बाळासाहेबांना ड्रायव्हर म्हणून भेटलेला तरुण पुढे जाऊन मुख्यमंत्री बनेल असं वाटलं नव्हतं

मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली. मुंबईत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याची प्रेरणा बाळासाहेबांनी मराठी माणसाला मिळवून दिली. एक आंदोलन म्हणून सुरु झालेली हि संघटना पुढे राजकीय पक्ष बनली, संपूर्ण महाराष्ट्रात पसरली.

गेली काही वर्षे सत्तेत आहे. पण शिवसेनेचं मूळ रस्त्यावर लढणाऱ्या शिवसैनिकांमध्ये आहे. आज आघाडीवर असलेले कित्येक शिवसैनिक कोणताही राजकीय वारसा नसताना तळागाळातून आलेले आहेत. यातच एक प्रमुख नाव म्हणजे मनोहर जोशी.

शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पहिल्या फळीचे शिलेदार. आज त्यांचं कोहिनुरच साम्राज्य जरी पसरलं असलं तरी त्यांची सुरवात अतिशय गरिबीतून झाली होती.

मनोहर जोशी यांचं जन्म गाव रायगड जिल्ह्यातील नांदवी. खूप वर्षांपूर्वी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातून भिक्षुकीसाठी त्यांचं कुटूंब कोकणात आलं. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मनोहर जोशी आपल्या आजोळी शिकले. त्यांचे आजोबा केसरी वर्तमानपत्राचे एजंट होते. लहानपणी मनोहर पंत घरोघरी जाऊन पेपर टाकायचं काम करायचे.

याकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतही ते जायचे. तिथेच हिंदुत्वाचे संस्कार त्यांच्या मनावर झाले. शाळेत अभ्यासापेक्षाही त्यांना वादविवाद, नाटक, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांमध्ये जास्त रस होता. वडिलांच्या मृत्यू नंतर माधुकरी मागून, शिपाई म्हणून नोकरी करून आपलं शिक्षण पूर्ण केलं.

व्हर्नाक्युलरची परिक्षा पास होताच जोशी सरांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. त्या काळात देखील शिक्षकांना चांगला पगार मिळत होता. महिन्याला त्यांचा पगार होता पन्नास रुपये. या पगारातून ते घरखर्च भागवत. राहिलेल्या पगारातून शिक्षणाची सोय करण्याचं काम चालू होतं.

जोशी सर M.A. L.L.B झाले होते. M.A. झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली. याच दरम्यान मुंबईत गुजराती लोकांच धंद्यात वर्चस्व होतं. आपण देखील काहीतरी करु म्हणून त्यांनी वेगवेगळे उद्योग करण्यास सुरवात केली.

याच बिझनेसच्या लाईनमधला एक बिझनेस होता तो म्हणजे कोहिनूर क्लासेस.

दादर स्टेशनच्या समोरच्या एका खोलीत कोहिनूर क्लासेसना सुरवात करण्यात आली. मनोहर जोशी हे खऱ्या अर्थाने “सर” झाले ते इथूनच.   साल होतं १९६१. या काळात महानगरपालिकेतली नोकरी संभाळत जोशी सरांनी कोहिनूर क्लासेसची स्थापना केली होती.

कोहिनुर क्लासेसला चांगलाच प्रतिसाद मिळाला. मनोहर जोशींचा या उद्योगात जम बसला.

वयाच्या २५ व्या वर्षी पहिली चार चाकी गाडी घेतली. पण हि गाडी चैनीसाठी नव्हती. त्यांच्या उद्योगी डोक्यातून आपली कार भाड्याने लावायची अशी कल्पना बाहेर आली होती. त्यांच्या सोबत त्यांचा भाचा सुधीर जोशी देखील असायचा. कित्येकदा मनोहर जोशी स्वतः गाडी ड्राईव्ह करायचे.

याच उद्योगातून एकदा मनोहर जोशी यांची श्रीकांत ठाकरे यांच्याशी ओळख झाली. श्रीकांत ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे यांचे चिरंजीव आणि बाळासाहेबांचे धाकटे बंधू. ते व्यंगचित्रकार होते, मार्मिकमध्ये चित्रपट परीक्षण लिहायचे. मराठी सिनेमाला संगीत देखील द्यायचे.

हा काळ शिवसेनेच्या जन्माचा होता. बाळासाहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपली भाषणे रंगवत होते. त्यांच्या जादुई करिष्म्यामुळे कानाकोपऱ्यातले हजारो तरुण या संघटनेशी जोडले जात होते. 

एकदा बाळासाहेब ठाकरे यांचं पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहात व्याख्यान होणार होतं. श्रीकांत ठाकरे यांना या सभेसाठी पुण्याला जायचं होत पण त्यांच्या जवळ कार नव्हती. तेव्हा त्यांनी मनोहर जोशी यांच्या कडून कार भाड्याने घेतली. 

श्रीकांत  ठाकरे जेव्हा पुण्याला आले तेव्हा मनोहर जोशी स्वतः ड्राइव्ह करत होते. मुंबई पुणे प्रवासात दोघांच्या अनेक विषयांवर गप्पा रंगल्या. श्रीकांत ठाकरे यांना हा तरुण भलताच आवडला. त्याची राजकीय समज ठाकरे यांना प्रभावित करून गेली. 

बालगंधर्व रंगमंदिराच्या समोर दोघांची पहिली भेट झाली. पहिल्याच भेटीत दोघांची चांगली मैत्री जमली.न तेव्हापासून आपल्या प्रत्येक दौऱ्यात बाळासाहेब मनोहर जोशींना सोबत घेऊ लागले. मनोहर जोशी आणि सुधीर जोशी हि मामा भाच्याची जोडी कित्येकदा बाळासाहेबांच्या गाडीचे सारथ्य करायचे आणि बाळासाहेब गंमतीने म्हणायचे,

“माझं शिक्षण किती का होईना माझे ड्रायव्हर मात्र एम ए एलएलबी आहेत.”

याच दौऱ्यातून भेटीतून मनोहर जोशी देखील राजकरणात सक्रिय झाले. बाळासाहेबांच्या खालोखाल त्यांची देखील भाषण गाजू लागली. शिवसेना स्थापनेनंतर कोकणातल्या दौऱ्यातही मनोहर जोशींनी सहभाग घेतला. 

एक साधा शिवसैनिक ते पुढे मुंबई महापालिकेचे नगरसेवक, मुंबईचे महापौर, आमदार, विरोधी पक्ष नेते आणि अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा प्रवास मनोहर जोशींनी कष्टाने मेहनतीने आणि बाळासाहेबांच्या विश्वासावर पार पडला. 

आज महाराष्ट्राला राजकारणात शिवसेनेनं काय दिल हा प्रश्न आला तर मनोहर जोशी यांच्यासारखे नेते हेच त्याच उत्तर असेल.

हे हि वाच भिडू.

    

Leave A Reply

Your email address will not be published.