एम-८० जेव्हा लॉन्च झाली तेव्हा पहिल्याच दिवशी तब्बल १२ लाख गाड्या बुक झाल्या होत्या

बजाज म्हणजे थेट गांधीजींचा आशीर्वाद असणारी फॅमिली.  जमनालाल बजाज यांना तर म्हणे गांधीजी आपला पाचवा मुलगा मानायचे. गांधीवादी मुल्यांना जपत त्यांनी भारतात ऑटो इंडस्ट्री आणली आणि रुजवली.

मूळचे वर्ध्याचे असणाऱ्या बजाज यांनी कर्मभूमी मानलं पुण्याला. याच पुण्यात त्यांनी बनवलेली स्कुटर संपूर्ण भारतात गाजली. असं म्हणतात की बजाज चेतकच्या बुकिंग साठी पाच पाच वर्ष वेटिंग असायचं. लोक मुलीच्या लग्नात स्कुटर हुंडा म्हणून द्यायचे. 

स्कुटर ही नोकरदार मिडल क्लास लोकांची ओळख होती. बँका, सरकारी ऑफिस येथे काम करणारे कारकून स्कुटर वापरायचे. आता बजाज यांचं पुढचं टार्गेट होतं ग्रामीण भाग.

तस म्हटलं तर स्कुटर ग्रामीण भागात देखील होती मात्र तिचा तोंडवळा शहरी  होता. खेड्यातल्या खाचखळग्याच्या रस्त्यात छोट्या टायरीची स्कुटर खूप उपयोगाला पडायची नाही. गावाकडे काही जणांकडे बुलेट, येझदी सारख्या गाड्या होत्या. काहीजणांकडे राजदूत देखील असायची मात्र या सगळ्या बाईक.

स्कुटरच्या पलीकडे बजाज ऑटोला वाढवल तर ग्रामीण भारताचं मोठं मार्केट आपल्यासाठी खुलं होईल हे राहुल बजाज यांनी ओळखलं होतं. 

राहुल बजाज म्हणजे जमनालाल बजाज यांचे नातू. हॉवर्ड सारख्या जगातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठात शिकून आलेल्या राहुल यांनी बजाजला आधुनिक बनवलं. इटलीच्या प्याजीओ बरोबर करार करून भारतात चेतक स्कुटरची निर्मिती हि त्यांचीच आयडिया होती. पण आता इटलीच्या कंपनीने बजाज सोबतच करार संपवला होता, नवनवीन युरोपियन आणि जापनीज कंपन्या भारतात प्रवेश करत होत्या.

ऐंशीच्या दशकाच्या सुरवातीचा हा काळ. वाढत्या स्पर्धेला सामोरे जायचे झाले तर ग्रामीण भागातील रस्त्यांवर टिकेल अशी हलक्या वजनाची आणि चांगल्या ऍव्हरेजची गाडी बनवायची असा चंग राहुल बजाज यांनी बांधला.

आजवर बजाजने ज्या गाड्या बनवल्या होत्या त्या कोणत्या ना कोणत्या परदेशी गाड्यांवर आधारित होत्या पण नवीन गाडी पूर्णपणे बजाजच्या आकुर्डी प्लांटवर बनवण्यात आली होती.

या गाडीला नाव देण्यात आले. एम-५०

ते वर्ष होतं १९८१. टोमॅटो सारख्या लाल रंगाची ही गाडी स्कुटर आणि बाईकचा मधला टप्पा होती. तिचे गियर स्कुटर प्रमाणे हातात होते. पेट्रोलची टाकी सीट खाली होती. पण तिचे टायर बाईक प्रमाणे मोठे होते. दिसायला एम-५० देखणी होती. ती हलकी होती, सुटसुटीत होती, एव्हरेज जबरदस्त होतं. खेडोपाडी कसलाही रस्ता असुदे एम-५० ची सवारी अगदी टेचात चालायची. आणि विशेष म्हणजे तिची किंमत देखील सर्वसामान्यांच्या आवाक्यात होती.

फक्त बजाजचीच नाही तर संपूर्ण भारतातली ही पहिली अस्सल भारतीय बाईक असं म्हटलं जातं. 

चेतक प्रमाणे स्कुटरवर देखील लोकांच्या उद्या पडल्या. थोड्याच दिवसात हि गाडी गाजली. तिच्या बुकिंग साठी देखील रांगा लागू लागल्या. सोडती निघू लागल्या. पाच पाच वर्षे बुकिंग हे या नव्या गाडीसाठी देखील खरं ठरलं.

राहुल बजाज मात्र पूर्णपणे समाधानी नव्हते. त्यांनी या गाडीला परिपूर्ण बनवण्याचा चंगच बांधला होता. आपल्या आर अँड डी टीमला त्यांनी कमला लावलं. गावोगावी फिरून त्यांनी लोकांच्या नवीन गाडीबद्दल समस्या नेमक्या काय आहेत याची माहिती गोळा केली, त्यानुसार त्यात बदल देखील केले.

