बाळासाहेब मनोहर जोशींना म्हणाले, “तुमचं सरकार गेलं खड्ड्यात, या पोरांना सोडवा.”

मुंबई पोलीसचे जांबाज अधिकारी  इसाक बागवान याना कोण ओळखत नाही? ऐंशीच्या दशकात मुंबईत वाढलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी यांनी कडक पावले उचलली  होती. अंडर वर्ल्डमध्ये दबदबा असणाऱ्या मन्या सुर्वेचा एन्काउंटर इसाक बागवान  यांनीच केला होता.

पण ही गोष्ट आहे त्याच्या खूप नंतरची. शिवसेना-भाजप युतीच तेव्हा सरकार होतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री बनले होते.

एके काळी शिवसेनेचा वाघ म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ यांनी काही काळापूर्वी पक्ष सोडला होता. शिवसैनिक त्याकाळात छगन भुजबळाना धडा शिकवण्यासाठी जंग जंग पछाडल होतं पण भुजबळ काही सापडले नव्हते. शरद पवारांच्या आश्रयामुळे ते काँग्रेस वासी झाले होते. युती सरकारच्या वेळी त्यांची नेमणूक विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतापदी झाली.

भुजबळ यांची मुलुख मैदान तोफ विधानभवनात गडगडू लागली. 

किणी प्रकरण व रमाबाई आंबेडकर नगर प्रकरणात भुजबळ यांनी शिवसेना सरकारचे वाभाडे काढले. शिवसेनेचा त्यांच्या वरील राग वाढत गेला होता. शिवसैनिक संधीची वाट बघत होते.

जुलै १९९७. रविवारचा दिवस होता.

छगन भुजबळांचा मुक्काम मंत्रालया समोरच्या अ-१० या शासकीय बंगल्यात होता. सकाळ सकाळी भुजबळांच्या घराबाहेर गर्दी गोळा होऊ लागली. घोषणाबाजी, गडबड सुरु झाली. खिडकीच्या काचा दगड फेकून तोडण्यात आल्या.

अचानक जमावाने भुजबळांच्या बंगल्यावर चाल केली. दरवाजा तोडून टाकला. दिसेल त्या वस्तूची तोडफोड करण्यास सुरवात केली. छगन भुजबळ आपल्या बेडरूममध्ये होते. त्यांना शोधत काही लोक तिथवर येऊन ठेपले.

मात्र भुजबळांच्या बॉडी गार्ड असलेल्या पोलिसाने समयसूचकता दाखवली आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

हे सगळं घडत होतं महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या इमारती समोर असलेल्या बंगल्यामध्ये.

मंत्रालयात ड्युटीवर एसीपी इसाक बागवान होते. कारवाई केली नाही तर हा जमाव आटोक्यात येत नाही हे स्पष्ट होते. पण मुख्यमंत्री कार्यालयातून हालचाल करू नका असा आदेश पोलिसांना आला होता.

याच वेळी गृह मंत्री असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी लागेल ते पाऊल उचला असा आदेश दिला.

एकाचवेळी हे दोन्ही आदेश आले, अखेर इसाक बागवान यांनी स्वतःच्या अंतःप्रेरणेने निर्णय घेतला की जमावावर कारवाई करायची. जवळपास ३०० जणांच्या त्या टोळक्याला त्यांनी लाठी चार्ज करून पळवून लावले. छगन  भुजबळ यांचे त्या दिवशी प्राण वाचले.

मात्र मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी इसाक बागवान व त्यांच्या टीमवर आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवला व पोलीस दलातून निलंबित केलं.

इसाक बागवान यांना कळेना कि आपलं काय चुकलं? पण मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला होता. हा निर्णय बदलू शकेल अशी एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. इसाक बागवान यांचे पत्रकार व शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी घरगुती संबंध होते. त्यांनी हि गोष्ट त्यांच्या कानावर घातली.

संजय राऊत यांनी त्यांना मातोश्री वर नेलं.

इसाक बागवान यांनी सगळी परिस्थिती बाळासाहेबांच्या कानावर घातली. त्यांनी क्षणाचाही विचार न करता पंतांना फोन लावा असा आदेश दिला. पंत म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी फोनवर आले. शिवसेना प्रमुख त्यांना म्हणाले,

“तुमचे सरकार गेले खड्डयात, या पोरांची काय चूक आहे? हे चालणार नाही. त्यांनी त्यांची ड्युटी इमानदारीने केली आहे. झालं ते खूप झालं. त्यांना परत ड्युटीवर घ्या.”

बाळासाहेबांचे हे शब्द ऐकताच इसाक बागवान यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले.

राजकीय दृष्ट्या सोयीचं काय याचा विचार  न करता खऱ्याच्या बाजूने उभे राहणारे, त्याच तडफेने जागच्याजागी निर्णय घेणारे बाळासाहेब ठाकरे त्यादिवशी त्यांना अनुभवायला मिळाले.

त्यानंतर काही दिवसातच इसाक बागवान व त्यांच्या साथीदार अधिकाऱ्यांवरचे आरोप मागे घेऊन त्यांना सन्मानाने नोकरीवर रुजू करून घेण्यात आले. इसाक बागवान यांनी हि आठवण एके ठिकाणी सांगितली आहे.

हे हि असूच भिडू .

Leave A Reply

Your email address will not be published.