ठाकरे Vs भुजबळ : अटक, राडा… पण प्रकरण मिटण्याची गोष्ट भारी होती…

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाषण केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, ‘भुजबळांनी शिवसेना सोडली हा आमच्यासाठी सर्वात मोठा धक्का होता. आम्हाला सावरायला खूप वेळ लागला. पण भुजबळांनी एक चांगली गोष्ट केली ती म्हणजे बाळासाहेब असतानाच त्यांनी हे मतभेद मिटवले.’

उद्धव ठाकरेंवर टीका करताना अनेकदा विरोधकांकडून भुजबळांनी बाळासाहेबांना केलेल्या अटकेचा उल्लेख केला जातो. आज उद्धव ठाकरेंनी मात्र या सगळ्यावरुन झालेले मतभेद भुजबळांनी कसे मिटवले याचा संदर्भ दिला.

हे मतभेद नेमके का झाला आणि कसे दूर झाले..?     

तर सुमारे ५०० हून अधिक पोलीसांचा गराडा तेव्हा बाळासाहेबांच्या आजूबाजूला पडला होता. संपुर्ण मुंबईत अघोषीत बंद पाळला जात होता. तेव्हा ब्रेकिंग न्यूजचं तितकं फॅड नसल्याने आत्ता नेमकं काय चाललय ते कळत नव्हतं, पण मुंबई पुन्हा एकदा पेटण्याच्या मार्गावर आहे याची शक्यता प्रत्येक मुंबईकराला वाटतं होती.. 

कारणही तसच होतं. तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेचे आदेश दिले होते. ती तारीख होती २४ जुलै २०००. या दिवशी बाळासाहेब ठाकरेंना अटक देखील झाली पण या गोष्टीची सुरवात होते ती इतिहासापासून… 

जुलै १९९७ 

छगन भुजबळांनी मंडल आयोगाचं निमित्त करुन शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर ते कॉंग्रेसमध्ये दाखल झाले होते. गद्दार म्हणून छगन भुजबळांचे जाहीर वाभाडे काढले जात होते. १९९५ साली झालेल्या निवडणूकीत याचा बदला म्हणून सेनेने सामान्य कार्यकर्ता असणाऱ्या बाळा नांदगावकर यांना तिकीट दिले आणि बाळा नांदगावकर यांनी छगन भुजबळांचा पराभव केला.

त्यानंतर शरद पवारांनी छगन भुजबळांना विधानपरिषेदवर घेतलं आणि विधान परिषदेवर विरोधी पक्षनेता केलं.. 

विरोधी पक्षनेतेपदावर काम करत असताना सत्तेत असणाऱ्या युती सरकारवर एकामागून एक तोफ डागण्याचं काम भुजबळ करू लागले. आधीच भुजबळांबद्दल असणारा गद्दार राग व त्यात भुजबळांकडून उचलले गेलेले किणी प्रकरण, रमाबाई आंबेडकर प्रकरण यामुळे शिवसेनिकांचा राग वाढत गेला.. 

अन् १९९७ च्या जुलै महिन्यात छगन भुजबळांच्या घरावर शिवसैनिकांनी जोरदार हल्ला केला.

इतकं की त्या दिवशी छगन भुजबळ सापडले असते तर काही खरं नव्हतं. भुजबळ आपल्या बेडरुममध्ये पलंगाच्या मागे लपून बसले होते. एका बॉडिगार्डने हवेत गोळीबार करत कसबस भुजबळांना या हल्ल्यातून सोडवलं.. 

इथे भुजबळ व ठाकरे हा सामना व्यक्तिगत पातळीवर उतरला होता.. 

रमाईनगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. यावेळी आंदोलन झाले त्यामध्ये ११ लोक ठार झाले होते. भुजबळांनी सरकारनेच हे खून पाडले अशी भूमिका घेतली होती. यामुळेच घरावर तर हल्ला झालाच पण सेनेकडून भुजबळांच्या विरोधात दोन खोटी अफिडिविट देखील करण्यात आली होती.

अन् सामनामधून सरळ भुजबळांच्या विरोधात लिहण्यात आलं होतं की,

हाच तो राक्षस ज्याने बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली.. 

