दसरा मेळावा घ्यायचा कि नाही हे बाळासाहेबांनी एका पत्रकाराला विचारून ठरवलं होतं…
हो..हि घटना तेंव्हाची आहे जेंव्हा बाळासाहेबांवर मोठं संकट आलं होतं. त्यांच्या प्रत्येक निर्णयात आणि त्यांच्या एकूण वाटचालीत ज्यांचा मोलाचा सहभाग होता त्या त्यांच्या पत्नी मीनाताई बाळासाहेबांना सोडून गेल्या होत्या. हा किस्सा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या लेखामध्ये सांगितला आहे.
१९९५ मध्ये मीनाताईंचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर तीन आठवड्यांनी भाऊ बाळासाहेबांना गर्दी संपल्यावर भेटायला गेले होते.
तेंव्हा मातोश्री बंगल्याचे नूतनीकरण चालू होते आणि बाळासाहेबांचे वास्तव्य हिंदू कॉलनीच्या एका इमारतीमध्ये होते. या भेटीत फक्त भाऊ एकटेच नव्हते तर त्यांच्यासोबत ‘दै. पुण्य नगरी’चे मालक मुरलीधरशेठ शिंगोटेही सोबत होते. त्या दिवशी रोजच्या सारख्या गप्पा झाल्या नाहीत. जवळपास एकटेच साहेब बोलत होते. मीनाताईंच्या निधनाचा घटनाक्रम त्यांनी सविस्तर सांगितला होता.
त्यांच्या अंत्ययात्रेचा अल्बमही दाखवला. तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. त्यांना मनातले सगळे बोलून टाकायचे होते; पण ते ऐकणारा कोणीतरी हवा होता. त्याची प्रतिक्रियाही त्यांना नको असावी. स्वागत केल्याप्रमाणे ते बोलत होते, फोटो दाखवत होते. दीड तासाने त्यांचे समाधान झाले आणि अचानक आपले बोलणे थांबवून बाळासाहेबांनी भाऊंना एक प्रश्न विचारला,
“या दसऱ्याला सभा न घेण्याबद्दल तुझे मत काय आहे?”
हा प्रश्न कानी पडताच भाऊ आश्चर्याने बाळासाहेबांकडे बघतच राहिले. त्यांना वाटून गेलं, “मी सामान्य पत्रकार आणि त्यांच्या संघटनेतला, पक्षातला कोणीच नाही. मग त्यांनी मला हा प्रश्न विचारावाच कशाला? तेव्हा त्यांच्या डोळ्यांचेही ऑपरेशन झाले होते. मीनाताईंच्या निधनाने बाळासाहेब कमालीचे विचलित झालेले होते. त्यामुळेच त्या वर्षीचा मेळावा रद्द करण्याच्या बातम्या चालू होत्या. पण भाऊंना हा प्रश्न कशाला विचारायचा?, यावर भाऊंनी उत्तर दिले,
“सभा व्हायलाच हवी. मीनाताई सभेला यायच्या आणि व्यासपीठासमोर महिलांच्या गर्दीत पुढ्यात बसायच्या. कधी त्या व्यासपीठावर आल्या नाहीत आणि त्यांच्या निधनासाठी सभाच रद्द ? मला नाही पटत,”
असे भाऊ बोलून गेले.
तरी यावर पुन्हा बाळासाहेबांनी प्रतिप्रश्न केला …’सभा व्हायलाच हवी?”
हा प्रश्न आला तरी भाऊ त्यांच्या मतावर ठाम होते आणि खरेच सभा झाली.
सभा झाली त्या रात्री त्यांनी भाऊंना अगत्याने फोन करून विचारले, “सभेला आला होतास? कशी झाली सभा?” भाऊ उत्तरले, “टाळ्या, घोषणा ऐकल्यात ना? मग कशी सभा झाली कशाला विचारता? तुम्ही तिथे उभे राहून बोललात म्हणजे झाले. शिवसैनिकांना तेच हवे असते. मग सभा यशस्वी होणारच.”…..
यावर बाळासाहेबांनी भाऊंना प्रश्न केला. “तुझे समाधान झाले?”
यावर भाऊ मात्र चकित झाले. मनोमन ते बोलले कि, “कमाल आहे या माणसाची. माझ्या समाधानाचा विषय कुठे होता”? पण भाऊंनी होकारार्थी उत्तर दिले तेव्हाच त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हणून फोन ठेवला.
त्याकाळच्या एका साधारण पत्रकाराचे मत बाळासाहेब विचारात घेतात हे खूप महत्वाचे आहे. सामान्य माणूस जो रस्त्याने पायपीट करीत चालतो, बस वा ट्रेनने प्रवास करतो. त्यामुळे लोकांच्या मनाचा अंदाज भाऊंना असू शकेल, असे बाळासाहेबांनी वाटत असेल का? देव जाणे, पण त्यांच्या मताच्या विरुद्ध बोलत असूनही त्यांनी अनेकदा भाऊंचे बोलणे शांतपणे ऐकले होते. त्यावर शंकाही विचारल्या आणि असाच एक अनुभव आहे.
एकदा भाऊ त्यांना भेटायला गेले तेव्हा खूप गर्दी होती. बाळासाहेबांसमोर एक भाजी विक्रेता महिला होती. बिचकत, दबल्या आवाजात बोलत होती. ते तिला म्हणाले,
“चांगल्या चढ्या आवाजात बोल. मला दमात घेऊन बोल. माझाच नगरसेवक आहे ना तुझ्या वॉर्डात?, मग घाबरून कशाला बोलतेस? मी काय घाबरायला शिकवले का मराठी माणसाला?”
एकीकडे अमिताभ बच्चन, उद्योगपती, परदेशी पाहुणे, बड्या मान्यवरांची मातोश्रीवर रेलचेल असायची आणि दुसरीकडे सामान्य गरजवंत माणसे झुंबड करून असायची.
तिसरीकडे भाऊंसारख्या सामान्य पत्रकाराला ते खास चर्चा करायला बोलावायचे. अशा सगळ्यांशीबाळासाहेब सारखेच वागत असत. ज्यांच्याकडे मोठमोठे उद्योगपती भेट मिळण्यासाठी प्रतीक्षा करत बसलेले असायचे.
हे ही वाच भिडू:
- एकदा चक्क संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात जोरदार वाद झाला होता
- या गोष्टींमुळे संजय राऊत बाळासाहेब ते उद्धव ठाकरेंचे खास होऊ शकले..
- घर बदलल्यावर राज ठाकरेंचं नशीब पण बदलतं, हा इतिहास आहे