कामावरून सुट्टी न घेतल्यामुळे बेकरी चालकाने भरलाय २ लाखांचा दंड…!!!

 

कामावरून सुट्टी घेण्यासाठी नेहमीच वेगवेगळे बहाणे बनवणाऱ्या लोकांची आपल्याकडे कमी नाही. कितीही सुट्ट्या मिळाल्या तरी आपल्याला त्या कमीच असतात. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या संस्थेला देखील तुमच्याकडून जितकं अधिक काम करून घेता येईल तितकं करून घ्यायचं असतं. अनेकवेळा तर अधिकच्या सुट्ट्या घेतल्यामुळे त्याची भरपाई तुमच्या पगाराच्या कपातीतून देखील केली जाते. पण जगात एक देश असा देखील आहे जिथे परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. या देशात जर तुम्ही आठवड्याभरात कामावरून एकही सुट्टी घेतली नाही तर तुम्हाला शिक्षा भोगावी लागू शकते. तशी कायदेशीर तरतूदच या देशात आहे. हा देश म्हणजे फ्रांस होय.

फ्रांसमधील कामगार कायद्यानुसार असा नियम आहे की तुम्ही कुठल्याही संस्थेत काम करत असा किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असूद्यात पण तुम्ही कामावरून एक साप्ताहिक सुटी घेतलीच पाहिजे. तशी तुम्ही ती नाही घेतली तर तो या ठिकाणच्या कामगार कायद्याचा भंग मानला जातो आणि त्यासाठी या देशात शिक्षेची तरतूद देखील आहे. गेल्या काही दिवसात फ्रान्समधील एका बेकरी चालकाने कामावरून सुटी न घेतल्यामुळे त्याला ३००० डॉलर म्हणजेच जवळपास २ लाख रुपयांचा दंड भरावा लागल्याची घटना समोर आल्याने फ्रान्समधील हा कामगार कायदा चर्चेत आलाय. काही लोक या कायद्याच्या समर्थनात उतरलेत तर काहींनी या कायद्यातील या तरतुदीचा विरोध केलाय.

baker
सेड्रिक वाईव्रे

किस्सा असा की, सेड्रिक वाईव्रे हा फ्रान्समधील एक बेकरी चालक. त्याच्यावर असा आरोप ठेवण्यात आला होता की तो आठवड्यातले ७ दिवस आपली बेकरी सुरूच ठेवतो. त्याची बेकरी कधीही बंद नसते. आपली बाजू मांडताना सेड्रिक वाईव्रे यानं असं सांगितलं की या काळात फ्रान्समध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात होती. अशा वेळी बेकरी बंद ठेवल्याने आपल्याला आर्थिक फटका सहन करावा लागला असता. तो टाळता यावा म्हणून आपण आठवडाभर बेकरी बंद न ठेवता काम केलं. परंतु त्याचा प्रतिवाद अमान्य करण्यात आला. सेड्रिकने फक्त स्वतःच ७ दिवस काम केलं नाही, तर त्याने आपल्या कर्मचाऱ्यांकडून देखील काम करून घेतल्याने त्याचा प्रतिवाद मान्य केला जाऊ शकत नाही असं सांगण्यात आलं. त्यामुळे त्याला कामगार कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ३००० डॉलर्सच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

या घटनेनंतर काही लोक सेड्रिक वाईव्रे याच्या समर्थनात देखील उतरले असून कामगार कायद्यातील या तरतुदीचा फेरविचार होण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखवली आहे. ज्या व्यक्तीला साप्ताहिक सुटीची आवश्यकता आहे त्यांनी ती जरूर घ्यावी, पण आठवड्यातील एक दिवस सुट्टी घेण्याचं बंधन कुणावरही असू नये असं अनेक जणांना वाटतं. विशेष म्हणजे सेड्रिकला ७ दिवस बेकरी चालू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी ५०० लोकांनी त्याच्या समर्थनात मोहीम उघडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.