बजाज म्हणाले, स्टेडियम बांधण्या ऐवजी ते पैसे पिंपरीत रस्त्यासाठी वापरा

परखडपणा,स्पष्टवक्तेपणा आणि स्वतंत्रपणे विचार करण्याची कुवत असलेला माणूस म्हणजे राहुल कुमार बजाज. काम छोटं असो किंवा मोठं ते तितकाच इंटरेस्ट घेऊन करायचं हे त्यांचं तत्व. मिळमिळीत बोलण्याची तर त्यांना सवयच नाही मग ते भरसभेत असो किंवा वैयक्तिक चर्चेत, त्यामुळेच ते कोणासोबत सुद्धा लवकर मिक्स व्हायचे.

अश्या या राहुल कुमार बजाज यांचा जन्म जमनालाल बजाज या देशभक्त उद्योगपतींच्या घराण्यातला. स्वातंत्र्याआधीच्या या काळात त्यांचं संपूर्ण घराणं  महात्मा गांधींच्या सहवासात वाढलेलं.  त्यामुळेचं बजाज घराणं जरी व्यापारात आणि उद्योगात होते,  पैशावाले होते पण त्यांची राहणी साधी होती. म्हणजे पार भपकेबाज राहणं, कपड्यांचा आणि श्रीमंतीचा शौक करणं त्यांना कधीच पटलं नाही. 

पुढे, स्वातंत्र्यानंतर बजाज मंडळींनी व्यापार सोडून उद्योगात शिरकाव केला आणि आर्यन हिंदुस्तान शुगर बजाज इलेक्ट्रॉनिक्स बजाज ऑटो कंपन्या काढल्या आणि यशस्वीपणे वाढवल्या.

दरम्यान, राहुल बजाज यांची एक वेगळी ओळख म्हणजे इतरांपेक्षा वेगळी भूमिका घेऊन आपला मुद्दा ठासून मांडणं, आग्रहानं मांडणं.

एवढंच नाही तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सुद्धा म्हणतात कि,

राहुल बजाज बोलले आणि त्यांनी काही  वाद-विवाद उपस्थित केला नाही असं कधी व्हायचचं नाही.  राहुल बजाज म्हणजे वेगळी भूमिका नवा वादविवाद असे समीकरण झाले आहे.

राहुल यांच्या ठाम भूमिकेचा एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो, ते १९७७ चं सालं होतं. अण्णासाहेब मगर पिपरी-चिंचवड नगरपालिकेचे अध्यक्ष होते. त्यावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये विकसित शहर नव्हतं, पण तरी अशा भागात ४ कोटी रुपये खर्च करून एक स्टेडियम बांधण्याची कल्पना समोर आली.

स्टेडियमच्या उभारणीसाठी मोठ्या बजेटची गरज होती. त्यामुळे कारखानदारांनी पैसे द्यावेत, असा विचार समोर आला. म्हणून शेषराव वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा बोलाविण्यात आली होती.

पण तसं पाहायचं झालं तर त्या काळी पिंपरी-चिंचवड भागात भागात नीट रस्ते नव्हते, संडास नव्हते, शाळा नव्हत्या, घरांची सोय नाही, पिंपरी प्राधिकरणाचे काम पैसे नसल्यामुळे रखडत चाललेले. यामुळे प्राधान्य या गोष्टींना द्यायचा की स्टेडियमला हा प्रश्न होता.

ह्या सर्व प्रश्नांबाबत बोलणार कोण तर चर्चा करून लगेच राहुल बजाज यांच्या नावावर एकमत झालं. त्यांनी सगळ्या कारखानदारांतर्फे आपली बाजू मांडावी असं ठरलं.

आणि ठरवलं तसंच झालं, सभेत राहुल यांनी आपल्या भाषणात हे सारे मुद्दे अतिशय समर्पकपणे मांडले. या परिसराच्या विकासासाठी आधी प्राधान्य कशाला द्यायला हवे, याचे जोरदार समर्थन केले.

स्टेडियमचा हा प्रकल्प ताबडतोब गुंडाळावा, मी तरी याला निधी देणार नाही आणि माझे कारखानदार मित्रांनाही याला निधी देण्यास सांगणार नाही,’ असे अतिशय परखडपणे राहूल यांनी सुनावलं.

त्यांचे भाषण इतके रोखठोक आणि इतके प्रभावी झाले की, त्यांचे भाषण संपल्यावर पाच मिनिटे सगळीकडे शुकशुकाटचं पसरला. वानखेडेंना सुद्धा पुढे सभा कशी सुरू करावी हे कळेना. काहीतरी बोलून सभा त्यांनी गुंडाळली. त्या दिवशीचे त्यांचे भाषण म्हणजे वक्तृत्वाचा आणि आपली बाजू समर्थपणे, अतिशय प्रभावीपणे कशी मांडता येते याचा एक उत्तम नमुना होता. आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे स्टेडियमच्या प्रोजेक्टवर फुलस्टॉप लागला.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.