दुर्दैवी आसिफाचा बकरवाल समाज कायमच आलायं भारतीय सैन्याच्या मदतीला…!!!

आसिफा सामुहिक बलात्कार प्रकरण उघडकीस आलं आणि देशात एकाच खळबळ माजली. प्रकरणाची इत्यंभूत माहिती क्राइम ब्रॅचने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये आहे. प्रकरण समोर आल्यानंतर माध्यमांनी ती देशभरात पोहचवली. समाज म्हणून आपला क्रूर चेहरा या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आला. हा एवढा गंभीर गुन्हा व्यवस्थित नियोजन करून घडविण्यात आला, त्याला कारण होतं कठूआमधील स्थानिक आणि तेथे स्थलांतरित झालेला बकरवाल समाज यांच्यातील वाद. एक छोटासा वाद झाला आणि त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून आरोपींनी इतकी ह्रदयद्रावक घटना घडवून आणली. त्यानंतर आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात आले. प्रकरणाला ‘हिंदू-मुस्लीम’ असा रंग देण्यात आला. यानिमित्ताने खरंच यात काही तथ्य आहे का..? कोण आहेत ही बकरवाल लोक याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि जे सापडलं ते वाचकांशी शेअर करतोय….

कोण आहेत  बकरवाल …?

‘बकरवाल’ समाज हा जम्मू काश्मीरमध्ये आढळणारा भटका समाज आहे. हे लोकं आपल्या उदरनिर्वाहासाठी प्रामुख्याने मेंढ्या आणि बकऱ्या चारण्याचं काम करतात. ‘बकरवाल’ या शब्दाची निर्मितीच त्यांच्या व्यवसायातून झालेली दिसते. बकरी पासून ‘बकर’ आणि त्यांचं पालनपोषण करणारा अर्थात त्यांचा वाली या अर्थाने ‘वाल’. या दोन शब्दांच्या मिश्रणातून या समाजाचं नाव बनतं ‘बकरवाल’ ही लोकं प्रत्येक उन्हाळ्यात उदरनिर्वाहासाठी आपल्या मेंढ्या आणि बकऱ्यांसह लडाख आणि काश्मीर भागात कोसो मैल स्थालांतर करतात. स्थलांतरादरम्यान ते मिळेल त्या ठिकाणी तंबू ठोकून राहतात.  हिवाळ्यात ते परत जम्मूला परत येतात.

उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या गुज्जर समाजाचा भाग असणारा बकरवाल समूह हा ‘हिंदू-मुस्लीम-शीख’ असं मिश्रण असणारा आहे. जम्मू-काश्मीर खोऱ्यातील हा समाज इस्लामच्या प्रथा आणि परंपरा पाळतो तर उत्तर भारतातील गुज्जर समुदायावर हिंदू-शीख धर्माच्या परंपरांचा प्रभाव बघायला मिळतो. खोऱ्यातील बऱ्याच बकरवाल लोकांना हिंदू धर्म देखील जवळचा वाटतो. आपले पूर्वज हिंदू होते, असं त्यांच्यातील अनेकांचं मत आहे. असं असलं धर्माच्या बाबतीत कुठलीही कट्टरता या समाजामध्ये बघायला मिळत नाही. बैसाखी, लोरी आणि गोवर्धन हे सन तितक्याच उत्साहाने हा समाज साजरा करतो.

आपली कित्येक उन्हाळे जम्मू भागात घालवनाऱ्या बकरवाल समाजाचा तेथील स्थानिक हिंदू लोकांशी संघर्षाचा कुठलाही इतिहास नाही. उलट जेव्हा कधी या भागातील अलगतावादी शक्तींनी आपलं डोकं वर काढायचा प्रयत्न केलाय त्या प्रत्येकवेळी हा समाज भारताच्या बाजूने उभा राहिलाय. १९६५ साली भारताकडून काश्मीर खोरं बळकावण्यासाठी पाकीस्थानकडून ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ चालवण्यात आलं होतं. त्यावेळी ‘मोहम्मद-दिन-जागीर’ या बकरवाल समाजातील व्यक्तीनेच पाकिस्थानी सैन्याच्या कुरापतीविषयी भारतीय सैन्याला माहिती दिली होती. ज्यासाठी १९९० मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं. पुढे इस्लामिक दहशतवाद्यांनी जागीर यांची हत्या केली होती. १९६५ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी हा समाज भारताच्या बाजूने उभा राहावा, पाकिस्थानी अतिरेक्यांच्या कवेत जाऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या बकरवाल समाजातील मौलवी गुलाम दिन यांनी विशेष प्रयत्न केले, त्यासाठी त्यांचा अशोक चक्र देऊन गौरव करण्यात आला. १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान देखील कित्येक बकरवाल लोकांनी पाकिस्थानच्या खुसखोरीची माहिती वेळोवेळी भारतीय सैन्याला दिली होती. ज्यामुळे त्यांच्याविरोधात वेळीच कारवाई करून आपण कारगिलमध्ये विजय मिळवू शकलो होतो.

barkarwal1

काश्मीर खोऱ्यातील जंगलामध्ये, कुरणांमध्ये बकऱ्या-मेंढ्या चारने आणि त्यातून मिळणाऱ्या पैश्यावरच प्रामुख्याने या समाजातील लोकांची रोजी-रोटी आहे. परंतू सध्या जंगलांच्या संरक्षणार्थ अनेक ठिकाणच्या त्यांच्या वावरावर जम्मू काश्मीरच्या वन मंत्रालयामार्फत प्रतिबंध आणण्यात आला आहे. त्याच वेळी अनुसूचित-जमात म्हणून या समाजाला मिळायला पाहिजेत त्या सुविधा त्यांना मिळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळेच जम्मू काश्मीरचे वनमंत्री चौधरी लाल सिंग यांच्यात आणि बकरवाल समाजात बऱ्याच दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. विशेष म्हणजे आसिफा सामुहिक बलात्कार प्रकरणात आरोपींच्या समर्थनात उतरलेल्या भाजपच्या मंत्र्यांपैकी एक म्हणजे चौधरी लाल सिंग एक होत. त्यांनी या प्रकरणात उतरण्यामागे बकरवाल सामाजाशी सुरु असलेला त्यांच्या संघर्षाची किनार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.