बाळासाहेबांचा आदेश झुगारून भुजबळ शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सहभागी झाले.

गोष्ट आहे १९८५ सालची. पंतप्रधान राजीव गांधींनी कृत्रिम धाग्याच्या वस्त्रांना उत्तेजन देणारे केंद्रातून जाहीर केले आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन हादरली. फक्त कृत्रिम धाग्याला उत्तेजन नाही तर कापसावर निर्बंध लादून त्याच्या किंमती राजीव गांधींच्या सरकारने पाडल्या होत्या.

खादीचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींचा वारसा सांगणाऱ्या राजीव गांधींनी उचललेले हे पाऊल अनेकांसाठी धक्कादायक होते. पण इंदिराजींच्या हत्येनंतर आलेल्या सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसला पाशवी बहुमत मिळाले होते, विरोधक जवळपास संपुष्टात आले होते. त्यांच्यात कमालीची मरगळ आलेली होती.

शेतकऱ्यांचा आवाज कोण बनणार असा प्रश्न पडला होता तेव्हा महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ पुढे आली.

शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांनी राजीव गांधींच्या धोरणाविरुद्ध आंदोलन करण्याचे धाडस दाखवले. कृत्रिम धाग्याच्या वस्त्रांना राजीवस्त्र असे म्हणत गावोगावी त्यांची होळी करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. संपूर्ण राज्यभरात रान पेटवण्यात आले.

मुंबईत आंदोलनाचा दिवस पक्का करण्यात आला, तो होता १२ डिसेंबर. परदेशी कपड्याच्या विरोधात आंदोलन करताना शाहिद झालेल्या हुतात्मा बाबू गेनू यांचा हा स्मृती दिन. याच  मुहूर्तावर मुंबईत शिवाजी पार्क येथे विराट सभेचे आयोजन करण्यात आले.

मुंबईत तेव्हा दोन चळवळी अगदी भरात होत्या. डॉ.दत्ता सामंत यांची कामगार चळवळ आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. खरे तर हे दोन्ही नेते एकमेकांचे पक्के विरोधक मानले जायचे पण त्यांची लोकप्रियता अफाट होती .

एका इशाऱ्यावर मुंबई बंद पाडण्याची ताकद दोन्ही नेत्यांमध्ये होती.

मुंबईत आंदोलन यशस्वी करायांचे झाले तर या दोन्ही नेत्यांची मदत घ्यावि लागणार हे शरद जोशींनी ओळखले होते. दत्ता सामंत यांच्याशी त्यांचा यापूर्वी संबन्ध येऊन गेला होता त्यामुळे ते १२ डिसेंबरच्या आंदोलनात सहभागी होण्यास तयार झाले.

शरद जोशींनी जेव्हा बाळासाहेबांची भेट घेतली तेव्हा राजीववस्त्राच्या बाबतीत त्यांचाही मोठा विरोध होताच. सेनेने नुकताच महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस कडून खेचून आणली होती. मात्र राष्ट्रीय पातळीवर चमकण्या साठी त्यांच्याकडे कार्यक्रम नव्हता. हिंदुत्वाचा मुद्दा अजूनही सेनेच्या अजेंड्यावर प्रकर्षाने आला नव्हता.

शरद जोशींच्या आंदोलनाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला.

पण जेव्हा शिवाजी पार्कच्या सभेची बोलणी सुरु झाली तेव्हा कम्युनिस्ट नेते दत्ता सामंत जर स्टेजवर असणार असतील तर तिथे मी येणार नाही असे ठणकावून सांगितले. शरद जोशींनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण बाळासाहेब ठाकरे आपल्या मतावर ठाम होते.  

शिवसेना जर नसेल तर मुंबईत आंदोलन कितपत यशस्वी ठरेल याची जोशींना चिंता वाटू लागली. या सभेचे नियोजन तेव्हा शेतकरी संघटनेत असलेल्या अनिल गोटेंकडे देण्यात आले होते. ते आणि त्यांचे सहकारी महिनाभर झाले भिंती रंगवण्यापासून ते स्टेज उभारण्यापर्यंत प्रत्येक कामात गुंतले होते.

जेव्हा शिवसेनाप्रमुख येणार नाहीत हे अनिल गोटेंना कळालं तेव्हा त्यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी थेट छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधला.

भुजबळ तेव्हा शिवसेनेचे फायर ब्रँड नेते म्हणून फेमस होते. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नव्हता मात्र त्याकाळापासून त्यांच्यात शिवसेने विरुद्धची बंडखोरी उफाळून येत होती. अनिल गोटे त्यांना जाऊन भेटले आणि सांगितलं,

“मुंबई शहरात एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी येणार तेव्हा त्यांच्या स्वागताला जाण्याचा मान प्रथम नागरिक म्हणून महापौरांचा आहे. पक्षाचा पाठिंबा असो किंवा नसो महापौराने आपले काम केलेच पाहिजे.”

अनिल गोटेंच म्हणणं भुजबळांना पटलं. त्यांना बोलवण्यामागे शेतकरी संघटनेचे आणखी एक छुपे कारण होते. शिवाजी पार्क मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका उंच चबुतऱ्यावर उभा केला आहे. कार्यक्रमाची सुरवात शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून करण्याची पद्धत होती पण पुतळा उंच असल्यामुळे क्रेनच्या साहाय्याने वर जाऊन हार घालावा लागे. या क्रेनचे भाडे त्याकाळी पंचवीस ते तीस हजार इतके होते. शेतकरी संघटनेकडे एवढी पैसे नव्हते. महापौर जर आले तर त्यांना पुतळ्याला हार घालण्यासाठी महानगरपालिकेचा क्रेन फुकटात मिळेल हा हिशोब गोटेंनी केला होता.

सभेच्या दिवशी भगवा फेटा बांधून छगन भुजबळ मोठ्या झगमगाटात ते शिवाजी पार्क ला हजर झाले. फायर ब्रिगेडच्या क्रेनमध्ये चढून त्यांनी रुबाबात पुतळ्याला हार घातला. कॅमेऱ्याचे फ्लॅश चमकले. या सभेचं सर्व लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं.

शरद जोशी आपल्या अंगारमळा या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केला आहे.

बाळासाहेबांना डॉ.दत्ता सामंत सभेत असणे हे जसे पसंत नव्हते तसे दत्ता सामंतांना भुजबळ स्टेजवर आलेलं पसंत पडलं नाही. त्यांनी आपले कामगार चळवळीतील कार्यकर्ते स्टेजच्या अगदी पुढे बसवले होते. छगन भुजबळ यांचे जेव्हा स्वागताच्या भाषणासाठी आगमन झाले तेव्हा या कार्यकर्त्यांनी हुर्योबाजी सुरु केली. अगदी मुर्दाबादच्या देखील घोषणा दिल्या.

शरद जोशींनी शेजारी बसलेल्या दत्ता सामंतांना याबद्दल नाराजी व्यक्त केली. पण दत्ता सामंत यांनी थोडे दटावल्याचे नाटक केले पण हा सगळं बनाव होता. छगन भुजबळ नाराज होऊन सभेतून निघून गेले.

जर ती सभा यशस्वी झाली असती तर छगन भुजबळ त्याच दिवशी शिवसेनेतून बाहेर पडले असते. शरद जोशी आपल्या आठवणीत सांगतात, शिवसेनेतून त्यांना फोडण्याचं श्रेय नंतर शरद पवारांना गेले पण ते १२ डिसेंबर १९८७ रोजी अनिल गोटेंना मिळाले असते.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.