ज्याच्यासाठी योगीने कुस्ती सोडली तो चेला ऑलिम्पिकचं गोल्ड मारणार का?

कुस्तीच्या फडात कुस्ती बघायला गेलं की, एकापेक्षा एक दांड पैलवान दिसतील. हे गडी एकमेकांवर भारी पडतील पण जीवनाच्या फडात मात्र बऱ्याच पैलवानांवर गरीबी आणि दारिद्रय भारी पडतंय. पण काही पैलवान मात्र या गरिबीला आपल्या फडात येऊ देत नाहीत. आणि शेवटी असा का डाव टाकतात, की त्यांच्यासमोर परिस्थिती पण चीतपट होते.

असाच एक पैलवान आहे बजरंग पुनिया

जवळजवळ प्रत्येक मोठ्या कुस्तीच्या आखाड्यातलं मेडल जिंकणारा भारतीय कुस्तीपटू. हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातला आपला बजरंग. तो लहान असताना त्याच्या कुटुंबात खेळाचं सामान खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. बजरंगला तशी शाळेची आवड नव्हतीच. तो फक्त खेळातचं रमायचा.

पैसे नाहीत म्हणून त्याने आपला खेळ नाही थांबवला. तर त्याने आपल्या प्रॉब्लेमवर एक जुगाड शोधला. बजरंगने रेसलिंग, म्हणजे कुस्ती आणि कबड्डी असे खेळ खेळायला सुरु केलं. आता या खेळांसाठी विशेष अशा सामानाची गरज पण नव्हती, म्हणून घरातल्यांनी त्याला नको म्हंटलंच नाही.

खरं तर बजरंगचे वडीलच कुस्तीपटू होते. त्यामुळं त्यांनी एकदाचं आपल्या मुलाला तालमीच्या हवाली  केलं. लवकरच बजरंग शाळेतून कुस्ती खेळू लागला. त्यानंतर २०१३ हे साल उजाडलं ज्यावेळी बजरंगनं  भारतीय कुस्तीच्या आखाड्यात आगमन केलं.

पहिल्याच डावात बजरंगनं आशियाई कुस्ती स्पर्धेत आणि जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य जिंकलं. त्यानंतर २०१४ मध्ये त्याने तीनही स्पर्धांमध्ये राष्ट्रकुल, आशियाई गेम्स आणि आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्यपदकं जिंकली. बजरंगचे यश पाहून त्याच्या कुटुंबीयांनी मोठं पाऊल उचललं. त्यांनी झज्जर हे त्यांचं गाव सोडलं आणि ते सोनीपत मध्ये राहायला आले. जेणेकरुन बजरंग स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या  केंद्रात प्रशिक्षण घेऊ शकेल.

आता बजरंग मध्ये विशेष असं काय आहे?

तर बजरंग ऑलिम्पिक पदकविजेता योगेश्वर दत्तच्या अंडर ट्रेनींग घेतोय. बजरंगच्या आधी ६५ किलो च्या कॅटेगरीत योगेश्वर भारताकडून खेळायचा. आणि आता बजरंगचा गेम बघून योगेश्वरने बजरंगला ट्रेन करायचं ठरवलं.

याबद्दल ‘इंडियन एक्स्प्रेस’ शी बोलताना योगेश्वर म्हणतो,

माझं करिअर चांगल चालू होतं. मी चारवेळा ऑलिम्पिक खेळलोय. आमच्या दुसऱ्या फळीतल्या कुस्तीपटूंमध्ये बजरंगची कामगिरी चांगली आहे. आणि तो आणखी चांगली कामगिरी करू शकतो. म्हणून त्याला संधी आणि समर्थन देणं महत्वाचं आहे. जर बजरंग नसता तर मी कुस्ती सोडली नसती. मी अजूनही खेळलो असतो.

पण मला वाटतंय की ही वेळ योग्य आहे. बजरंगचं वय आत्ताच्या ऑलंपिकसाठी योग्य आहे. त्यानं  जूनियर्सच्या काळातच स्पार्क दाखविला होता. भारताने योगेश्वरला आता बजरंगमध्ये पहावे अशी माझी इच्छा आहे. माझी मोठ्ठी कारकीर्द आहे आणि माझ्यामुळे बजरंगला त्रास व्हावा अशी माझी इच्छा नाही.

योगेश्वरच्या छत्रछायेत आल्यानंतर बजरंगनं मागं वळून बघितलंच नाही. २०१७ च्या आशियाई कुस्ती स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले. आणि त्यानंतर २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत आणि एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदके देखील जिंकली. त्याच वर्षी झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले. तर पुढच्या जागतिक स्पर्धेत त्याला कांस्यपदक मिळाले. या व्यतिरिक्त सर्व आंतरराष्ट्रीय पदके जिंकणारा बजरंग सध्या जगातील पहिल्या क्रमांकाचा कुस्तीपटू आहे.

सप्टेंबर २०१९ मध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या बजरंगने मंगोलियाच्या तुल्गा तुमुर ओचिरचा पराभव करून या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या मॅटेओ पेलिसन रँकिंग मालिका स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात अव्वल स्थान मिळवले.

टोक्यो २०२० साठी बजरंगला दुसरे मानांकन मिळाले आहे. बजरंग प्रत्येक वेळी मोठ्या स्टेजवर सर्वोत्तम कामगिरी करतो. गेल्या तीन वर्षांत प्रत्येक मोठ्या स्पर्धेत त्यानं पदकं जिंकली आहेत. यात २०१८ एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स आणि २०१८-१९ वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील रौप्य व कांस्यपदकांचा समावेश आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तीन पदके जिंकणारा तो एकमेव भारतीय आहे.

बजरंगने प्रत्येक वेळी मोठ्या स्पर्धेत भाग घेत पदक जिंकले आहे. योगेश्वर दत्तच्या मते, मॅटवर बजरंग इतका तग धरण्या बरोबरीचा कुस्तीपटू शोधणे फार अवघड आहे. हा विक्रम आणि त्याचा परफॉर्मन्स पाहता प्रत्येक भारतीय बजरंगकडून पदकाची अपेक्षा करतो.

ही गोष्ट असली तरी बजरंगची श्रेणी ही कुस्तीची सर्वात कठीण श्रेणी मानली जाते. प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या बजरंग समोर विश्वविजेते गदजिमुराद रशीदोव, २०१८ विश्वविजेते जपानी ताकुतो ओटोगुरो, कझाकिस्तानचा दौलत नियाजबेकोव आणि अझरबैजानच्या रिओ २०१६ चा  कांस्यपदक विजेता हाजी अलीयेव या सर्वांची आव्हान असतील.

साहजिकच आंतरराष्ट्रीय मर्दुमकी गाजवून भल्याभल्यांना चीत करणाऱ्या दिग्गजांशी दोन हात करणं सोप्प नाही. पण जर नाव बजरंगचे असेल तर हे काम तसं अवघड हि नाही.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.