पटणार नाय पण आजही भारतातनं सगळ्यात जास्त एक्स्पोर्ट होणारी बाईक बजाज बॉक्सर आहे
नव्वदचं दशक म्हणजे थोडासा कन्फ्यूजनचा काळ. मनमोहन सिंगरावांनी ग्लोबलायजेशन काय स्वीकारलं देशाचं चित्र ब्लॅक अँड व्हाईटचं रंगीत झालं. खेड्यापाड्यात केबल टीव्ही नाचू लागला. कोकाकोला पेप्सी गावातल्या भजीवाल्या हाटेलातही मिळू लागले.
सगळ्यात जास्त जाणवणारा बदल म्हणजे सायकली वापरायचं प्रमाण अचानक कमी झालं. जुन्या स्कुटर, फटफटी, राजदूत वगैरेच दिसेनाशी होऊन तिथं हिरो होंडा, बजाज, यामाहा, सुझुकीच्या गाड्या दौडू लागल्या.
गाड्यांची नावे देखील इंग्लिश होती. यामाहा RX100, हिरो होंडा स्प्लेंडर, पॅशन, टीव्हीएस व्हिक्टर वगैरे गाड्या चमकत होत्या. यात हमारा बजाजची एक गाडी होती ती गावखेड्यात फुलस्पीडमध्ये होती.
नाव होतं बजाज बॉक्सर.
झालं असं होतं की नव्वदच्या दशकाच्या आधी बजाज भारतीय रस्त्यावर राज्य करत होती. त्यांची स्कुटर, एम-८० या गाड्या अगदी कसल्याही रस्त्यावर तग धरायच्या. पुढच्या काळात मात्र परदेशी गाड्या भारतात आल्यावर त्यांचा खप कमी झाला होता. यावर उपाय शोधण्यासाठी पुण्यात बजाजच मॅनेजमेंट डोकं धरून बसलं होतं.
राहुल बजाज यांचे चिरंजीव राजीव बजाज यांचं नेतृत्व नव्याने उभं राहात होतं. पुण्याच्या सीओईपीमधून मेकॅनिकल इंजिनीरिंग केलेले व इंग्लंडला जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले राजीव बजाज म्हणजे नव्या उत्साहाचा आणि नव्या दमाचा गडी. त्यांनी कंपनीत अगदी शेवटच्या पायरीपासून सुरवात केली होती. त्यांच्या डोक्यात नवनव्या कल्पना सुचायच्या.
यातूनच त्यांनी वडिलांना उपाय सुचवला परदेशी कंपनीबरोबर जॉईंट व्हेंचर करायचा.
बजाजने १९९७ साली जपानच्या कावासाकी बरोबर करार केला. हिरो होंडाच्या स्प्लेंडरला फाईट द्यायची म्हणून १०० सीसीची हलकी आणि चांगलं ऍव्हरेज देणारी गाडी लॉन्च करण्यात आली. हीच ती बजाज कावासाकी बॉक्सर.
बजाज बॉक्सर हा राजीव बजाज यांचा स्वतःचा असा म्हणवला जाणारा पहिला प्रोजेक्ट. सुरवातीला या गाडीवरून वडील आणि मुलाच्यात प्रचंड भांडणे झाली होती. राजीव बजाज स्प्लेंडरपेक्षाही आपल्या गाडीची किंमत ८ हजारने कमी ठेवा असं म्हणत होते. मात्र यात प्रत्येक गाडीमागे कंपनीला बाराशे रुपयांचा तोटा होत होता. राहुल बजाज याला तयार नव्हते.
पण अखेर त्यांच्याच कंपनीमधील आर.ए.जैन या ४० वर्षे जुन्या व विश्वासू सहकाऱ्याने राजीव यांना पाठिंबा दिल्यावर राहुल बजाज नाखुशीने का होईना पण राजी झाले.
कावासाकी बजाज बॉक्सर या नावाने गाडी मार्केटमध्ये उतरली. त्या रेंजमधल्या बाकीच्या गाड्यांपेक्षा कमी किंमत, कमी मेंटेनन्स, सर्वात महत्वाचं म्हणजे जबरदस्त मायलेज यामुळे बॉक्सरने काही दिवसातच आपलं बस्तान बसवलं. बजाजच्या नावातच विश्वास होता. भारतीय मार्केट काही काळासाठी त्यांच्यापासून दूर गेले असले तरी बॉक्सरने त्याला परत खेचून आणले.
