बाळासाहेबांनी पाकिस्तानी क्रिकेटरला विचारलं, “भाऊ तोरसेकरला ओळखतोस का?”

भाऊ उर्फ गजाजन वसंत तोरसेकर. गेली पन्नास वर्षे पत्रकारितेत कार्यरत असलेले भाऊ हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चालता बोलता इतिहास. अगदी प्रिंटच्या काळापासून ते सध्याच्या ब्लॉग आणि युट्युब पर्यंत त्यांचा जागता पहारा सुरूच आहे. त्यांचं परखड विश्लेषण, त्यांची आक्रमक आणि स्पष्ट मतं यामुळे काही वेळा वाद देखील निर्माण झाले आहेत पण त्यांना दुर्लक्षित करून चालत नाही हे देखील तितकंच नक्की.

 भाऊ मूळचे आर्किटेक्चरचे विद्यार्थी पण पत्रकारितेकडे ओढ होती म्हणून त्यांनी आचार्य अत्रेंचं दैनिक मराठा जॉईन केलं. ते वर्ष होतं १९६९. तिथून साप्ताहिक भूपुत्र, ब्लिट्झ (मराठी), सकाळ (मुंबई) मधून पत्रकारीता केली. १९८५ ते १९८९ या काळात शिवसेनेचे मुखपत्र मार्मिक या साप्ताहिकातून कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले.

मार्मिकचे मुख्य संपादक होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. सामनाची निर्मिती होईपर्यंत मार्मिक हेच शिवसेनेचे मुखपत्र होते. बाळासाहेब ठाकरे अनेकदा कामासाठी तर कधीकधी फक्त गप्पा मारण्यासाठी भाऊंना आपल्या बंगल्यावर बोलवून घेत. राजकारणापासून ते सिनेमा क्रिकेट सगळ्या विषयांवर त्यांच्या गप्पा चालत.

कधी कधी भाऊ शिवसेनेच्या वाघाला सल्ला देण्याच धारिष्ट्य देखील दाखवत पण बाळासाहेब कधी मनाला लावून घेत नसत. आपल्याला भेटणारा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक व्यक्ती याच म्हणणं ऐकून घेण्याचं आणि योग्य वाटलं तर अंमलात देखील आणण्याचा दिलदारपणा बाळासाहेबांकडे होता. 

भाऊ तोरसेकर यांचा आक्रमकपणा आणि स्पष्टवक्तेपण त्यांना फार आवडायचं. भाऊ मार्मिक मधून बाहेर पडल्यावरही बाळासाहेब अनेकदा केवळ गप्पा ठोकायला ते बोलावून घेत. भाऊ तोरसेकर यांना त्याचे नेहमी आश्चर्य वाटायचे.

ते स्वतः कसलेही महत्वाचे काम घेउन त्यांच्याकडे कधीच जायचे नाहीत मात्र जेव्हा ते जायचे तेव्हा तास दोनतास सहज गप्पा मारत बसायचे. मग लोकांची येजा चालू असली तरी त्यांना फ़रक पडत नसे.

मार्मिकनंतर  विवेक, चित्रलेखा यांसारख्या सप्ताहिकांमध्ये भाऊ तोरसेकर यांनी काम केले.

१९९५ साली युतीची सत्ता आली तेव्हा सहज शक्य असूनही भाऊंनी बाळासाहेबांकडून आपली कामे करून घेतली नाहीत. अनेकदा बाळासाहेब त्याबद्दल उपरोधिक बोलूनही दाखवत असत ,

‘झोळी खांद्याला लावून भिका मागत फ़िरतोस, आपले सरकार येऊन काय फ़ायदा?’

पण का कोण जाणे भाऊंना त्या माणसाकडे काही मागावेसेच वाटत नसे. एवढा मोठा माणूस आपल्याला वेळ देतो आणि गप्पा मारायला अगत्याने बोलावतो, यातच त्यांना अभिमान वाटत असे.

अनेकदा बाळासाहेबांकडे मातोश्रीवर मोठमोठे उद्योगपती, क्रिकेटर, मंत्री वा आमदार, खासदार, कलावंत असे कोणीही बसलेले असत. पण त्यांचा गप्पांचा मुड असेल तर त्यांनी भाऊ तोरसेकर यांना  बसवून ठेवलेले असे.

भाऊ सांगतात,

कधीकधी त्या अन्य पाहुण्यांना हा कोण साधा सुध्या कपड्यातला माणूस बसला आहे हे पाहून थोडस  ओशाळल्यागत वाटायचे. पण त्यांच्या अस्वस्थतेला बाळासाहेबांनी कधी दादच दिली नाही.

पुढे भाऊ तोरसेकर आपला वार्ताहर’चे मुख्य संपादक म्हणून काम पाहू लागले. एकदा एका मित्राच्या आग्रहास्तव त्याचा दिवाळी अंक त्यांना द्यायला म्हणून भाऊ मातोश्रीवर गेले. तेव्हाही बाळासाहेबांनी त्यांना  थांबवून घेतले. तिथे पाकिस्तानचा सलामीचा फ़लंदाज मोहसिन खान त्यांना भेटायला आलेला होता.

मोहसीन खानचं फिल्म अभिनेत्री रिना रॉय सोबत लग्न झालं होतं आणि तो सध्या क्रिकेट सोडून बॉलिवूड मध्ये हातपाय मारण्याचा प्रयत्न करत होता. तिथे आणखीही काही मोठे लोक आले होते. सगळ्यांसमोर बाळासाहेबांनी भाऊंकडे बोट दाखवून मोहसीनला विचारलं,

” या भाऊ तोरसेकरला ओळखतोस काय?”

आता मोहसीन खान म्हणजे पाकिस्तानचा त्यात क्रिकेट खेळाडू त्याला भाऊ तोरसेकर नावाचा कोणी मराठी पत्रकार आहे, हे ठाऊक असायचे काय कारण होते? त्याने मान हलवली. यावर बाळासाहेब त्याला ऐटीत म्हणाले,

‘कमाल आहे, याला ओळखत नाहीस? हा मराठीतला अत्यंत आक्रमक लिहिणारा जहाल पत्रकार आहे.’

भाऊ आपल्या एका लेखात सांगतात बिचार्‍या मोहसिनचा ओशाळलेला चेहरा मला अजून आठवतो. 

हा विनोद नव्हता. भाऊ तोरसेकर यांची जहाल आक्रमक पत्रकारिता त्यांना आवडली, म्हणून अगदी दिलखुलासपणे दिलेली ती कौतुकाची पावती होती. भाऊ म्हणतात,  या माणसामध्ये एक अगदी निरागस मुल दडलेले होतं. लहान मुल जशा निरागसतेने बोलते व वागते, तेवढी निरागस वृत्ती त्यांच्यामध्ये आजही होती. त्यांनी स्वत:मध्ये दडलेले ते मुल कधी लपवले नाही, की त्याची गळचेपी सुद्धा केली नाही. जितक्या सहजतेने व्यासपीठावर उभा राहुन शिवसेनाप्रमुख म्हणुन ते बोलायचे; तेवढ्याच सहजपणे बंदिस्त खोलीत गप्पा करायचे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.