प्रचारात हिंदूत्वाचा मुद्दा आणला म्हणून बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार गेला होता..

राज्यसभेच्या निवडणूकीत आत्ता आक्षेपवॉर सुरू झालं आहे. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर व सुहास कांदे यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाडांनी आपली मतपत्रिका जयंत  पाटलांना दाखवली तर यशोमती ठाकूर यांनी आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिली असा आक्षेप भाजपने घेतला आहे.

तर दूसरीकडे रवी राणा यांच्या मतावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यांनी हनुमान चालीसा दाखवून मतदान करणाऱ्यांवर प्रभाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यावर उत्तर देताना हनुमान चालीसा दाखवली म्हणून मतदानावर काय प्रभाव पडणार, शिवसेनेला हनुमान चालीसाचं वावडं कधीपासून झालं असा सवाल रवी राणा यांनी केला आहे.

आत्ता हनुमान चालीसा दाखवल्यानंतर मतदारांवर प्रभाव पडतो का नाही याचा निर्णय निवडणूक आयोग देईल. पण मुद्दा असा आहे की अशाप्रकारे धर्माशी संबंधित गोष्टी दाखवल्याने मतदान रद्द होते का…

त्यासाठी 1987 ची घटना पहावी लागेल..

विलेपार्ले मतदारसंघातून आमदार असणारे कॉंग्रेसचे हंसराज भुग्रा यांच निधन झालं. त्यांच्या निधनानंतर विलेपार्ले येथे पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत कॉंग्रेसने प्रभाकर कुंटे यांना उमेदवारी दिली.

प्रभाकर कुंटे हे त्याकाळचं कॉंग्रेसमधलं मोठ्ठ नाव होतं. ते पडतील अशी कोणतीच चिन्ह नव्हती. कॉंग्रेसच काय तर कॉंग्रेसत्तर पक्षांचा देखील त्यांना पाठिंबा होता तो त्यांच्या समाजवादी विचारांमुळे. कॉंग्रेसतर्फे या निवडणुकीत हंसराज भुग्रा यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय झाला होता. तर जनता पक्षाने प्राणलाल व्होरा यांना उमेदवारी दिली होती.

या पार्श्वभूमीवर एक घटना घडून गेली होती. त्याचा उल्लेख इथे करावा लागेल.

त्या वेळी मुंबईचे महापौर म्हणून डॉ. रमेश प्रभू कार्यभार पहात होते. महापालिकेत कामकाज चालू असताना रुस्तम तिरंदाजांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांवर उत्तर देत असताना महापौर रमेश प्रभू म्हणाले की,

होय मी हिंदू मेयर आहे. माझे आईवडिल हिंदू आहेत आणि मला हिंदू म्हणवून घेणे कमीपणाचे वाटत नाही.

महापौरांनी स्वत:च्या धर्माचा उल्लेख करणे हा चर्चेचा विषय होता. त्यात त्यांनी स्वत:ला हिंदू महापौर म्हणवून घेतलं होते. त्यांच्या विधानाचे पडसाद संपुर्ण देशभर उमटू लागले. इतकच काय तर कलकत्ता येथे झालेल्या महापौरांच्या परिषदेमध्ये रमेश प्रभू यांचा या वक्तव्याबद्दल सत्कार देखील करण्यात आला.

याच पार्श्वभूमीनंतर विलेपार्लेची पोटनिवडणूक लागली.

बाळासाहेब ठाकरेंनी तत्पुर्वी औरंगाबादच्या कत्तलखान्याचा प्रश्न उपस्थित करुन हिंदूत्त्वाची एक झलक दिलीच होती. रमेश प्रभूंच्या वक्तव्याच्या निमित्ताने का होईना हिंदूत्वाचा प्रश्न चर्चेत आला आणि बाळासाहेबांनी एक निर्णय महत्वाचा निर्णय घेतला.

