बाजी प्रभू देशपांडे खुद्द शिवरायांच्या विरुद्ध लढले होते, या गोष्टीत तथ्य आहे का?

बाजी प्रभू देशपांडे यांचं नाव ऐकल की डोळ्यासमोर उभा राहतो पावनखिंडीतला इतिहास. लाख मेले तरी चालतील

पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणत दोन्ही हातानी समशेरी चालवत सिद्धीची सेना खिंडीत थोपवून धरणारे बाजी प्रभू आठवतात. स्वामीनिष्ठेचे प्रतिक म्हणून बाजी प्रभू देशपांडे यांचं नाव सर्वात आधी घेतलं जात. पण तुम्हाला हे माहित आहे का कि,
एकेकाळी याच बाजी प्रभू देशपांडे यांनी शिवरायांच्या विरुद्ध लढाई केली होती.

बाजी प्रभू देशपांडे हे भोर जवळील सिंध या गावचे.

त्यांचे वडील पिलाजी हे हिरडस मावळातील कृष्णाजी बांदल देशमुख यांचे दिवाण होते. त्यांच्याकडे वंशपरंपरागत कुलकर्णी हे पद होतं. बाजी व त्यांचे बंधू प्रचंड पराक्रमी होते. त्यांच्या घराण्याने आपल्या पराक्रमाने त्यानी भोर तालुक्यातील ५२ गावचे देशपांडेपण मिळवलं होतं.

बाजी यांचे दांडपट्टा चालवण्याचे कौशल्य पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.

कृष्णाजी बांदल देशमुख व बाजी प्रभू देशपांडे समवयस्क होते. दोघांच्यात मैत्री होती. कृष्णाजी बांदल यांचे कारभारीपण बाजी प्रभुंकडे होते.
भोर जवळील रोहीडा किल्ला हे बांदल देशमुखांचे प्रमुख ठाणे होते.

याच काळात छ. शिवाजी महाराज स्वराज्याची निर्मिती करत होते.

अवघ्या सतरा अठराव्या वर्षी बारा मावळ पालथ घालून त्यांनी मराठ्यांमध्ये स्वाभिमानाच स्फुल्लिंग पेटवल होत. बलुतेदार अलुतेदार कुटुंबातील अनेक तरूण या पवित्र कार्यात सामील होत होते.
अनेक सरदार परकीय सत्तेची चाकरी करण्यापेक्षा स्वेच्छेने हिंदवी स्वराज्याकडे वळत होते मात्र काहीजण असेही होते ज्यांचा शिवरायांना विरोध होता.
विपरीत परिस्थितीवर मात करून महाराजांची घोडदौड मात्र वाढतच होती. स्वराज्य वाढत होते व जुलमी सत्तांच्या सिंहासनाला हादरे बसत होते.
जे सरदार ऐकत नाहीत त्यांना खडसावून सांगत होते, प्रसंगी लढाईची वेळ आली तर लढाईचा मार्ग शिवरायांनी पत्करला होता.
शिवाजी हा आपल्या प्रमाणेच एक जहागिरदाराचा मुलगा असून त्याचे नेतृत्व का स्वीकारावे असा विचार करणाऱ्या सरदारांपैकी बांदल हे सुद्धा एक होते.

शिवाजी महाराजांनी त्यांना एक खरमरीत पत्र पाठवल.

कृष्णाजी बांदल यांनी त्यांना उत्तर पाठवले कि,
“उद्या चाल करून येणार असाल, तर आजच या. आम्ही वाट बघतो.”
शिवाजीराजे हल्ला करणार यादृष्टीने फुलाजी व बाजी प्रभू देशपांडे यांनी स्वतः जातीने रोहीड्यावर बंदोबस्त केला. 

इकडे शिवाजी महाराजांनी देशमुखांचा खलिता वाचला, त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली.

देशमुखांचा पुंडावा मोडून काढण्यासाठी स्वतः जातीने रोहीड्यावर चालून आले. रात्रीच्या अंधारात रोहीडा गाठून शिड्या लावल्या. काही सैनिक गडावर गेले व धुर्तपणे तिथल्या पहारेकऱ्यांना फसवून गडाचा छोटा दरवाजा उघडायला लावला.

बघता बघता महाराजांचे सगळे सैन्य बेसावध शत्रूवर तुटून पडले.

एकेक करून बांद्लांचे ठाणे मराठ्यांच्या ताब्यात येत होते. या हातघाईच्या लढाईत कृष्णाजी बांदल देशमुख मारले गेले,

धनी पडला मात्र धिप्पाड बाजीप्रभू आटोक्यात येत नव्हते. एकवेळ अशी आली की बाजीप्रभूंचा सामना शिवाजी महाराजांशी झाला.

जेव्हा महाराज बाजीप्रभूंच्या समोरासमोर आले तेव्हा त्यांचा पराक्रम पाहून थक्क झाले.

सगळा गड पडला तरी हा गडी हार मानण्यास तयार नव्हता. महाराजांनादेखील त्यांनी लढाईसाठी ललकारल. शेकडो मराठा वीर बाजींवर धावून गेले पण महाराजांनी त्यांना थांबवल. स्वतःच्या हातातली तलवार म्यान केली आणि बाजीप्रभूंना म्हणाले,

 आम्हाला तुमच्याशी लढायचे नाही तर आम्हाला तुम्ही हवे आहात, तुमच्यासारख्या वडील माणसांची आम्हाला गरज आहे. कृष्णाजी आम्हाला सामोपचाराने मिळाले असते, तर बरं झालं असतं. आम्हाला राजेपणाची हौस नाही. ना जुलूम-जबरदस्तीची, पण बांदलांनी वैर पत्करलं

त्यावेळी महाराजांनी बाजीप्रभूंचे वडील कृष्णाजी प्रभू शहाजी राजांच्या पथकात होते याची आठवण करून दिली. महाराजांनी बांदलांची वतनदारी कायम राहील असे सांगितले आणि त्यांच्या वतनाला काहीही धक्का लागणार नाही असे वचन दिले. ते म्हणाले,

आमच्या तलवारीचे नाव भवानी आहे व ती अन्यायाविरुद्ध लढते, ही तलवार तुमच्याकरता नाही.

त्यांच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा व तेज बघून बाजीप्रभू भारावून गेले. त्यांच्या हातातील दांडपट्टा गळून पडला.

शिवाजी महाराजांच्या कार्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत साथ दिली.

बाजीप्रभूंचा पन्हाळा वेढ्यातील पराक्रम तेथील हौतात्म्य यातून हे सिद्धच होते.

ही रोहिड्याच्या लढाई मे १६५६ साली झाली असे म्हणतात. गडावरच्या शिलालेखावर देखील असा उल्लेख आढळतो. मात्र शिवरायांची व बाजी प्रभूंची लढाई झाली होती का बद्दल काही इतिहासकारांचे मतभेद आहेत.

केतकर ज्ञानकोश अनुसार दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यू नंतर बाजी प्रभू देशपांडे शिवरायांच्या भेटीला गेले व बांदलांचं १० हजारांच सैन्य स्वराज्यात दाखल केलं.

बाजीप्रभू देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल फारसे पुरावे उपलब्ध नसले तरी ‘प्रभूरत्नमाला’ या ग्रंथात त्यांचा थोडाफार इतिहास दिला आहे. वर सांगितलेला प्रसंग रणजीत देसाई यांच्या पावनखिंड या कादंबरीमध्ये उल्लेख केलेला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.