क्रिकेटर्स म्हणायचे, बाळासाहेब ठाकरेंना आमच्यापेक्षा जास्त क्रिकेट समजतं

हरहुन्नरी खेळाडू असलेले बापू नाडकर्णी त्यांच्या गोलंदाजीच्या पराक्रमामुळे क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झाले. बापू आपल्या गोलंदाजीत एकही चूक करायचे नाहीत असं अनेक क्रिकेट पंडित म्हणतात. त्यांच्या गोलंदाजीच्या अनेक कथा आणि किस्से प्रसिद्ध आहेत.

पण याबरोबरच त्यांचे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचे किस्से सुद्धा प्रसिद्ध आहेत. बापू एवढे मोठे क्रिकेटर असूनही त्यांच्यापेक्षा जास्त क्रिकेट बाळासाहेबांना कळत असल्याचं खुद्द बापूच सांगतात. 

बाळासाहेब ठाकरे फ्रीप्रेस मध्ये कामाला असल्यापासून बापूंची आणि त्यांची मैत्री होती. १९५५ मध्ये बापू मुंबईत आले तेव्हा लोकलच्या ट्रेनमध्ये त्यांची मैत्री झाली. विशेष म्हणजे त्यांच्या मैत्रीचे बंध एकच ट्रेन, एकच डबा, एकाच जागी, अशा पद्धतीची होती.

त्यावेळी ट्रेनमध्ये आतासारखी गर्दी नसायची. त्यामुळे जागेसाठी हट्टही नसायचा. दादरला बापू आणि बाळासाहेब ट्रेन एकत्रच पकडायचे, आणि एकाच जागेवर बसायचे. बापू, रमाकांत देसाई, नरेन ताम्हाणे, माधव मंत्री, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ आणि बाळासाहेब ठाकरे यांचा ग्रुप होता.

सर्व ग्रुप चर्चगेटला उतरायचा. तर तेथून बाळासाहेब फ्री प्रेसला जायचे. अकरा ते बारा वर्ष बापूंनी आणि बाळासाहेबांनी एकत्र प्रवास केला. त्यांची ही मैत्री केवळ ट्रेनमधील त्या काही मिनिटांच्या प्रवासाची नव्हती. तर सुट्टीच्या दिवशीही हे लोक ठरवून एकत्र यायचे. महिन्यातून दोनदा त्यांच्या जेवणाचा बेत ठरायचा. त्यातील एक बेत चर्चगेट मध्ये आणि दुसरा बेत दादर मधील रुईयाच्या कॅन्टीन मध्ये.

या बेतावेळी या ग्रुपच्या विविध विषयांवर चर्चा व्हायच्या. कधी कधी त्या चर्चा खूप रंगायच्या. या ग्रुप मध्ये क्रिकेटर्सच जास्त असल्यामुळे शक्यतो क्रिकेटच्या गप्पा जास्त व्हायच्या. बाळासाहेब कार्टूनिस्ट असल्यामुळे त्यांचा प्रत्येक घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच असायचा. त्या विचारातून त्यांची बुद्धिमत्ता कळून यायची.

बाळासाहेब यांचा कल राजकीय असला तरी त्यांचं क्रिकेट प्रेम अफलातुन होतं. बापू आणि त्यांचे इतर साथीदार क्रिकेट खेळत असले तरी त्यांना क्रिकेट बाळासाहेबांनाच जास्त समजायचं.

रणजी सामने असो की आंतरराष्ट्रीय सामने क्रिकेटर म्हणून या ग्रुप मधल्या बाळासाहेबांच्या मित्रांनी काय काय करायला हवं, त्यांच्याकडून काय चुका झाल्या हे बाळासाहेब ठाकरे अचूकपणे सांगायचे. प्रबोधनकारांचे सुपुत्र अशी बाळासाहेब यांची वेगळी ओळख होती, पण त्यांचं वागणं अत्यंत साधं होतं. मैत्रीच्या नात्यातून बापू बाळासाहेबांच्या क्रिकेट प्रेमाला जवळून अनुभव शकले.

हळूहळू बाळासाहेब ठाकरे राजकारणात मोठे होत गेले. शिवसेना स्थापन झाली. पण त्यांची या क्रिकेटच्या गॅंग बरोबर असलेली मैत्री कायम टिकून राहिली. एकच ट्रेन, एकच डबा आता राहिला नव्हता पण मैत्रीची ट्रेन कायम होती. मैत्री करणारे असे असंख्य ग्रुप असतात, पण काही काळानंतर त्यांच्या वाटा वेगवेगळ्या होतात.त्यातील व्यक्ती ही मोठ्या होतात आणि काळानुसार मैत्रीचे बंध ही शिथिल होत जातात.

पण बाळासाहेबांच्या बाबत मात्र तसं कधीच घडलं नाही. ते राष्ट्रीय नेते झाले, लाखो-करोडो शिवसैनिकांचे देव झाले, पण क्रिकेटच्या गॅंग बरोबर असलेली मैत्री त्यांनी कायम ठेवली. अत्यंत साधा आणि जिवापाड मैत्री जपणारा क्रिकेटप्रेमी अशा शब्दात बापूंनी बाळासाहेबांच्या आठवणीचं एका ठिकाणी वर्णन केलंय. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.