स्कुटर बनवणारी बजाज मोटरसायकल सुद्धा बनवू शकते याचा लोकांना विश्वास मिळाला.
बॉक्सरच्या जाहिराती देखील खास विचार करून बनवण्यात आल्या होत्या. ग्रामीण भाग त्यांचा टार्गेट होता. खेडोपाडी शेताच्या बांधावर बॉक्सर पळू लागली. उसाचा बिंडा आणण्यापासून ते दुधवाल्या गवळ्यांच्या किटल्या उचलण्यापर्यंत प्रत्येक कष्टकरी वर्ग बॉक्सरचा पाठीराखा झाला होता.
बॉक्सरने राजीव बजाज यांचे नेतृत्व रुजवलं. या यशानंतर त्यांनी एका पाठोपाठ एक नव्या गाड्या लॉन्च केल्या. यातली पल्सर विशेष गाजली. प्लॅटिना डिस्कव्हर वगैरेंच्या माध्यमातून बजाज आजही मार्केटमध्ये नाव राखून आहे. फक्त भारतातच नाही पण परदेशातही या गाड्या पोहचल्या आहेत.
पुढे काळाच्या ओघात नव्या गाड्यांच्या स्पर्धेत बॉक्सर मागे पडत गेली. कावासाकी बरोबरचं त्यांचं टायअप देखील संपुष्टात आलं. बजाजने तिला सिटी १०० बनवलं. पुढे बॉक्सर हे नाव काळाच्या ओघात विस्मृतीत गेलं.
आत्ता पर्यंत राजीव बजाज आता बजाज उद्योगसमूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर बनले होते. त्यांनी आपलं पहिलं प्रेम बॉक्सर नव्या रूपात लॉन्च करायचं ठरवलं. यावेळी १०० सीसी च्या ऐवजी १५० सीसी ची बॉक्सर बनवण्यात आली. पण यावेळी ही गाडी चालली नाही. भारतातल्या कस्टमरना बॉक्सरची किंमत जास्त वाटली, पुढे काही दिवसांनी तीला मार्केटमधून डिसकंटिन्यू करण्यात आलं.
तुम्ही म्हणाल विषय संपला. आता काय ?
तर गडयांनो विषय असा सहजासहजी संपत नाही. राजीव बजाज म्हणजे असा सहजासहजी हार मानणारा माणूस नाही. त्याने इंटरनॅशनल मार्केटमध्ये ही गाडी उतरवली. ते वर्ष होतं २०१६-१७. आज साल चालू आहे २०२०. श्वास रोखून आकडा ऐका.
मागच्या वर्षभरात बॉक्सरच्या १० लाख गाड्या एक्स्पोर्ट झाल्यात. अगदी स्पेसिफिक सांगायचं झालं तर १०,९३,४५१. हा भारतातला आजवरचा विक्रम आहे.
आपल्या देशात आजपर्यंत अनेक पॉप्युलर गाड्या बनल्यात. त्यांना मार्केटमध्ये चांगलं नाव देखील मिळालंय. खुद्द बजाजच्या चेतक सारख्या गाड्या व्हिंटेज समजल्या जातात. पण जगाच्या मार्केट ठसा उमटवणारी बॉक्सर ही पहिलीच गाडी आहे.
विशेषतः आफ्रिकन देशात बॉक्सरला तुफान मागणी आहे. नायजेरियासारख्या देशात गेला तर तिथल्या ग्रामीण भागात आजही शेतकरी या दणकट बॉक्सरवर फिरताना दिसतील.आफ्रिकाच नाही तर मेक्सिको, लॅटिन अमेरिका,फिलिपिन्स इथे बजाज बॉक्सर निर्यात होते. क्वालिटी आणि रिलायबलिटीमुळे बुलंद भारत की बुलंद तस्वीर हमारा बजाज आता जगभऱ ओळखला जाऊ लागलाय.
हे ही वाच भिडू.
- उद्यापासून बापाचा घोडा चार्जिंग वर पळणार. बजाज चेतक परत आली आहे.
- बजाजची पोरं स्वतःचा गाड्यांचा कारखाना असूनही कॉलेजला बसने जातात?
- बजाज चेतक बाप असेल तर लॅम्ब्रेटा आज्जा होती आज्जा !
- पुणेकरांनी नाद केला. लुनाला थेट डेक्कन क्वीन बरोबर रेससाठी उतरवलं!