बाळासाहेब म्हणाले,” बाकी कोणालाही भाजपमध्ये न्या पण गडकरी आणि राणे मला सेनेत पाहिजेत..”

नारायण राणे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वादळी व्यक्तिमत्व. कोणताही राजकीय वारसा नसताना अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या राणेंची सुरवात रस्त्यावर लढणारा शिवसैनिक म्हणून झाली. बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे नगरसेवकापासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली.

गेली तीस वर्षे हे वादळ महाराष्ट्राच्या राजकारणात भिरभरत आहे. सेनेपासून सुरवात करणाऱ्या राणेंनी पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तिथे त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून थेट भाजपमध्ये गेले. या सगळ्या प्रवासात त्यांनी अनेक मित्र जमवले पण त्यांचे शत्रूदेखील तितकेच निर्माण झाले.

पण पक्ष कोणताही असो अगदी सुरवातीपासून आज अखेर त्यांची साथ देणारा एकच राजकीय नेता म्हणजे नितीन गडकरी.

राणे जेव्हा मुंबई महापालिकेत बेस्टचे चेअरमन होते तेव्हापासून त्यांची आणि गडकरी यांची ओळख. तोट्यात असलेल्या बेस्ट बसला फायद्यात आणायचं काम नारायण राणे यांनी केलं. गडकरी त्या काळची आठवण सांगताना म्हणतात,

“एकदा बेस्ट साथीच्या काही विशिष्ट परवानग्या मिळवण्यासाठी रेल्वे बोर्डाचे चेअरमन सहकार्य करत नव्हते. त्यावेळी राणेंनी कडक शब्दात त्यांना सुनावले होते की, ज्या पाचव्या मजल्यावर बसून आपण मिटिंग करत आहोत, त्या खोलीची खिडकी उघडी आहे. हे ऐकताच त्या अध्यक्षांनी तातडीने सर्व परवानग्या दिल्या होत्या. त्यांच्याकडे प्रशासकीय क्षमता, प्रभावी निर्णयक्षमता आणि अधिकारी वर्गावर वचक ठेवण्याची कुवत होती.”

युतीची सत्ता आली तेव्हा नितीन गडकरी आणि नारायण राणे हे दोघेही पहिल्यांदा मंत्री झाले. मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळात त्यांची मैत्री दृढ झाली. पुढे नारायण राणे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी या मैत्रीत अंतर आलं नाही.

१९९९ साली जेव्हा युतीची सत्ता जाऊन विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तेव्हा नारायण राणे विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले तर नितीन गडकरी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते बनले. या दोघांनी दोन्ही सभागृहे गाजवली. विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे या दोन्ही मुख्यमंत्र्याना त्यांनी मिळून अडचणीत आणलं होतं.

बाळासाहेब ठाकरे तेव्हा या दोन्ही नेत्यांच्या कामगिरीवर प्रचंड खुश होते. गडकरी अनेकदा त्यांच्याशी गप्पा मारायला म्हणून मातोश्रीवर जात असत. त्यावेळी चर्चा करताना बाळासाहेब त्यांना कायम म्हणत,

मला ते लोक आवडतात, ज्यांना एखादे काम कसे करून घ्यायचे याचे गणित माहिती असते. नितीन, माझ्या पक्षातले नवलकरांपासून कोणालाही कुठल्याही पक्षात घेऊन जा, पण तू शिवसेनेत ये. तू भाजपच्या लायकीचा माणूस नाहीस. मला तुझ्यासारखी आणि नारायण राणेंसारखी माणसे आवडतात, जी कुठलेही काम नेटाने करतात.

नारायण राणे आणि गडकरींच्या सारखी काम करणारी माणसे मला शिवसेनेतच पाहिजेत म्हणणाऱ्या बाळासाहेबांशी राणे यांचे पुढच्या काळात मात्र मतभेद होऊ लागले. उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या वादानंतर राणेंनी शिवसेना सोडली.

त्यावेळी त्यांना पक्ष सोडू नका शिवसेनेतच थांबा असं सांगणारे गडकरी एकटेच नेते होते. गडकरी सांगतात,

“राणे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आमच्यात थोडीफार धुसफूस झाली. शिवसेना सोडू नका, असे मी राणे यांना समजावले होते. त्यावेळी राणे यांच्या डोळ्यांतही अश्रू आले होते, तसेच मी हा निर्णय आनंदाने घेत नसल्याचे त्यांनी मला सांगितले.”

नारायण राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर देखील दोघांच्यातील कौटुंबिक जिव्हाळा कमी झाला नाही. एकदा नितीन गडकरी यांचा नागपुरात मोठा अपघात झाला. गडकरी यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या भेटीला फक्त नारायण राणे हेच नागपूरला आले. इतकंच नाही तर त्यांनी गडकरींना सांगितलं,

“मी पुण्याच्या डॉ. संचेतींना फोन केलाय. ते इथे येतील, तपासणी करतील आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढचे उपचार घ्या.”

पुढे अनेक वर्षांनी जेव्हा नारायण राणे यांच्या झंझावात या आत्मचरित्राचं प्रकाशन झालं तेव्हा त्या कार्यक्रमाला शरद पवार आणि नितीन गडकरी उपस्थित होते. त्यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले,

“राणेंचा स्वभाव आणि माझा स्वभाव जवळपास सारखाच आहे. राणे आणि मी दोघेही ‘स्टेट फॉरवर्ड’ आहोत. राजकारणात पद नसेल तर मैत्री कमी होते. पण राणे आणि माझी मैत्री कायम राहिली आहे. मला राजकारणात मोठ-मोठी पदे मिळाली असतील पण माझे दोन नेते आहेत, ते म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि नारायण राणे. या दोघांना विसरून कधीही चालणार नाही.”

आज नारायण राणे भाजपमध्ये आलेत. त्यांना पक्षात आणण्यात नितीन गडकरी यांचाच सिंहाचा वाटा आहे असं मानलं जातं. इतकंच नाही तर राणेंना केंद्रात मंत्री करण्यात आलं तेव्हा गडकरींनी स्वतःच्या अखत्यारीत येणारे मध्यम व लघु उद्योग खाते मंत्रालय राणेंना सोपवले. राजकारणाच्या इतक्या घडामोडीतही टिकून राहिलेली ही मैत्री अनेकांना आश्चर्य वाटावी अशीच आहे हे नक्की.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.