पुण्यातल्या झोपडपट्टीच्या पोरांसाठी कुणी कितीही केलं असेल पण हा माणूस काय तर भारी करतोय…

पुण्यात बऱ्याच टेकड्या आहेत. तिथली हिरवळ आणि निवांतपणा अनुभवायला कित्येक जण टेकड्यांवर फिरायला जातात.

पण काही टेकड्यांच्या भागात लुटमारीच्या घटना झालेल्या कानावर पडतात. टेकड्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या झोपड्पट्टीतली मुलं अशा गुन्हेगारी प्रकारच्या घटनांमध्ये असतात असंही ऐकायला मिळते. हे नाकारून चालणार नाही की, वस्तीतील गरिबी, शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी वरून इथे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असते. मग झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे वळतात.

या विषयाची चर्चा करण्याचं निमित्त म्हणजे, नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी पुण्यातल्या झोपडपट्यांमध्ये बाल मित्र मंडळ सुरु करण्याची घोषणा केलीय. 

कैलास सत्यार्थी यांच्या बाल मित्र मंडळाच्या माध्यमातून अशाच अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी आणि शोषणापासून वाचवण्याचं काम केलं जाणार आहे. 

पण हे कैलास सत्यार्थी आहेत कोण आणि झोपडपट्टीतल्या पोरांसाठी काम करण्याचा उद्देश काय आहे ?

मलाला युसूफ जई आठवते का? मालाला पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी काम करत असल्यामुळे दहशतवाद्यांनी तिला जीवे मारण्यासाठी तिच्यावर गोळ्या घातल्या होत्या. या कामाबद्दल जेव्हा तिला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. 

हाच शांततेचा नोबेल पुरस्कार मलाला आणि कैलास सत्यार्थी यांच्यात वाटून मिळाला होता. 

कारण मलालाने सुद्धा लहान बालकांच्या हक्कासाठी काम केलं होतं आणि कैलास सत्यार्थी सुद्धा बालकांसाठीच काम करतात. कैलास सत्यार्थी यांनी सत्यार्थी फाउंडेशन स्थापन करून देशभरातील लहान बालकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी मोठं काम केलं आहे.

कैलास सत्यार्थी फाउंडेशनने २०१८ ला दिल्लीत या बाल मित्र मंडळांची स्थापना केली होती. आजपर्यंत केवळ दिल्लीतल्या ८ झोपडपट्यांमधील मुलांसाठी हे मंडळ चालवले जात होते. 

परंतु आता Games २४×७ या गेमिंग कंपनीच्या सहकार्यातून पुण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा बाल मित्र मंडळ सुरु करण्यात येणार आहेत.

दिल्लीनंतर पुण्यात चालवले जाणारे बाल मित्र मंडळ झोपडपट्टीत अशा प्रकारे काम करतील.

ज्या ठिकाणी बाल मित्र मंडळ स्थापन केली जातात तिथल्या भागात कोणतीच मुलं बालमजुरी करत नाहीत. त्या भागातील सगळी मुलं शाळेत शिकायला भरती केली जातात. त्या मुलांना उत्तम शिक्षण तर दिलं जातं. त्यासोबत मुलांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी बाल पंचायतीची निर्मिती केली जाते.

बाल मित्र मंडळाच्या माध्यमातून मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या विरोधात मुलांना प्रशिक्षित केलं जात. मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू नयेत यासाठी योग्य शिक्षण देण्यासोबतच काऊंसिलिंग सुद्धा केली जाते. लहान मुलांची विक्री,

पुण्यात सगळ्यात दाट लोकसंख्या असलेल्या भीम नगर, इंदिरा नगर बार्मासेल, राजीव गांधी आणि मेंटल कॉर्नरजवळच्या झोपडपट्ट्यांमध्ये आता बाल मित्र मंडळ स्थापन करण्यात येणार आहे.

यापूर्वी दिल्लीत सुरु झालेल्या बाल मित्र मंडळांना चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये सुधारणा घडून येत आहेत.

पुण्यापूर्वी दिल्ली शहरातील विवेकांनद कॅम्प, संजय कॅम्प, इंदर कॅम्प, शंकर कॅम्प, इस्राईल कॅम्प, नाला पार कॅम्प, इंद्र कल्याण विहार ओखला फेज १ आणि इंद्र कल्याण विहार ओखला फेज २ या आठ झोपडपट्ट्यांमध्ये बाल मित्र मंडळांची निर्मिती करण्यात आली होती.

त्यात मिळत असलेले यश बघून आता Games २४×७ या गेमिंग कंपनीच्या सहकार्यातून पुण्यात सुद्धा चार झोपडपट्ट्यांमध्ये अशा प्रकारची बाल मित्र मंडळं स्थापन करून मुलांच्या जीवनाला एक नवीन आकार मिळवून देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

निव्वळ ४ झोपडपट्ट्यांमध्ये बाल मित्र मंडळ उभे करून चालणार नाही कारण पुण्याची झोपडपट्टीची समस्या फार मोठी आहे.

पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात एकूण ५६४ झोपडपट्ट्या आहेत. त्यात ३५३ झोपडपट्ट्यांना सरकारने मान्यता दिली आहे तर २११ झोपडपट्ट्यानां अजूनही सरकारी मान्यता मिळालेली नाही.

पुणे महानगरपालिकेतील ४७७ झोपडपट्ट्या अवघ्या २.३४ टक्के जागेवर आहेत. तसेच शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ३२.५ टक्के लोकसंख्या या झोपडपट्ट्यांमध्ये राहते. यामध्ये २ लाख ११ हजार परिवार असलेल्या ११.५ लाख लोकसंख्येचा समावेश आहे.

गरिबी आणि निरक्षरतेमुळे झोपडपट्ट्यांमध्ये बालकांचे आयुष्य उध्वस्त होते.

झोपडपट्ट्यांमध्ये गरिबीचे आणि निरक्षरतेचे प्रमाण मोठे आहे. सोबतच अतिशय दाट लोकसंख्या असल्यामुळे निवास आणि मूलभूत सुविधानाचा सुद्धा अभाव आहे. या सगळ्या समस्यांमुळे झोपडपट्ट्यांमध्ये बालकांचा विकास पुरेशा प्रमाणात होत नाही.

त्यातूनच बालकं तस्करी, लैंगिक शोषण, बालमजुरी, बालविवाह आणि गुन्हेगारी सारख्या समस्यांमध्ये फसतात असं वेळोवेळी झालेल्या अभ्यासांमधून स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच कैलास सत्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील ग्रामीण व शहरी भागातील बालकांच्या विकासासाठी काम करत आहेत. 

सत्यार्थी फाउंडेशनमार्फत चालवल्या जाणाऱ्या बाल मित्र मंडळांमुळे मुलांमध्ये शिक्षण व हक्कांची जाणीव निर्माण होईल. तसेच झोपडपट्ट्यांमधील मुलांमध्ये असलेली गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होऊन नेतृत्व गुण निर्माण होण्यास मदत होईल.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.