बाहुबलीच्या देवसेनेचे वॉलपेपर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात देखील फेमस आहेत…

बाहुबलीची क्रेझ ही काय फक्त तमिळनाडू किंवा साऊथ पट्ट्यातच गाजली असं नव्हतं तर सगळ्या जगभरातून प्रचंड प्रेम आणि पैसा या सिनेमाला मिळाला होता. यातली भव्यदिव्यता आणि अभिनयाचं भरपूर कौतुक झालं होतं. यात कटप्पा आणि बाहुबली यांच्याशिवाय सगळ्यात जास्त गाजलेली केमिस्ट्री म्हणजे देवसेना आणि बाहुबली यांची.

त्या सिनेमांमध्ये देवसेनाचा रोल केला होता साऊथ सिनेमातली सौंदर्यवती अनुष्का शेट्टीने. साऊथचं काय घेऊन बसला बाहुबली मुळे अनुष्का शेट्टीच्या स्टारडममध्ये भरपूर वाढ झाली होती. पण सिनेमांमध्ये येण्याअगोदर अनुष्का शेट्टी साऊथमध्ये प्रसिद्ध योगा प्रशिक्षिका होती हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल तर त्याबद्दल जाणून घेऊया.

अनुष्का शेट्टीचा जन्म 7 नोव्हेंबर 1981 साली कर्नाटकमध्ये झाला. महाविद्यालयीन शिक्षण कॉम्प्युटर अप्लिकेशन मध्ये डिग्री मिळवली. शिक्षण वैगरे पूर्ण झाल्यावर अनुष्का शेट्टी योगाकडे वळली. फिटनेसची आवड असल्याने योगा प्रशिक्षक म्हणून ती लोकांना योगाचं शिक्षण देऊ लागली, क्लास घेऊ लागली. योगाची शिक्षिका असतानाच अनुष्का शेट्टी सतत काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात होती. नवीन काय करता येईल, ज्यात आपल्याला रमता येईल अशा सगळ्या गोष्टींचा शोध सुरू होता.

जसा जसा काळ बदलत गेला तसा तसा आपला योगाचा जॉब अनुष्का शेट्टीपासून दुरावला जाऊ लागला. मॉडेलिंगची सुरवात झाली आणि तिथून संधी मिळत गेल्या. सिनेमांमध्ये 2005 साली अनुष्का शेट्टीला ब्रेक मिळाला. 2005 साली आलेल्या विक्रमाकुड्डू या सिनेमातून अनुष्का शेट्टीचं पदार्पण झालं. या सिनेमात रवी तेजा मुख्य भूमिकेत होता. तेलुगू मध्ये आलेला सुपर हा अनुष्का शेट्टीला ऑल टाइम हिट करून गेला. बाहुबलीने तर कहरचं केला आणि देवसेना अगदी परदेशातसुद्धा गाजली.

अनुष्का शेट्टीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले त्यात साईझ झिरो, बिल्ला, अरुंधती, सिंगम, भागमती, रुद्रमादेवी, लिंगा, डॉन नं वन, रगडा यांचा समावेश होतो.

साऊथच्या टॉप हिरोईनचा ज्यावेळी उल्लेख केला जातो तेव्हा अनुष्का शेट्टीचं नाव वरच्या रांगेत असतं. अनेक फिल्म्ससाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. साऊथमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून सुद्धा अनुष्का शेट्टीचा जलवा आहे. एका सिनेमासाठी अनुष्का शेट्टी जवळपास 3 कोटी रुपये घेते. महाराष्ट्राच्या खेडोपाड्यांमध्ये मोबाईलवर सगळ्यात जास्त अनुष्का शेट्टीचे फोटो असायचे. अनुष्का शेट्टीचे हिंदी डब सिनेमे खेडेगावात भरपूर चालतात म्हणून अनुष्का शेट्टीचे भारतभर फॅन्स आहेत.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.