बाळासाहेब म्हणाले, रामजन्मभूमीच्या वादग्रस्त जागेवर राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावं..
तसं शिवसेना आणि अयोध्या हे नातं जुनंच आहे. जेव्हा अयोध्येत बाबरी मशिद पाडण्यात आली, तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी,
“हे काम शिवसैनिकांचं असेल, तर याचा मला अभिमान आहे,”
असं वक्तव्य केलं होतं.
अयोध्येमध्ये वातावरण पेटलेलं होतं, तेव्हा बाळासाहेबांनी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा दिला होता. इतकंच नाही, तर बाळासाहेबांनी कारसेवेसाठी मुंबईतल्या शिवसैनिकांची एक तुकडी पाठवली होती. जिचं नेतृत्व मनोहर जोशी करत होते. शिवसेना भवनात या कार्यकर्त्यांचा निरोप समारंभ पार पडला होता.
त्याचवेळी बाळासाहेबांनी अग्रलेख लिहिला ज्यातले शब्द होते,
‘हातात टाळ-चिपळ्या घेऊन भजन करण्यासाठी शिवसैनिकांचा जन्म झालेला नाही. त्यांच्या धाडसाची कदर केली जाईल, हीच विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांच्याकडून अपेक्षा आहे. यापूर्वीचे अयोध्येतील सर्व लढे शिवसैनिकांशिवाय लढलात. आता त्यांच्या हाती शस्त्र देऊन पाहा. रणभूमीवरील प्रत्यक्ष लढाईचा त्यांचा अनुभव हा अयोध्येतील ‘धर्मयुद्ध’ जिंकण्यास नक्कीच उपयोग ठरेल.’
साहजिकच देशासह मुंबईतलं वातावरण पेटलेलं होतं, त्यात बाबरी मशीद पडल्यानंतर देशात वेगवेगळ्या ठिकाणी दंगली उसळल्या यात मुंबईचाही समावेश होता.
राम मंदिर उभारणीसाठी ही शिवसेनेनं सुरुवातीपासून आग्रही भूमिका घेतली होती. प्रकरण कोर्टात गेलेलं आणि न्यायालय रामजन्मभूमी प्रकरणात काय निकाल देणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं.
मात्र हा निकाल लांबत चाललेला, बघता बघता १९९८ च्या निवडणूका आल्या. निवडणुकांच्या तोंडावर राजकीय नेत्यांच्या मुलाखती, सभा फुल फॉर्ममध्ये सुरू होत्या.
त्यात बाळासाहेब ठाकरे म्हणाले, ‘अयोध्येतल्या रामजन्मभूमीच्या वादग्रस्त जागेवर राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावं. हिंदू धर्मीयांना मंदिरासाठी आणि मुस्लिम धर्मियांना मशिदीसाठी वेगळी जागा देण्यात यावी.’
खुद्द बाळासाहेब असं म्हणल्यानं दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांनी मुख्य हेडलाईन म्हणून हीच बातमी चालवली.
बाळासाहेबांना नेमकं काय म्हणायचंय, त्यांची नेमकी भूमिका कधी स्पष्ट होणार… याबद्दल चर्चा रंगू लागल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रितिश नंदी यांनी बाळासाहेबांची मुलाखत घेतली.
बाळासाहेब त्या मुलाखतीत म्हणाले,
‘हीच वेळ आहे की, आपण हा अयोध्येचा वाद थांबवावा. आपल्याकडची मुस्लिम लोकसंख्या मुस्लिम राष्ट्रांपेक्षाही जास्त आहे. आपण त्या सगळ्यांना दूर करु शकत नाही. ते सगळे जातील कुठे? पाकिस्तान त्यांना स्वीकारण्यासाठी तयार नाहीये, इतर मुस्लिम राष्ट्रांना ते नको आहेत. खरंतर त्यांना तिथं व्यवस्थित वागणूकही मिळत नाही. ते हिंदुस्थानचे नागरिक आहेत. जोपर्यंत ते देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रामाणिक आहेत, तोवर आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्यातलंच एक म्हणून वागवलंही पाहिजे.’
मुस्लिमांना काँग्रेस सरकारपेक्षा सेनेच्या सरकारमध्ये सुरक्षित वाटतं…
‘मध्यंतरी माझ्या सभेला ३ लाखापेक्षा जास्त मुस्लिम उपस्थित होते. सभा झाल्यावर त्यातले काहीजण माझ्याकडे आले आणि म्हणाले आम्हाला काँग्रेस सरकारपेक्षा जास्त सुरक्षित सेनेचं सरकार असताना वाटतं. आपण त्यांचा अपेक्षाभंग करू शकत नाही, त्यामुळं मी अयोध्येत राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा विचार पुढे आणला आहे.’ असंही बाळासाहेब पुढे म्हणाले.
त्याकाळी रामजन्मभूमीच्या जागी हॉस्पिटल किंवा सरकारी शाळा उभारण्यात यावी अशी मागणी होत होती. मग बाळासाहेबांची स्मारकाची कल्पना काय होती?
तर ते म्हणाले,
‘तिथे हॉस्पिटल, शाळा किंवा धार्मिक संस्था उभारा असं मला सुचवायचं नाहीये. तिथं भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचं प्रतीक असणारं एखादं स्मारक असायला हवं, जे हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही आवडेल. मला त्या जागेवर मंगल पांडे यांचं स्मारक झालेलं आवडेल, ते स्वतः उत्तर प्रदेशचे होते.
त्यामुळं हे स्मारक त्यांना आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या इतर स्वातंत्र्यसैनिकांना खरी श्रद्धांजली ठरेल.’
जर हे स्मारक झालं असतं, तरी मंदिर आणि मशीद कुठे असणार याचा वाद उफाळला असता. त्यासाठी बाळासाहेबांनी पर्यायही सुचवला होता,
‘स्मारकाची संकल्पना हिंदू आणि मुस्लिमांनी मान्य केली पाहिजे. सरकारनं जवळपासच मंदिरासाठी आणि मशिदीसाठी जागा द्यावी. या पर्यायामुळं दोन्ही गट आनंदी असतील आणि आपण हा विषय थांबवू शकू. नाहीतर हे प्रकरण सुरूच राहील आणि कोर्ट कधीच निष्कर्षावर पोहोचू शकणार नाही.’
मुलाखतीच्या शेवटी बाळासाहेबांनी कोर्टानं जर निर्णय दिला, तर तो आम्हाला मान्य असेल असं वक्तव्यही केलेलं. त्याच्या या भूमिकेची संपूर्ण देशात जोरदार चर्चा झाली होती.
हे ही वाच भिडू:
- प्रचारात हिंदूत्वाचा मुद्दा आणला म्हणून बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार गेला होता..
- बाबरी पाडल्याचा लालकृष्ण अडवाणींना पश्चाताप होता आणि तसं त्यांनी बोलूनही दाखवलं होतं
- ठाकरे घराण्याचा “नावं” ठेवण्याचा इतिहास लय भारीय…!!!