बालाजीचा धडाका एवढा होता की पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये त्याच्या नावाने गाणं गायलं जायचं….

बालाजी हमसे दूर भागते हुए और उनकी ये गेंद बल्ले को चकमा देती हुई सीधे राहुल द्रविड के दस्तानो में समा गयी…

रेडिओवर हा आवाज बऱ्याच लोकांनी ऐकला असेल. लक्ष्मीपती बालाजी म्हणजे पाकिस्तानचा कर्दनकाळ बनून पुढे आला होता. त्याच्या बॉलिंगला भलेही जास्त स्पीड नव्हता पण दोन्ही बाजुंनी होणारा त्याचा स्विंग होणारा बॉल बऱ्याचदा बॅट्समनची भंबेरी उडवून जायचा. भल्या भल्या खेळाडूंना लक्ष्मीपती बालाजीचा धाक बसला होता.

लक्ष्मीपती बालाजीसमोर पाकिस्तानचा रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून नावाजलेला शोएब अख्तर अक्षरशः लोळागोळा होऊन पडला होता. शोएब अख्तरला लगावलेला लांबलचक सिक्सर आजही कुठलाच क्रिकेटप्रेमी विसरू शकत नाही. पाकिस्तानमध्ये अशी जबरी दहशत आणि लोकप्रियता लक्ष्मीपती बालाजीची होती. इम्रान खानची सुद्धा पाकिस्तानमध्ये इतकी क्रेझ नसेल तितकी क्रेझ हि लक्ष्मीपती बालाजीची होती. 

लाहोरच्या मैदानात पाकिस्तानच्या महिला क्रिकेट फॅन्स या लक्ष्मीपती बालाजीसाठी WILL YOU MARRY ME चे बोर्ड घेऊन उभ्या असायच्या आणि पाकिस्तानमध्ये बालाजीला असे लग्नाचे प्रपोजल यायचे. याच काळात पाकिस्तानमध्ये अख्तरला षटकार मारला आणि स्टेडियममध्ये गाणं सुरु झालं कि,

बालाजी जरा धीरे चलो…..

हे गाणं तेव्हा लक्ष्मीपती बालाजीमुळे पुन्हा एकदा लोकप्रिय झालं होतं.

स्माईलवाला कातिल म्हणून लक्ष्मीपती बालाजीची ख्याती होती. क्रिकेट करियरमध्ये बालाजीची स्माईल हे एक वेगळंच प्रकरण होतं. दातांचं ऑपरेशन झाल्यामुळे बालाजीची स्माईल हि तशीच झाली. पाकिस्तान दौऱ्यावर सचिन, द्रविड, गांगुली हि मंडळी जितकी गाजली नसेल तितका लक्ष्मीपती बालाजी हिट झाला होता. अख्तरला मारलेला सिक्स आणि त्याच्या पुढच्या बॉलला बालाजीची तुटलेली बॅट हे प्रकरण जगभर गाजलं होतं. अख्तरसुद्धा बालाजीबद्दल म्हणतो कि,

मला स्वप्नातसुद्धा विचार आला नसेल कि बालाजी सारखा बॅट्समन मला सिक्सर मारेल. मी बरेच दिवस त्या सिक्सरबद्दलच विचार करत होतो.

भारतीय संघात बालाजीची इन आउट प्रक्रिया सुरूच होती. संघात तो मजबूत असं स्थान बनवू शकला नाही. सतत आतबाहेर असण्याच्या प्रक्रियांमुळे बालाजीला पुढे विशेष काही करता आलं नाही. पण त्याचवेळी आयपीएलचं आगमन झालं आणि भारतात नवनव्या खेळाडूंचं पुनरागमन झालं. यातच होता लक्ष्मीपती बालाजी.

चेन्नई सुपर किंग्ज संघात तो खेळत होता. चेपॉकच्या मैदानावर आयपीएलच्या पहिल्याच सिझनला पंजाबचा बाजार लक्ष्मीपती बालाजीने उठवला होता. इरफान पठाण, पियुष चावला आणि व्हीआरव्ही सिंगला बाद करत बालाजीने आयपीएलची पहिली हॅट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीचा बालाजी हा आवडता बॉलर होता. 

आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ८ टेस्ट मध्ये २७ विकेट आणि ३० वनडे मॅचेसमध्ये ३४ विकेट बालाजीच्या नावे होत्या.  आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर बालाजी केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्सचा कोच झाला आणि २०१८ साली पुन्हा तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा बॉलिंग कोच झाला. आयपीएलमध्ये चेन्नईने जितके अटीतटीच्या सामान्यातले विजय मिळवले त्याच सगळं श्रेय धोनी बालाजीला देतो. आजही बालाजी कट्टर क्रिकेट फॅन्सच्या चांगलाच लक्षात आहे आणि त्याचा पाकिस्तानमध्ये लगावलेला सिक्सर अनेक पिढ्या विसरणार नाही.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.