संकटाचं राजकारण केलं नाही तर भूकंपात उद्ध्वस्त झालेलं गाव दत्तक घेऊन पुन्हा वसवलं..
सध्या कोरोनाने संपूर्ण जगाला ग्रासलं आहे. या महामारीची पहिली लाट ओसरते तोच दुसरी लाट आली आणि या लाटेचा भडका न भूतो न भविष्यती असा आहे. अनेक ठिकाणी रुग्णालयाबाहेर कोरोना पेशंटची बेड मिळवण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसारख्या वैद्यकीय सुविधांचा तुटवडा, रेमेडीसीव्हीरची अनुपलब्धता असे अनेक प्रश्न उभे आहेत.
नाशिक सारख्या घटनांनी देश हादरून गेला आहे.
मृत्यूचं प्रमाण वाढत आहे आणि इकडे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी एकमेकांशी भांडणात अडकले आहेत. कोरोना रोखण्यासाठी श्रेय कोणाचं आणि आरोग्याच्या असुविधांची चूक कोणाची यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार हमरीतुमरीवर आलंय. कार्यकर्ते तर सोडाच पण नेतेमंडळी देखील खालच्या पातळीवर येऊन टीका टिप्पणी करत आहेत.
अशावेळी जनतेला आठवण येत आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची.
३० सप्टेंबर १९९३. त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. सगळीकडे गणपती विसर्जन मिरवणुका उत्साहात पार पाडत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे गृहमंत्रीदेखील असल्यामुळे रात्रभर ते मिरवणुकांचा आढावा घेत होतो. रात्री तीन साडेतीन वाजता ते नुकताच झोपले असतील नसतील इतक्यात काही मिनटात हादरे जाणवू लागले. वर्षा बंगल्याच्या काचा हलण्यापर्यन्त हा मोठ्ठा धक्का होता.
महाराष्ट्रातला आजवरचा सर्वात मोठा भूकंप झाला होता. त्याचा केंद्रबिंदू होते लातूर जिल्ह्यातील किल्लारी.
शरद पवारांना या संकटाची तीव्रता जाणवली. रात्री भूकंप झाला अन सकाळी साडे सात वाजता स्वतः मुख्यमंत्री किल्लारीमध्ये होते. ते एकेठिकाणी लिहितात,
“तिथे जावून पाहतो तर, गावातील सारी घरे जमिनदोस्त झाली होती. ढिगाऱ्याखालून माणसांच्या कण्हण्याचे आवाज येत होते. अनेकजण झोपेतच मृत्यूच्या दाढेत सापडले होते. काही अडकलेले मृतदेह आम्ही आमच्या हातानेच बाहेर ओढून काढले. तोपर्यन्त आणखी माहिती समजली आणि भूकंपाचा तडाखा बऱ्याच भागात बसल्याचं लक्षात आलं. पार उस्मानाबादच्या गावांपर्यन्त आम्हाला हेच चित्र दिसत होतं”
या भूकंपाची तीव्रता इतकी होती की लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील कित्येक गावे उद्ध्वस्त झाली. लोकांना तात्पुरत्या निवाऱ्याची देखील सोय नव्हती. भूकंपानंतर पाऊस सुरू झाला होता. एखाद्या छताखाली उभा राहण्यासारखी देखील अवस्था नव्हती अशा वेळी माणसं कुठं थांबणार कुठे राहणार हा प्रश्न होता आणि तो देखील दिवसभरात सोडवायचा होता.
ठिकठिकाणी प्रेतांचा खच पसरला होता.
प्रशासनाने वेगाने सूत्रे हलवली. आसपासच्या जिल्ह्यातून मिळेल तसे सामान गोळा करत किल्लारी मध्ये तात्पुरता आसरा उभा केला. अन्नछत्रे उभा केली. पवारांच्या मित्रांनी पुण्याहून मदत पाठवून दिली. किल्लारी पुन्हा उभा राहू पर्यंत शरद पवार पंधरा दिवस सोलापुरात ठाण मांडून बसले होते.
एव्हाना बीबीसी सारखी जागतिक दर्जाची मीडिया देखील लातूर मध्ये येऊन पोहचली होती. त्यांच्यामुळे मदतीचा ओघ सुरु झाला.
मात्र भूकंप झाल्यानंतर सगळ्या जगात किल्लारी हेच नाव समोर आलं त्यामुळे मदतीचा ओघ किंवा स्वयंसेवकांची रांग ही फक्त किल्लारीतच लागू लागली. पण किल्लारी एवढंच नुकसान परिसरातल्या गावातही झालं होतं.
ही बाब जेव्हा मुंबईत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना कळाली तेव्हा त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना बोलावून घेतलं. दिवाकर रावते तेव्हा मुंबईचे नुकतेच महापौरपदावरून खाली उतरले होते. त्यांना बाळासाहेब म्हणाले,
“दिवाकर आपल्याला तातडीने काही तरी करावं लागेल.”
मातोश्रीवर बैठक झाली. काय करता येईल याबद्दल चर्चा करण्यात आली.
बाळासाहेबांनी त्या दिवशी जाहीर केलं, लातूर जिल्ह्यातील एक गाव शिवसेना दत्तक घेणार आहे.
शिवसेना आणि सामनाच्या वतीने निधी गोळा करण्यात आला. औसा तालुक्यातील लिंबाळा (दाऊ) हे गाव सेनेने दत्तक घेतलं. मुंबईमधून शिवसैनिक या गावात मुक्काम ठोकून राहिले. चाळीस लाखांचा पहिला निधी तातडीने बाळासाहेबांनी पाठवून दिला. पुढे आणखी ७५ लाख गोळा झाले.
या पैशातून रस्ते बांधण्यात आले. ४ ट्रॅक्टर घेऊन सगळं गाव नांगरून काढण्यात आलं. दगडा धोंड्यात बुडालेलं गाव शिवसैनिकांनी पुन्हा उभं केलं.
सत्तेत नसलेल्या शिवसेनेनं राजकारणाची संधी असूनही आपत्तीच्या काळात ते केलं नाही. आपली विरोधी पक्षाची भूमिका समर्थपणे निभावली आणि भूकंप ग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासमोर घालून दिला.
गेल्या काही वर्षांपूर्वी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे जेव्हा लातूर दौऱ्यावर होत्या तेव्हा त्यांनी मुद्दामहून लिंबाळा या गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी गावात विविध वृक्ष लागवड करण्याची सूचना दिली होती. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या संकल्पनेतून भूकंपग्रस्तांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी उद्यान उभारण्याची संकल्पना मांडली गेली.
त्यानंतर सरकारच्या वनविभागातर्फे लिंबाळा गावात ६ हेक्तर परिसरात वेगवेगळी फुलझाडे, फळझाडे यांनी सुशोभित असणारे स्मृती उद्यान उभारण्यात आले. ग्रामस्थांकडून या उद्यानाला बाळासाहेबांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली जाते.
हे हि वाच भिडू.
- औरंगाबादचा इतिहास आहे, ज्यांनी या गावावर विजय मिळवला त्यांनी तिथलं नाव बदललं.
- पंतप्रधान आपला नियोजित कार्यक्रम सोडून लातूरच्या खेड्याला भेट देतात तेव्हा..
- औवेसी हे नाव लातूरजवळच्या औसा गावावरून आले, काय आहे MIM ?
- भाजपच्या प्रचारसभेत शेतकऱ्यांना दिलेला शब्द शिवसेनाप्रमुखांनी पूर्ण करून दाखवला