चक्क बाळासाहेब ठाकरेंनी एका अटीवर वेगळा विदर्भ देण्याचं मान्य केलेलं..
मजबूत शरीरयष्टी, दणकट मनगट, हातात स्टीलचे भक्कम वजनी कडे, काळीशार दाढी, साधू बांधतात तशा जटा, पांढरे शुभ्र एकटांगी धोतर, लख्ख शुभ्र बंगाली सदरा आणि त्यावर तसेच शुभ्र उपरणं अशा अवतारातला झंझावात
त्याच नाव होत विदर्भाचा सिंह जांबुवंतराव धोटे.
विदर्भाचा सर्वात मोठा नेता. तिथे वसंतराव नाईकांसारख्या ११ वर्षे मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या लोकप्रिय नेत्याला सळो की पळो करून सोडले.
आयुष्याची उमेदीची अनेक वर्षे त्यांनी असीम त्याग केला, जनआंदोलने उभारली, कारागृहाची हवा खाल्ली, पोलिसांच्या लाठय़ा झेलल्या. याच बळावर त्यांना यवतमाळच्या जनतेने काँग्रेसच्या तगड्या उमेद्वारा विरुद्ध १९६२ साली प्रचंड बहुमताने आमदार म्हणून निवडून आणले. ते हि सुभाष बाबूंच्या फॉरवर्ड ब्लॉकच्या तिकिटावर.
जांबुवंतराव धोटे नावाचं हे वादळ विधानसभेत आलं म्हणून शांत झालं नाही. वेगळ्या विदर्भासाठीचा त्यांचा लढा तिथेही सुरूच राहिला.
आपली मागणी मान्य केली नाही म्हणून सभापतींना पेपरवेट फेकून मारणाऱ्या जांबुवंतराव धोटेंची जांबुवंत उडी तेव्हापासून फक्त विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात फेमस होती. वेगळ्या विदर्भासाठी त्यांनी आपलं सगळं आयुष्य वेचलं होतं. पुढे जेव्हा इंदिरा गांधींनी वेगळ्या विदर्भाचा विचार करतो असं आश्वासन दिल तेव्हा जांबुवंतरावांनी त्यांना देखील आपला पाठिंबा देऊ केला.
एकूणच आणीबाणीच्या वेळी जे मोजके पक्ष इंदिरा गांधींच्या पाठीशी होते त्यात बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना देखील होती.
याच आणीबाणीला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून मुंबईत शिवसेना भवनवर हल्ला झाला. जोरदार दगडफेक झाली. जांबुवंतराव धोटेंना या हल्ल्याबद्दल कळलं तेव्हा ते बाळासाहेबांच्या मदतीला तातडीने धावून आले.
शिवसेना अत्यंत हतबल अवस्थेत असताना शिवसेनेच्या मदतीसाठी विदर्भात वारे शेर, आया शेरच्या उदघोषाने आसमंत भेदणाऱ्या फारवर्ड ब्लॉकच्या जांबुवंतराव धोटे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी हाक दिली होती. जांबुवंतराव धोटे आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांना घेऊन थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी आणि सेनाभवनात पोहोचले होते.
विदर्भाचा शेर मुंबईच्या सेनेच्या टागरच्या मदतीला धावून गेला, अशा आशयाचे मथळे असलेला मजकूर त्यावेळी वृत्तपत्रातून प्रसिध्द झाला होता.
शिवसेना भवनात जांबुवंतराव धोटे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी दीर्घ चर्चा करून मुंबईच्या आझाद मैदानात सेनेची विराट सभा आयोजित करण्याचा कार्यक्रम आखला. ठाकरे आणि धोटे यांच्या मदतीला दलीत पँथरचे नेते नामदेव ढसाळ सुध्दा धावून आले होते.