त्यांनी रमेश प्रभू यांनाच विलेपार्ले येथून निवडणूकीच्या मैदानात उतरवायचं ठरवलं. एका दिवसात निर्णय होवू अर्ज दाखल करण्यात आला. आणि पुढे जो प्रचार झाला त्यातून संपुर्ण भारतात विलेपार्ले १९८७ ची इलेक्शन अजरामर झाली.

प्रचारासाठी पहिली सभा आयोजित करण्यात आली.

या पहिल्याच सभेला हिंदूत्त्वाचा जाज्वल्य अभिमान असणारे शंभू महाराज उपस्थित होते. व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे आणि शंभू महाराज आणि पाठिमागे कृष्ण अर्जूना भगवतगीता सांगतो असे दृश्य होते. या सभेला मोठ्ठा समुदाय उपस्थित राहिला.

मुंबईच्या सर्व भागातून पार्ल्यामध्ये शिवसैनिक एकवटले होते आणि इथेच घोषणा देण्यात आली की,

गर्व से कहों हम हिंदू हैं !!!

या घोषणेनंतर वातावरण कमालीच बदललं. सुरवातील एकहाती वाटणारी हि निवडणुक आत्ता तिरंगी झाली. या निवडणुकीत जनता दलातर्फे उभा राहिलेल्या प्राणलाल व्होरा यांनी भाजपने पाठिंबा दिला होता. निवडणूकींचा रंग आत्ता भगवा झाला होता. संपुर्ण मुंबईतल्या शिवसैनिकांनी विलेपार्ले मतदारसंघात तळ ठोकला होता.

जागोजागी हिंदूत्वाचा गजर करण्यात येवू लागला होता. हिंदूत्वाच्या नावावर होणारी हि देशातील पहिली निवडणूक होती.

या प्रचारानंतर कॉंग्रेसचे धाबे दणाणले. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व्यक्तिश: या मतदारसंघात तळ ठोकून होते. एकच पोटनिवडणूक संपुर्ण भारतात चर्चेला येवू लागली.  हिंदूत्त्वाच्या थेट प्रचारामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांसारख्या संघटना देखील शिवसेनेचा प्रचार करु लागल्या. या काळात भाजपने सेनेच्या विरोधात म्हणजेच जनता दलास साथ देत होती.

निकाल लागला आणि अपेक्षित परिणाम साध्य झाला. सेनेचे रमेश प्रभू आमदार म्हणून निवडून आले.

ते पहिल्यांदाच आमदार झाले मात्र कॉंग्रेसचे उमेदवार प्रभाकर कुंटे यांनी या निवडणूकीत झालेल्या प्रचारामुळे उच्च न्यायालयात धाव घेतली. लोकप्रतिनिधी कायदा १९५२ नुसार धर्माच्या आधारावर मते मागितल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने हि निवडणुक रद्द ठरवली. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने देखील शिक्कामोर्तब केले.

कुंटे यांनी उच्च न्यायलयात जो दावा ठोकला होता त्या बाजूने न्यायालयात भूमिका मांडण्याच काम ॲड. एम.पी.वशी यांनी केलं होतं तर शिवसेनेच्या बाजूने भूमिका मांडण्याच काम राम जेठमलानी आणि अधिक शिरोडकर यांनी केलं होतं. कोर्टाने हि निवडणूक रद्द ठरवलीच पण,

बाळासाहेबांनी धर्माच्या नावावर मत मागितल्याने त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला. एखाद्या भारतीय नागरिकाचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याची हि दुर्मिळच घटना होती.

१९९९ ते २००५ या सहा वर्षात बाळासाहेब ठाकरे मतदान करू शकले नाहीत.

आत्ता आजच्या निवडणूकीत रवी राणा यांनी हनुमान चालीस मतदान करताना दाखवली म्हणून शिवसेनेनं आक्षेप घेण्यात आल्याचं सांगण्यात येतय.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.