपणानं मेला. दाऊदची ही हार मानली गेली.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.