खूप टीका सुरु झाली कि बाळासाहेब परबांना सांगायचे, ” अनिल त्या केबलच्या तारा खेच.”

बाळासाहेब ठाकरे म्हणजे रोखठोक व्यक्तिमत्व. त्यांचा लोकशाही पेक्षा ठोकशाही वर जास्त विश्वास होता. त्यांचे वैशिष्ट्य हे की त्यांच्यावर कितीही टीका झाली तरी ते आपली भूमिका स्पष्ट मांडायला कधी मागे पुढे पाहायचे नाहीत.

बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांमध्ये एक नाव येत ते म्हणजे अनिल परब.

अनिल परब यांचं घर आहे बांद्र्याच्या गांधी नगर येथे. बाळासाहेबांच्या मातोश्रीपासून फक्त काहीच अंतरावर. अगदी लहान वयापासून अनिल परब बाळासाहेबांच्या भाषणांचे प्रचंड मोठे फॅन होते. मुंबईत तेव्हा बाळासाहेबांनी मराठी माणसाचा आवाज बुलंद केला होता. तरुणाईला शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाने वेड लावलं होतं.

कॉलेजमध्ये असतानाच अनिल परब विद्यार्थी सेनेमध्ये सक्रिय झाले. त्यांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केल्यावर मुंबई हाय कोर्टात प्रॅक्टिस सुरु केली. याच काळात ते शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांच्या संपर्कात आले.

मधुकर सरपोतदार सेनेच्या पहिल्या फळीचे नेते होते. त्यांच्यामुळेच अनिल परबांचं मातोश्रीवर येणं जाणं सुरु झालं. बाळासाहेबांना हा उत्साही तरुण प्रचंड आवडला. अनिल परब यांचं राजकारणातील वजन वाढू लागलं. बाळासाहेबांचा त्यांच्यावरचा विश्वास एवढा वाढला कि पुढे पुढे त्यांचे कायदेशीर सल्लागार पण अनिल परब हेच बनले.

राजकारणाबरोबरच अनिल परब यांनी आणखी एका क्षेत्रात हातपाय पसरले. ते क्षेत्र होतं केबल.

साधारण नव्वदच्या दशकात भारतात जागतिकीकरण आलं. भारतात दूरदर्शनचा ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना जाऊन झी,सोनी,स्टार या केबल चॅनल्सचा झगमगाट आला. न्यूज चॅनल्स आले, त्यांची ब्रेकिंग न्यूज साठीची धडपड आली.

शेकडो चॅनल्स आले त्याप्रमाणे शेकडो केबल ऑपरेटर कंपन्या आल्या. या केबल ऑपरेटर मधील वॉर देखील एक गाजलेला विषय. राजकीय वजन असलेल्या व्यक्ती या केबल क्षेत्रात उतरल्या होत्या. अनिल परबांनी यात बाजी मारली.

ते केबल ऑपरेटर डिस्ट्रिब्युशन असोशिएशनचे अध्यक्ष बनले. केबल ऑपरेटिंग क्षेत्रावर त्यांनी एक हाती वर्चस्व निर्माण केलं.

पुढे नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा मुंबईत कोकणातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा भरवण्यात आला होता. बाळासाहेबांनी तेव्हा आपल्या भाषणात पक्षाशी गद्दारी करणाऱ्या नारायण राणे यांची यथेच्छ धुलाई केली. सोबतच आपल्या विरुद्ध बातम्या पेरणाऱ्या माध्यमांना देखील त्यांनी फटकारले.

बाळासाहेब ठाकरे प्रसारमाध्यमे कसा पक्षपाती पणा करतात हे सांगताना त्यांनी एक गंमत सांगितली. ते म्हणाले,

“जेव्हा जेव्हा माझ्यावर न्यूज चॅनल वरून टीका वाढते तेव्हा मी अनिल परबला फोन लावतो आणि सांगतो, केबलच्या तारा खेच. लगेच सगळं बंद. ” 

अनिल परब बाळासाहेबांच्या आदेशानुसार न्यूज चॅनेलच प्रक्षेपणच बंद करून टाकायचे. तेव्हा गयावया करत चॅनेलच्या मालकांचा मातोश्रीवर फोन यायचा. बाळासाहेब त्यांना म्हणायचे,

“तुम्ही पाकिटे घेऊन आमच्या विरुद्ध बातम्या लावणार ते बरोबर आणि आम्ही करेल ते चूक. हे कस चालेल ?”

 आज डीटू एचच्या काळातही अनिल परब यांच्याकडे आपल्या एका इशाऱ्यावर मुंबईच्या चॅनेल्सच प्रक्षेपण बंद पाडायची पॉवर आहे. मध्यन्तरी बिग बॉस प्रकरणावरून कलर्स चॅनलला आणि अरब गोस्वामी प्रकरणात रिपब्लिकन चॅनेल बंद पाडून हे सिद्धच केलं आहे.

हे हि वाच भिडू.  

Leave A Reply

Your email address will not be published.