१९८६ साली या गाडीचे पुढचे व्हर्जन आले,

बजाज एम-८०

राहुल बजाज सांगतात,

एम-८० जेव्हा लॉन्च झाली तेव्हा पहिल्याच दिवशी तब्बल १२ लाख गाड्या बुक झाल्या होत्या. ठिकठिकाणी बुकिंग साठी रांगा लागलेल्या. उदयपूर सारख्या शहरात दंगल होऊ नये म्हणून पोलीस दल तैनात करावं लागलं.

साहजिकच तेवढया गाड्या बजाज कडे नव्हत्या मात्र हे बुकिंग पुढच्या अनेक वर्षांसाठी झालेलं.कितीही वाट बघू पण एम-८०च घेऊ असं लोकांनी ठरवलेलं. भारतात एक तर स्कुटर घेत होते नाही तर एम -८०, दुसऱ्या कंपन्यांकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. बजाज स्कुटरचा स्पर्धक बजाज एम-८० हे दृश्य तेव्हा दिसत होत आणि यामागे राहुल बजाज यांचं व्यापारी डोकं होतं.

त्यांनी टार्गेट केलेलं त्याप्रमाणे एम-८० ग्रामीण भागात तुफान गाजली.

२० रुपयांचं पेट्रोल टाकलं की महिनाभर घुमतंय असं तिच्या बद्दल बोललं जायचं.

पाठीमागचं सीट काढून तिथे जनावराच्या वैरणाचा बिंडा घेऊन येणारे शेतकरी आपण अनेकदा पाहिले असतील. सकाळी दूध टाकायला येणाऱ्या गवळ्यांपासून ते नुकताच नोकरीला लागलेल्या शाळा मास्तर पर्यंत प्रत्येकाच्या बुडाखाली लाल एम-८० च दिसत होती. गॅस सिलिंडरवाल्यांचा तर हक्कच होता या गाडीवर.

एम-८० शेतकरी कामगार वर्गाची हक्काची गाडी होती. बजाजने तिला भारताबाहेर देखील एक्स्पोर्ट केलं होतं. 

१९९० सालानंतर डॉ.मनमोहन सिंग यांनी जागतिकीकरण आणलं. परदेशी ब्रॅण्डसाठी भारतीय मार्केट खुलं झालं. अनेक परदेशी गाड्या भारतीय रस्त्यांवर धावू लागल्या. सायकल वाली हिरोने होंडा सोबत करार करून हिरो होंडा बनली होती. त्यांनी तर आपल्या बाईकने सगळा भारत हलवून सोडला.

मात्र किती जरी झालं तरी एम -८० च्या खपावर याचा परिणाम झाला नाही. तब्बल १५ वर्षे ग्रामीण भारताच्या रस्त्यावर बजाज ही गाडी बुलंद भारत कि बुलंद तस्वीर म्हणून गाजत राहिली. त्यानंतर मात्र हळूहळू त्याची क्रेझ कमीकमी होऊ लागली. नव्या सहस्त्रकात प्रवेश केल्यावर साध्यासुध्या गाड्यांपेक्षा झगमगीत गाड्यांकडे लोकांचा ओढा होता.

मध्यंतरी बजाजने एम-८० मेजर आणण्याचा प्रयत्न केला मात्र तो खूप चालला नाही. राहुल बजाज यांची पुढची पिढी म्हणजेच राजीव बजाज यांनी कंपनीचा करभार हातात घेतल्यावर एम-८० च प्रोडक्शन बंद केलं.

आजही अनेक ठिकाणी हि गाडी आपल्याला रस्त्यावर दिसते. तितक्याच कणखरपणे आणि दमदारपणे ती रस्त्यावर धावत असते, शेतकऱ्याच्या बांधावरून वैरण आणत असते. कित्येकांनी ही गाडी फक्त वाड वडिलांची आठवण म्हणून जपून ठेवली आहे. बाकी काही का असेना आपल्या लहानपणीच्या नॉस्टॅलजियाचा शेवटचा दुवा म्हणून एम-८० घराच्या दारात  उभी असलेली दिसते.

बाकी काही का असेना आज पेट्रोल लिटरमागे शंभरच्या घरात पोहचलंय तेव्हा वीस रुपयात महिनाभर पळणाऱ्या या गाडीची आठवण येते हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

 

 

2 Comments
  1. Mohsin says

    Relounch m80 for mileage

  2. Bajirao Patil says

    M 80मार्केट मध्ये लवकर आणा शेतकऱ्यांना खूप उपयोगी आहे ही गाडी लवकर मार्केट मध्ये आणा

Leave A Reply

Your email address will not be published.