रमाईनगर झालेल्या विटंबनेत छगन भुजबळ दोषी असल्याचा आरोप सामना मधून करण्यात आला होता.. 

या गोष्टींच्या विरोधात दोन तक्रारी भुजबळांनी केल्या होत्या. पहिली तक्रार होती ती त्यांच्या घरावर व त्यांच्यावर झालेल्या खूनी हल्ल्याबाबत आणि दूसरी केस होती ती त्यांच्यावर खोटे आरोप करून सामना मधून अब्रनुकसानी केल्याबद्दल.

मधल्या काळात गुंडेवार कमिशनची स्थापना झाली होती. यात पुतळ्याची विटंबना कोणी केली, फायरिंग कोणी केलं याची चौकशी झाली होती. भुजबळांना निर्दोष सोडण्यात आलं होतं. याचाच आधार घेवून वास्तविक भुजबळांनी सामनाच्या विरोधात व पर्यायाने बाळासाहेबांच्या विरोधात केस केली होती. 

आरोप झाले, गुन्हा नोंद झाला आणि न्यायालयात तारखा पडू लागल्या.. या दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली भुजबळ सत्तेत आले. एक दशक ते सत्तेच्या केंद्रस्थानावर राहिले.

२००९ च्या दरम्यान बाळासाहेब थकून गेले होते व या खटल्याच्या तारखा पडत होत्या.. 

बाळासाहेबांवर अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता. हा खटला दहा ते अकरा वर्ष चालला. २००९ च्या शेवटच्या टप्प्यात खटला आला होता तेव्हा सुभाष देसाई आणि संजय राऊत छगन भुजबळांना भेटायला गेले, त्यांनी भुजबळांना पत्र दिले, 

या पत्रात लिहलेले साहेबांची तब्येत आणि वय पहाता आपण सहकार्य करायला पाहीजे.. 

पत्र वाचून भुजबळ म्हणाले,

एक शब्दही आणखी सांगू नका मी हा खटला मागे घेतोय… 

भुजबळ कोर्टात गेले, न्यायाधिशांसमोर हात जोडून हा खटला चालवायचा नाही म्हणाले. तेव्हा कोर्टात उद्धव ठाकरे हजर होते. त्यांनी भुजबळांना मातोश्रीवर यायचं आमंत्रण दिलं. दोन दिवसांनी भुजबळांच संपुर्ण कुटूंब पुर्वीसारखं ठाकरे कुटूंबाला भेटायला गेलं आणि बाळासाहेबांच्या अखेरच्या क्षणी ही कटूता मिटून गेली… 

दूसऱ्या केसबाबत देखील असच काहीसं झालं, तेव्हा राज्यात भाजप-सेनेची सत्ता आली होती. छगन भुजबळांना अटक करण्यात आली होती..तेव्हा हा खटला न्यायालयापुढे चालूच होता. 

भुजबळ तेव्हा जेलमध्ये होते तेव्हाही शिवसैनिकांच्या हल्ल्याचा खटला चालूच होता. खटला आत्ता शेवटच्या टप्प्यात आला होता. भुजबळ देखील अटकेत होते. भुजबळांना साक्ष देण्यासाठी कोर्टात बोलावण्यात आलं. तेव्हा भुजबळ हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांकडे पहात कोर्टाला म्हणाले, 

२० वर्ष झाली हे लोकं कोर्टात येतायत. मला हा खटला अधिक चालवायचा नाही. 

यावर कोर्टाने विचारणा केली २० वर्षानंतर खटला कसा मागे घेताय… 

तेव्हा भुजबळ म्हणाले, 

मी याच्यातल्या कुणालाच ओळखत नाही. यातलं कुणी तिकडे आलच नव्हतं.. अन् तो २० वर्ष चालणारा खटला तिथेच मिटला..

राजकारणात दावे प्रतिदावे, खुन्नस, इर्ष्या सगळं होतं. पण पुलाखालून पाणी गेल्यानंतर हातात पश्चातापाशिवाय दोन्हीकडे काहीही राहत नाही हेच खरं..

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.