महाराष्ट्राचं पाणी पळवून गुजरातच्या कालव्याला शोभिवंत टाईल्स बसवल्या जाणार होत्या पण

आजकाल राज्य आणि केंद्र इथे जर वेगवेगळ्या पक्षाचे सरकार असले तर त्यांच्यात संघर्ष अटळ असतो. बऱ्याचदा राज्यातील कारभार आपल्या कलाने व्हावा म्हणून केंद्रातील सरकार प्रयत्नशील असतात. काहीवेळा राज्यातील नेते केंद्राची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांना विरोध देखील करायला जात नाहीत.

फारच कमी राज्य असे आहेत जे अन्यायाविरुद्ध केंद्रातल्या सरकार विरुद्ध आवाज उठवतात.

यात सर्वात आघाडीवर नाव येते महाराष्ट्र राज्याचे.

फक्त आजकाल नाही तर महाराष्ट्राचा इतिहासच बंडखोरीचा आहे. पूर्वी आपले राज्य मुंबईप्रांताचा भाग होते. यात गुजरातचा देखील समावेश होता. स्वातंत्र्यानंतर या राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर बनले मात्र त्यांच्यांनंतर आलेल्या मोररजीभाई देसाई यांनी राज्य सरकार चालवताना गुजरातला पक्षपतीपणा करण्याचे धोरण राबवले.

मोरारजी देसाई यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळीने जोर धरला. त्यांनी दडपशाही अवलंबली. मुंबईत गिरणी कामगारांच्या आंदोलनावर लाठ्या चालवल्या, पोलिसांच्या अत्याचारात शेकडोजण मृत्युमुखी पडले.

मोरारजी देसाई यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड असंतोषाचे वातावरण पसरले होते.

१९५७ च्या निवडणुकीत याचा फटका काँग्रेसला बसला. लोकसभेच्या ४४ पैकी २१ आणि विधानसभेच्या २६४ पैकी केवळ १३५ ठिकाणीच विजय मिळाला. या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने निवडणुकीत भाग घेतला व काँग्रेसच्या वर्चस्वाला जबरदस्त हादरा दिला. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई शहर व कोकणात समितीने जोरदार मुसंडी मारत चांगले यश मिळाले, फक्त गुजरात मध्ये मिळालेल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने सत्ता राखली.

राज्यातील असंतोषाची प्रखरता कमी करण्यासाठी नेहरूंनी त्यांना राज्यातून केंद्रात नेले व अर्थ मंत्री बनवले.

द्विभाषिक राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कराडचे यशवंतराव चव्हाण बसले.

कराडजवळच्याच पाटणचे दौलतराव उर्फ बाळासाहेब देसाई त्यांच्या मंत्रीमंडळात  बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते.

बाळासाहेब देसाई म्हणजे काँग्रेस पक्षातील मोठे प्रस्थ. यशवंतराव चव्हाणांशी त्यांची स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून मैत्री होती. कडक शिस्तीचा हा लोकनेता. अस म्हणतात की त्यांचा पारा चढला की अख्ख मंत्रालय थरथर कापायचं. आपल्या खात्यावर त्यांची मजबूत पकड होती.

मराठी जनतेचा उद्धार करायचा असेल तर विकास कामांना गती दिली पाहिजे हे बाळासाहेब देसाईंनी मनावर घेतले होत.

सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री झाल्यापासून त्यांनी राज्याच्या बांधकाम क्षेत्राचा बारकाईने व तौलनिक अभ्यास केला. प्रत्येक विकास योजना या मंत्रालयाच्या माध्यमातून अंमलात आणली जात असल्यामुळे हे खातं अति महत्वाचं मानलं जायचं. मधल्या काळात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष भरून काढायचा होता.

अशातच मोरारजी देसाई यांनी संपूर्ण देशाचा कुप्रसिद्ध अर्थसंकल्प मांडला.

भांडवलशाही विचारांच्या मोरारजी देसाई यांनी नेहरूंच्या समाजवादी विचारसरणीच्या विरुद्ध भूमिका घेऊन व्यापारी वर्गाच्या फायद्याचं बजेट मांडलं होतं.
सर्वत्र या अर्थसंकल्पावर टीका होत होती. महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पात प्रचंड मोठा ठेंगा मिळाला होता.

मोरारजी देसाई केंद्रात गेल्यावरही महाराष्ट्राशी वैरभाव राखूनच होते.

बाळासाहेब देसाई यांनी या अर्थसंकल्पाचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की द्विभाषिक राज्याच्या रस्ते खर्चासाठी केंद्राकडून सोळा कोटी रुपये देण्यात आले होते, पण यातले फक्त दोन कोटी महाराष्ट्रासाठी व चौदा कोटी गुजरातसाठी ठेवले गेले होते.

इतकंच नाही तर गुजरातमधील पाटबंधारे कालव्यांची (कॅनॉल्स) कामे शोभीवंत फरशी (टाइल्स) बसवून करण्याचे ठरले होते.

हे पाहून तर बाळासाहेबांना प्रचंड धक्का बसला. मोरारजी देसाई यांनी द्वेषपूर्ण राजकारण केलं होतं.  हा महाराष्ट्रावर होणारा अन्याय बाळासाहेब देसाई यांनी कणखरपणे पुराव्यांसह मांडला. अगदी पंतप्रधानांच्या पर्यंत हा विषय गेला. देशभर केंद्र सरकारची नाचक्की झाली.

नेहरूंच्या दबावामुळे मोरारजी देसाई यांनी गुजरातच्या कालव्याला शोभिवंत टाईल्स बसवण्याचा निर्णय मागे घेऊन महाराष्ट्राच्या वाटणीचे पैसे परत वळवले.

परिणामी महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी चौदा कोटी रु. तसेच इतर योजनांवरही खर्च करण्याचा निर्णय झाला.

मुंबई-गोवा हमरस्ता, भुईबावडा व करूळसारखे घाट रस्ते, किल्ले व खेड्यांकडे जाणारे रस्ते, पूल, कालवे इ. कामे त्यांनी केली. कोयना धरण योजनेला आर्थिक, प्रशासकीय, मनुष्यबळ इ. सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यात बाळासाहेब देसाई यांनी पुढाकार घेतला.

खरंतर मोरारजीभाई देसाई आणि बाळासाहेब देसाई हे एकाच पक्षातले, एकाच गटात असलेले नेते मात्र आपल्या भागाचा विकास करण्यासाठी त्यांनी कधी तडजोड केली नाही. बाळासाहेबांनी आपल्याच नेत्यांशी भांडून महाराष्ट्राचा हक्क मिळवून घेतला

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. vighnesh says

    morarji desai ni aplya aushat kadhi kuthla changla kam kelel ka???

Leave A Reply

Your email address will not be published.