बाळासाहेब ठाकरेंनी “शिवसेनाप्रमुखपदाचा” राजीनामा समोर ठेवूनच पेटलेलं बंड शांत केलं होतं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज महाराष्ट्रातील जनतेसोबत संवाद साधला. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून बोलत असताना उद्धव ठाकरेंनी भावनिक साद घातली.

ते म्हणाले, मी मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचं पत्र लिहून ठेवलय. तुम्ही इथे येवून सांगा की, तुम्हाला मी नकोय. मुख्यमंत्रीपदाचाच काय तर शिवसेना पक्षप्रमुख पदाचा देखील राजीनामा देण्यास मी तयार आहे. आपल्याच लोकांना मी नको असेल तर काय करणार?

असे आवाहन करत त्यांनी शिवसैनिकांसह बंडखोर आमदारांना देखील भावनिक साद घातली, पण हे पहिल्यांदा घडत आहे का? तर नाही..

भावनिक साद घालून राजीनाम्याचा एखाद्या अस्त्राप्रमाणे वापर केला होता तो बाळासाहेबांनी, व कारणीभूत ठरले होते उद्धव ठाकरे..

किस्सा आहे १९ जुलै १९९२ चा. या दिवशी दैनिक सामनाची हेडलाईन होती,

 “अखेरचा जय महाराष्ट्र”

सकाळचा पेपर हातात आल्यावर पूर्ण महाराष्ट्रभर खळबळ उडाली. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सोडायचा निर्णय जाहीर केला होता. शिवसैनिकांचा ठोका चुकला.

झालेलं अस की, साधारण 1985 नंतर शिवसेनेत ठाकरेंच्या पुढच्या पिढीचा वावर सुरू झाला होता. बाळासाहेबांच्या पुतण्या राज हा त्यांची सेम फोटोकॉपी असल्याची चर्चा झडू लागली होती. तीच भाषणशैली, तसेच हावभाव. शिवसेनाप्रमुखांच प्रतिबिंब म्हणून त्यांचा उल्लेख केला जावू लागला येऊ. 1988 साली भारतीय विद्यार्थी सेनेचा प्रमुख त्यांची नियुक्ती झाली.

याच दरम्यान बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे सुद्धा संघटनेमध्ये सक्रिय झाले होते.

याच कारणामुळे जुने कार्यकर्ते अस्वस्थ होवू लागले. अशातच 1990 च्या निवडणूकीत प्रचारात जोर लावून देखील शिवसेनेच्या पदरी अपयश आलं. 1991 साली या वातावरणात पहिली ठिणगी पडली ती छगन भुजबळांनी शिवसेना सोडल्यावर.

बाळासाहेबांच्या खालोखाल लोकप्रिय असलेल्या भुजबळांनी पक्ष सोडला पण शिवसैनिकांनी त्यांना माफ केलं नाही. फितूर सूर्याजी पिसाळ बरोबर तुलना करण्यात आलेले भुजबळ अनेक दिवसापर्यंत मुंबईत खुलेआम फिरू शकले नव्हते. मात्र या वातावरणाचा फायदा घेवून असंतुष्ट नेत्यांनी थेट बोलण्यास सुरवात केली.

यात आघाडीवर होते माधव देशपांडे. शिवसेना स्थापन पासूनचे ते नेते होते. अख्खी हयात आपण घराणेशाही विरुद्ध लढण्यात घालवली आणि याच शिवसेनेत घराणेशाही आणली जात आहे असा खुला आरोप त्यांनी केला.

“शिवसैनिकांनी निष्ठेने उभ्या केलेल्या संघटनेचा नाश, ठाकरे हे पुत्र व पुतण्याच्या नादी लागून करत आहेत”.

पत्रकार परिषदेत देशपांडे गरजले. शिवसेनाप्रमुखांच्या संतापाचा स्फोट झाला.

यातून त्यांनी हा राजीनाम्याचा धक्का दिला. सगळ्यांना बेसावध क्षणी खिंडीत गाठले.

19 जुलैच्या सामनाच्या अग्रलेखात बाळासाहेब म्हणतात,

“शिवसेना ही आमची किंवा आमच्या कुटुंबाची खाजगी मालमत्ता नाही. निरोप घेताना मनास असंख्य यातना डसत असल्या, डोळे पाण्याने डबडबले जरी असले तरी आमच्या मनोदेवतेचा हाच ‘कौल’ आहे. प्राप्त परिस्थितीत तो अपरिहार्य आहे.”

साहेबांच्या या हृदयाला पीळ पाडणाऱ्या शब्दांनी शिवसैनिक हेलावले. बाळासाहेबांशिवाय शिवसेनेचा कोणी विचारच करू शकत नव्हतं. भर पावसात शिवसेना भवनापुढे गर्दी करण्यात आली.  हजारो कार्यकर्त्यांनी घातलेल्या प्रेमाच्या या साकड्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सभा झाली. सभेला तुफान गर्दी झाली होती.

बाळासाहेबांनी शिवसैनिकांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला,

“विस्तव म्हणून वागणार असाल तर केवळ तुमच्या प्रेमापोटी मर्द शिवसैनिकांचे नेतृत्व आपण करणार आहोत. जे नामर्द आहेत त्यांनी शिवसेनेतून चालते व्हावे!”

एका फटक्यात पक्षांतर्गत विरोधकांना गार करण्यात आले होते. शिवसेनेचा रिमोट आपल्याच हातात राहणार  हे बाळासाहेबांनी सिद्ध केले होते.

बाळासाहेबांनी राजीनामा देण्याची ही पहिली घटना नव्हती. 1978 च्या महानगरपालिकेच्या दारुण पराभवानंतर देखील बाळासाहेबांनी भर सभेत खिशातून राजीनामा काढला होता. पण तेव्हाही तुम्ही जाल तर आमच्या प्रेतावरून असा आकांत शिवसैनिकांनी केला होता…

बाळासाहेबांनी राजीनामा या गोष्टींचा वापर देखील अत्यंत मुरलेल्या राजकारण्याप्रमाणे कौशल्याने केला होता त्याचा हा इतिहास… 

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.