अशोकमामांचं माहित नाही, पण दादा कोंडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते…

अशोक सराफ म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके अशोकमामा. वयाची ७५ वर्ष पूर्ण करणाऱ्या अशोकमामांनी आपल्याला पोट दुखेस्तोवर हसवलं आणि हळव्या सिनमधून डोळ्यात पाणीही आणलं. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या ‘अशोकपर्व’ या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं, ते म्हणाले, ‘अशोक सराफ दक्षिणेत जन्माला आले असते तर मुख्यमंत्री झाले असते.’

यावरुन साहजिक एक प्रश्न पडतो, की साऊथमध्ये होतात तसे महाराष्ट्रात अभिनेते मुख्यमंत्री, मंत्री का होत नाहीत ? त्यांना अशी संधी का मिळत नाही ?

पण असं एकदा झालं होतं, आपला एक मराठी हिरो मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या जवळ जाऊन पोहचला होता.  

स्वर्गीय दादा कोंडके यांना आपण मराठीतले सुपरस्टार म्हणून ओळखतो. आपल्या अस्सल ग्रामीण ठसकेबाज संवादाने त्यांनी केलेली कॉमेडी सगळ्या महाराष्ट्राला खिळवून ठेवायची. फक्त महाराष्ट्रातच नाही तर मराठी न कळणारे लोकही त्यांचे फॅन होते. लोकांच्याच्या मनावर राज्य करणारा हा बादशाह राजकारणापासून अलिप्त राहिला असता तर नवलच.

खर तर त्यांच्या कलेला वाव पहिल्यांदा राजकीय मंचावरच मिळाला होता.

एस.एम.जोशी, मधु दंडवते अशा समाजवादी नेत्यांच्या सेवादलातील कलापथकातून राम नगरकर, निळू फुले, दादा कोंडके यांनी लोकनाट्यात अभिनय करायला गाणी गायला सुरवात केली होती. कलापथकातील कामासोबतच कधीकधी काही राजकीय कामे सुद्धा दादा कोंडके करत असत. कधी कधी समाजवादी पक्षाचा संप असला तर दादांना नायगावमधील गिरण्या बंद पाडण्याची जबाबदारी दिलेली असायची.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही समाजवादी पक्षाकडून दादा कोंडकेंनी शाहीर अमर शेख यांच्या सोबत अनेक कार्यक्रम केले. 

पुढे जेव्हा सेवा दलाची कलापथके बंद पडली तेव्हा दादा कोंडकेंनी विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य बसवले. ते खूप गाजलं, त्यातूनच त्यांना सिनेमाच्या ऑफर मिळाल्या. दादा कोंडके सिनेमात रमले आणि राजकारणाशी त्यांचा संबंध कमी होत गेला.

पण म्हणतात नां तुम्ही राजकारणापासून दूर राहू शकता पण राजकारण तुमच्या पासून दूर राहू शकत नाही. दादा कोंडकेंच्या बाबतीतही तसच झालं.

त्यांचा पहिलाच चित्रपट सोंगाड्या जेव्हा मुंबईमध्ये रिलीज होणार होता तेव्हा कोहिनूर नावाच्या थिएटरने करार करूनही ऐन वेळी सोंगाड्या ऐवजी दुसराच हिंदी सिनेमा रिलीज केला.

दादा कोंडकेंच धाब दणाणल. त्यांनी आपली ओळख असणाऱ्या वसंतदादा पाटील, मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे तक्रार करून पाहिली पण थिएटरच्या पंजाबी मालकावर कारवाई करण्याकडे त्यांनी दुर्लक्षच केलं.

अखेर दादांना कोणी तरी सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंकडे जा.

तेव्हा त्या दोघांची विशेष अशी ओळखही नव्हती. मुंबईत मराठीत माणूस टिकावा म्हणून बाळासाहेबांनी नुकतीच शिवसेनेची स्थापना केली होती. दादांवरील अन्याय कळल्यावर बाळासाहेब आपल्या शिवसैनिकांना घेऊन स्वतः कोहिनूर थिएटरवर आले. तिथल्या कपूर नावाच्या मालकाला मराठी माणसाचा हिसका दाखवला आणि सोंगाड्या ताबोडतोब रिलीज करायला लावला.

त्याच दिवशी बाळासाहेबांनी दादा कोंडकेनां जिंकल होतं. ते मनातून कायमचे शिवसैनिक झाले.

बाळसाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांच्या अखंड मैत्रीची ही सुरवात होती. दादांचा प्रत्येक सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडे जाण्यापूर्वी शिवसेनाप्रमुखांना दाखवला जायचा. बाळासाहेब हे राजकिय नेते असले तरी ते सर्वप्रथम कलावंत होते. त्यांना सिनेमा बघायची आवड होती आणि ते कलावंतांचा खूप आदर देखील करायचे. दादांवर तर त्यांचा विशेष जीव होता.

काही कारणांनी बाळासाहेब रागावले तर त्यांचा राग कमी व्हावा म्हणून मीनाताई ठाकरे दादा कोंडकेना फोन करून मध्यरात्री बोलवून घ्यायच्या. आणि दादा देखील आपल्या गंमतीशीर गप्पांनी बाळासाहेबांनां हसवून हसवून त्यांचा मूड बदलून टाकायचे.

