बाळासाहेब ठाकरेंवर झालेले दोन जीवघेणे हल्ले… 

बाळासाहेब ठाकरेंचा दरारा पाहता त्यांच्यावर कोणी जीवघेणा हल्ला केला असेल यांची कल्पना देखील कोणी करु शकत नाही. पण राजकारणात आणि प्रत्यक्ष आयुष्यात देखील वाघाप्रमाणे जगलेल्या बाळासाहेबांवर देखील जीवघेणा हल्ला झाला होता.

तो देखील एकदा नाही दोनदा. या दोन्ही हल्ल्यामध्ये बाळासाहेबांनी जे धाडस दाखवलं होतं त्यामुळे बाळासाहेबांना खऱ्या अर्थाने वाघ म्हणावं लागतं. 

साल होतं १९६९ सालच.

तेव्हा बाळासाहेब ठाकरेंची नागपुरला सभा होती. नागपुरची सभा संपवून त्यांना लागलीच मुंबईला परतायचं होतं. रात्रीचे दिड वाजले होते आणि बाळासाहेब ठाकरे आपल्या अन्य तीन शिवसैनिकांसह नागपुरच्या विमानतळावर आले. विमानतळावरच त्यांना पंडित नेहरूंची प्रस्तावना असलेलं वाईल्ड लाईफ इन इंडिया हे पुस्तक दिसलं. ते विकत घेवून ते वाचू लागले तोच दिलीप देवधर घाबऱ्या आवाजात पळत त्यांच्याजवळ आले. 

दिलीप देवधर सांगू लागले की, 

नागपूरच्या कुप्रसिद्ध लालभाईपैकी नायडू, चौबे, यादव, पाटील असे दहा जणांचे टोळके तुमच्या मागावर इथे आले आहे. सावधगिरी म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी तिथेच असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. हा प्रकार होतो तोच ते टोळके बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ आले. नायडूने बाळासाहेब ठाकरेंसोबत चर्चा करायची आहे अशी मागणी केली. चर्चा करणे हा फक्त बनाव असल्याचं बाळासाहेब ठाकरेंना लक्षात आलं.

त्यांनी नकार देताच नायडू म्हणाला,

इतना बडां नेता होकर चर्चा नही कर सकता तो अपमान करना पडेगा. 

अस म्हणतच त्याने खिश्यात हात घातला. त्याची संशयास्पद हालचाल पाहून बाळासाहेब ठाकरेंना अंदाज आला. नायडूला पहिला तडका दिला तो खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच. सोबत असणारे तिन शिवसैनिक देखील त्या दहा जणांच्या टोळक्यावर तुटून पडले. या हाणामारीत चौबे नावाचा इसम कुंपणावरुन उडी मारून पळून गेला.

तिथे असणारे पोलीस देखील मध्ये पडले नाहीत. या घटनेनंतर शिवसैनिकांना हरवणे किती अशक्य आहे याचं उत्तरच त्या टोळक्याला मिळाले. 

बाळासाहेब ठाकरेंवर दूसरा जिवघेणा हल्ला झाला होता तो माहिममध्ये.

सुरवातीच्या काळातच बाळासाहेब सपत्निक दादरहून वांद्र्याला जाण्यासाठी निघाले होते. गाडी बाळासाहेब चालवत होते तर शेजारी मिनाताई बसल्या होत्या. याच वेळी गाडी माहिममध्ये आली. एका टॅक्सी ड्रायव्हरने बाळासाहेबांच्या गाडीच्या आडवी त्यांची टॅक्सी मारली. निमित्त झाले आणि टॅक्सीड्रायव्हर बाळासाहेबांची गाडी आडवी लावून भांडू लागला. तो भाग मुस्लिम बहुल असल्याने बघ्यांची गर्दी झाली.

टॅक्सी ड्रायव्हर देखील मुस्लीम असल्याने जमावातील काही जण बाळासाहेबांच्या अंगावर धावून येवू लागले. एकंदरित परिस्थिती ओळखून बाळासाहेबांनी आपल्या खिश्यातून रिव्हॉल्व्हर काढली आणि जमावावर रोखली. बाळासाहेब त्या स्थितीत थेट पोलिस स्टेशनला आले. तिथे उर्वरीत मुस्लीम समुदायानेच बाळासाहेबांची बाजू घेतली आणि टॅक्सी ड्रायव्हरला अद्दल घडवली. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.