आझाद मैदानातील त्या विराट सभेला विदर्भाचा ‘शेर’ जांबुवंतराव धोटे, सेनेचा ‘टायगर’ बाळासाहेब ठाकरे आणि दलितांचा ‘पँथर’ नामदेव ढसाळ यांनी पहिल्यांदाच एकत्रपणे संबोधित केल्याचे अभूतपूर्व दृश्य महाराष्ट्राने अनुभवले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना राजकारणात आपण एकटे नाही याचा आत्मविश्वास आला. पँथरच्या माध्यमातून शिवसेनेशी पंगा घेणारे दलित तरुण पहिल्यांदाच बाळासाहेबांच्या पाठीशी उभे राहिले होते. विदर्भात देखील शिवसेनेचा प्रवेश याच घटनेनंतर झाला.
जांबुवंतराव धोटे यांच्या सारखा रांगडा नेता आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा ठाकरी शैली असलेला दिलदार नेता यांच्या संपूर्णं विदर्भात एकत्र अनके सभा झाल्या. दोघांच्या भाषणांनी सभा दुमदुमून जायच्या.
पण टायगर आणि लायनची युती फार काळ टिकली नाही.
झालं असं की १९९५ साली विधानसभा निवडणुका होत्या तेव्हा शिवसेना भाजप युतीसोबत जांबुवंतराव धोटे यांचा पक्ष देखील होता. प्रचारसभा सुरु झाल्या. शिवसेनाप्रमुख तेव्हा विदर्भ दौऱ्यावर होते. बाळासाहेबांची रामटेकला सभा झाली. या सभेत बोलताना बाळासाहेब म्हणले
सत्ता आल्यानंतर दोन वर्षांत विदर्भाचा विकास झाला नाही तर आपण स्वत स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीत सहभागी होऊ.
खरं तर शिवसेना हा मराठी माणसाचा आवाज म्हणून स्थापन झालेला पक्ष. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याला बाळासाहेब ठाकरेंनी कधीच पाठिंबा दिला नव्हता उलट महाराष्ट्राचे तुकडे होऊया देणार नाही अशीच त्यांची भूमिका होती. पण त्या दिवशी जांबुवंतराव धोटे यांच्या मुळे बाळासाहेब ठाकरेंनी वेगळ्या विदर्भाला पाठिंबा देण्याचे सूतोवाच केले. युतीमधला दुसरा मोठा पक्ष असलेल्या भाजपचा तर विदर्भ राज्याला सुरवातीपासून पाठिंबा होताच. याच सभेमुळे चमत्कार घडला. विदर्भाने शिवसेना भाजपच्या ओट्यात मतांचा वर्षाव केला. वैदर्भीय नागरिकांनी पाहिलेले वेगळा विदर्भ राज्याचे वर्षानुवर्षे लटकलेले स्वप्न पूर्ण होईल अशीच शक्यता वाटत होती.
विदर्भातून निवडून आलेल्या बहुसंख्य आमदारांच्या जोरावर शिवसेना भाजप युतीची सत्ता आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तरी सत्तेचा रिमोट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या हातातच ठेवला होता.
पण याच काळात धोटे आणि ठाकरे यांच्यात मतभेद झाले. जांबुवंतराव धोटे सांगतात,
बाळासाहेबांनी वचन दिलेलं पण दोन वर्षांतच काय साडेचार वर्षांंतही त्यांना विदर्भाचा विकास करता आला नाही.
भारतीय जनता पक्षानेही स्वतंत्र विदर्भाचा ठराव भुवनेश्वर येथे पार पडलेल्या सभेत पारित केला होता. परंतु शिवसेनेने आपली भूमिका बदलत विदर्भ विरोधातून युती तोडण्याचा इशारा दिला. केंद्रात सत्ता असूनही भाजपने विदर्भाचा हा मुद्दाही गुंडाळून ठेवला. अशा रितीने जेव्हा केव्हा स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा सर्वानीच सत्तेसाठी या मुद्दय़ाकडे दुर्लक्ष केले.
तेव्हापासून जांबुवंतराव धोटे आणि बाळासाहेब ठाकरे पुन्हा कधी एकत्र आले नाहीत.
हे ही वाच भिडू
- बाळासाहेबांनी विचारलं मुख्यमंत्रीपद चालवलशील काय? राणे म्हणाले पळवून दाखवतो
- वसंतराव नाईक विरुद्ध जाबुवंतराव धोटे.
- विदर्भ सिंहाच्या दहशतीमुळे विधानसभेत पेपरवेट ठेवायचं बंद करण्यात आलं..