मुख्यमंत्र्यांचं एक विधान शिवसेनेच्या पुनर्जन्मास कारणीभूत ठरलं….

वर्ष होत १९८५. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या होत्या. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी विक्रमी बहुमत मिळवत निवडून आले होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आलेली सहानुभूतीची काँग्रेस लाट अजून ओसरली नव्हती.

राज्यात देखील धडाकेबाज व्यक्तिमत्वाचे लोकनेते वसंतदादा पाटील मुख्यमंत्रीपदी होते. ते जनसामान्यांच्यात लोकप्रिय तर होतेच शिवाय खेडोपाडी पसरलेल्या पक्ष संघटनेवर देखील त्यांचंच वर्चस्व होतं.

एकूणच मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार याची सगळ्यांना खात्री होती.

एकूणच सगळे विरोधी पक्ष धाराशायी झाले होते. जनता पक्षाची पूर्ती वाताहत झाली होती. केंद्रात फक्त दोन खासदार निवडून आलेली भाजप तर खिजगणतीत देखील नव्हती. महाराष्ट्रात मुख्य विरोधी पक्ष होता शरद पवारांचा समाजवादी काँग्रेस.

नाही म्हणायला मुंबईत शिवसेनेच विरोधात अस्तित्व होतं. 

यापूर्वी तीन चार वेळा बीएमसीच्या महापौर पदी शिवसैनिकांची वर्णी लागली होती. सुधीर जोशी, मनोहर जोशी असे दिग्गज नेते या पदावर बसून गेले होते. बाळासाहेबांच्यावर मुंबईकर मनापासून प्रेम करत होते. शहराच्या कानाकोपऱ्यात शाखा उभारल्या होत्या, ठिकठिकाणी शिवसैनिक बाळासाहेबांच्या आदेशावर प्राण पणाला लावायला देखील तयार होते.

मात्र एक गोष्ट खरी होती की शिवसेनेचा सुरवातीच्या काळातला जोर ओसरला होता.

इंदिरा गांधींना पाठिंबा देणारे बाळासाहेब ठाकरे यांनी आता पर्यंत वसन्तराव नाईक यांच्यापासून ते अंतुले बाबासाहेब भोसले यांच्या पर्यंत काँग्रेस नेतृत्वाशी जुळवून घेण्याचं धोरण स्वीकारलं होतं. या पूर्वी त्यांची महापालिकेत सत्ता आली होती ती काँग्रेस किंवा इतर पक्षांशी युती करूनच. मराठी माणसाचा मुद्दा हळूहळू जुना झाला होता. गिरणी कामगारांचे आंदोलन मोडले होते याचा देखील फटका काही प्रमाणात सेने नेतृत्वाला बसला होता.

आता काँग्रेसवर टीका करून सत्ता काबीज करायची तर मुद्देच फारसे नव्हते. सेनेने तयारी केली होती पण यावेळची निवडणूक जिंकायचे खूप काही चान्सेस नव्हते. 

अशातच निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आपल्या विधानपरिषदेतील एका भाषणात म्हणाले,

“मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव रचला जातोय. पण मी हे होऊ देणार नाही.”

एक छोटस वाक्य. मात्र खुद्द वसंतदादांना देखील माहित नसेल कि या वाक्याचे दुरोगामी परिणाम होणार आहेत. अनेक जण दावा करतात की वसंतदादांनी मुद्दामहून ते विधान केलं. या मागे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस यांच्यात सुरु असलेला सुप्त सत्ता संघर्ष होता.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्याच्या काँग्रेसचे सर्वेसर्वा जरी वसंतदादा पाटील असले तरी मुंबई काँग्रेसचं वेगळंच प्रस्थ होतं.

मुरली देवरा सारखा सर्वव्यापी नेता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधून मोठा निधी दिल्लीपर्यंत पाठवला जायचा. या आधी देखील सका पाटील, रजनी पटेल असे  काँग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या खिशात असणारे मुंबईचे नेते मुख्यमंत्र्याना देखील जुमानत नसायचे.

वसंतदादांनी या मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची खोड मोडायची म्हणून ठरवलं आणि केंद्रात मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करायची चर्चा सुरु आहे अशी हूल उठवली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याच संधीच्या शोधात होते. मुंबई हातची जाणार म्हंटल्यावर मरगळलेला मराठी माणूस पेटून उठला. बाळासाहेबांच्या घणाघाती भाषणांनी शिवसैनिकांमध्ये वेगळीच ऊर्जा भरली. त्यांना तोंड देणे काँग्रेसला जमलेच नाही.

स्वतः वसंतदादा प्रचाराला उतरले नाहीत. असं म्हणतात कि त्यांचे मुंबई मधील समर्थक आमदार, खासदार कार्यकर्ते शिवसेनेचा प्रचार करत होते.

याचा अपेक्षित परिणाम झाला कि मुंबई महानगरपालिकेत पहिल्यांदाच कोणाशीही युती न करता शिवसेनेची एक हाती सत्ता आली. १४० पैकी ७४ जागी शिवसैनिक निवडून आले होते. हि ऐतिहासिक कामगिरी होती. देशभरात काँग्रेसची लाट असूनही मुंबईत हा चमत्कार घडला होता.

बाळासाहेबांनी सेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छगन भुजबळ यांना महापौर केले. 

निकालानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुरली देवरा यांनी राजीनामा दिला. मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार असल्याची अफवा पसरली आणि आमचा पराभव झाला असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. त्यांचा अप्रत्यक्षपणे रोख मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यावरच होता. त्यांचे समर्थक तर दादांच्यात व बाळासाहेब ठाकरेंच्यात असलेल्या मैत्रीमुळे काँग्रेसचा पराभव झाला असल्याचा आरोप करत होते.

मुंबई काँग्रेसचे तरुण नेते गुरुदास कामत यांनी तर आरोप केला की शिवसैनिकांनी गुंडगिरी करून मतदानाच्या पेट्या पळवल्या आणि पोलिसांनी कोणताच हस्तक्षेप केला नाही. राज्यात आमची सत्ता असून प्रशासनाने सहकार्य केलं नाही आणि आमचा पराभव झाला.

मुंबई काँग्रेसने वसंतदादांची तक्रार दिल्लीच्या पक्षश्रेष्टींकडे केली. राजीव गांधींनी दादांना स्पष्टीकरण देण्यासाठी दिल्लीला बोलावलं. मात्र कोणती कारवाई झाली नाही. 

एकूणच हि निवडणूक शिवसेनेला पुनर्जन्म देणारी ठरली. एक हाती सत्ता जिंकू शकत असल्यामुळे बाळासाहेबांना आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रती आत्मविश्वास आला. अनेक तरुण नेते उदयाला आले.

छगन भुजबळांनी महापौर म्हणून जबरदस्त कामगिरी केली आणि शिवाय पक्षासाठी मोठी रसद उभी केली. भाजपसारखा पक्ष सेनेशी युती करायला आला तो याच निवडणुकीच्या निकालामुळे. पक्षाचा मुंबई बाहेर विस्तार करण्याचे प्लॅनिंग सुरु झाले.

१९८५ सालच्या मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राज्याची राजकीय गणिते बदल्यास सुरवात झाली. 

महाराष्ट्रातील एक मोठा विरोधी पक्ष म्हणून सेनेचा उदय झाला होता. पुढच्या दहा वर्षातच बाळासाहेबांनी व त्यांच्या सैनिकांनी शिवसेनेचा भगवा झेंडा मंत्रालयावर फडकवला. हे सगळं घडलं वसंतदादांच्या त्या एका वाक्यामुळं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.