पुढे बाळासाहेबांनी दादाना आपल्या सभांना न्यायला चालू केलं.

आधीच दादांची लोकप्रियता अफाट होती. भाषणाच्या बाबतीत त्यांनी ठाकरी स्टाईलबरोबर पकडली होती. जेव्हा शंकरराव चव्हाण कॉंग्रेसचे मुख्यमंत्री होते तेव्हा सगळ्यात आधी  त्यांच्यावर दादा कोंडकेंच्या प्रचाराची तोफ धडाडली होती. पुढे शरद पवारांनी कॉंग्रेस फोडून पुलोद आघाडी बनवली व त्याचे मुख्यमंत्री बनले. काही वर्षांनी परत कॉंग्रेसमध्ये आले यावरून दादा कोंडके त्यांची यथेच्छ टिंगल उडवीत.

एकदा तर एका भाषणात ते म्हणाले,

“आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळतंय म्हणून शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांचा विचार न करता दाणकन उडी मारली ती इथे येऊन आय घातली.”

थोड थांबून ते म्हणाले,

“आय घातली म्हणजे मी इंग्रजी आय म्हणतोय. पवारांनी आय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला याचा अर्थ नावात आय घातली नाही का?”

लोक त्यांच्या या द्विअर्थी संवादाने खूप हसायचे. दादांच्या प्रचारसभांचा शिवसेनेला कितपत फायदा झाला माहित नाही पण दादा कोंडकेंच भाषण म्हणजे हमखास तुफान गर्दी व्हायची. दादा कोंडके शिवसेनेमुळे राजकारणात चांगलेच रुळले.

दक्षिणेत एनटीरामाराव सारखे फिल्मस्टार राजकरणात येऊन मुख्यमंत्री झाले आहेत तसेच महाराष्ट्रात घडलं नव्हत. यावरून बऱ्याचदा बाळासाहेब दादा कोंडकेंना गंमतीत म्हणायचे,

“शिवसेनेची सत्ता आली तर दादा कोंडके महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार”

१९९५ सालच्या निवडणुकीवेळी शिवसेनेने तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांविरुद्ध जोरदार प्रचार सुरु केला. खुद्द बाळासाहेब तेव्हा फॉर्मात होते. मुंबईतील बॉम्बस्फोट, बाबरी मशिदीनंतरची दंगल या सगळ्या काळात सरकारविरुद्धचा असंतोष वाढला होता.

शिवसेनेच्या प्रचारात दादा कोंडके स्टारप्रचारक होते. राज्यभर त्यांनी पवारांच्या आणि कॉंग्रेसच्या विरोधात धुरळा उडवून दिला होता.

निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला. पहिल्यांदाच मराठी जनतेने गैर काँग्रेसी युतीच्या पारड्यात आपले मत टाकले होते. विधानभवनावर भगवा फडकवायचं बाळासाहेबांच स्वप्न पूर्ण झालं होतं. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे नक्की होते. पण कोण होणार याबद्दल नेत्यांची बैठक मातोश्रीवर बोलवण्यात आली.

मिटिंगमध्ये मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव महाडिक असे अनेक मोठे नेते हजर होते. दादा कोंडकेही तिथे उपस्थित होते. सर्वप्रथम बाळासाहेबांनी दादांना प्रश्न विचारला,

“बोला दादा तुम्हाला कोणते पद पाहिजे?”

युती सरकारमध्ये दादांना हवे ते पद देण्यास शिवसेनाप्रमुख तयार होते हे बघितल्यावर इतर शिवसेना नेत्यांना धक्काच बसला. त्यांना वाटल बाळासाहेब गंमत करत आहेत. तस नव्हत, बाळासाहेबांना खरोखर वाटत होतं की दादा कोंडकेंनी कमीतकमी मंत्रीपद तरी घ्याव.  

पण दादांना ठाऊक होते की एकदा सक्रीय राजकारणी म्हणून आपली इमेज झाली तर सामान्य जनता कलाकार म्हणून प्रेम देते आहे तेही बंद करणार. त्यापेक्षा त्या वाटेला न गेलेलंच बरं. त्यांनी बाळासाहेबांना प्रतिप्रश्न केला,

” साहेब तुम्ही कुठलं पद घेणार?”

बाळासाहेबांनी आपण शिवसेनाप्रमुखच राहणार सत्तेचा रिमोट हातात ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं. मग त्यावर दादा म्हणाले,

“जर तुम्ही शिवसेना प्रमुख राहणार आहात तर मग माझा शिवसैनिक राहण्याचा हक्क तुम्ही का हिरावून घेत आहे? मीही फक्त शिवसैनिक राहणार. तो मान माझ्यासाठी जास्त मोठा आहे. मला कोणतेही पद नको.”

दादा कोंडकेंच्या “एकटा जीव सदाशिव” या आत्मचरित्रात त्यांनी हा किस्सा सांगितला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.