बाळासाहेबांची पत्रकार परिषद बंद पाडणाऱ्या आंदोलक महिलांना मातोश्रीवर बोलावलं अन्..
बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणावर घोंगावलेलं सगळ्यात मोठं वादळ. त्यांनी कधीही कोणतं राजकीय पद स्वीकारलं नाही पण तरीही त्यांच्या एवढं जनतेचं प्रेम आणि आदर एखाद्या नेत्याला मिळणे अपवादात्मकच घडलं. अगदी राजकारणात उतरल्या पासून मुंबईला आपल्या एका इशाऱ्यावर बंद पाडू शकणारे बाळासाहेब ठाकरेच होते.
बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा अगदी सत्ताधाऱ्यांपासून बॉलिवूड अंडरवर्ल्ड प्रत्येक क्षेत्रात होता. त्यांच्या समोर उभे राहताना कित्येकजण थरथरायचे. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वातच असलेला रुबाब अनेकांना गलितगात्र करणारा होता. त्यांच्यासाठी जीव देखील द्यायला तयार असणारे शिवसैनिक ही बाळासाहेबांची मुख्य ताकद होती.
युतीच्या सरकार वेळची गोष्ट.
१९९९ सालचा सप्टेंबर महिना असेल. नर्मदा बचाव आंदोलन ऐन भरात होते. सरदार सरोवर मधे प्रचंड डूब आलेली शेकडो गाव व हजारो घरे पाण्याखाली गेलेली त्या वेळेस नर्मदा खोऱ्यात अरुंधती रॉय यांनी आपल्या साथीदारा सह दौरा केला होता. या आंदोलनाचे पडसाद मुंबईदेखील पडले होते.
सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने पुरग्रस्तांच्या मागण्यासाठी आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु होते.
नेमके याच दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार निवडणूक आयोगाने काढून घेतला होता. या अन्यायकारक निर्णयाविरोधात शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई मराठी पत्रकार संघात प्रेस कॉन्फरन्स ठेवण्यात आली.
तिथून जवळच असलेल्या आझाद मैदानावरील नर्मदा बचाव आंदोलनाचा लाऊड स्पीकर प्रचंड मोठ्या आवाजात वाजत होता. या आवाजामुळे बाळासाहेबांच्या पत्रकार परिषदेला डिस्टर्ब होत होते. अखेर काही शिवसैनिक इतके वैतागले कि त्यांनी थेट आझाद मैदानावर जाऊन महिलांचे आंदोलन सुरु होते त्यांच्या लाऊड स्पीकर चे कनेक्शनच तोडून टाकले.
बाळासाहेबांच्या प्रेस कॉन्फरन्स मधे व्यत्यय नको म्हणून शिव सैनिकांनी केलेली ही आगळीक होती.
प्रतिभा शिंदे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगतात, आम्हाला ह्याचा भयंकर राग आला आणि आम्ही त्यांच्या पत्रकार परिषदेत ५० महिला घोषणा देत घुसलो.
” साहेब तुमचा मतदाना चा अधिकार गेला तर इतके आंदोलन आणि आमचा भाकरीचा अधिकार हिरावून घेत असताना मात्र आमचा आवाज ही तुमचे शिव सैनिक दाबून टाकतात “
त्या वेळी शिवसैनिक या आंदोलकांवर धावून गेले. दोन्ही बाजूंची बाचाबाची सुरु झाली. तेव्हा बाहेरील गोंधळ ऐकुन बाळासाहेब ठाकरे यांना प्रश्न पडला. त्यांनी आंदोलनकर्त्या महिलांना प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलावून घेतले. त्या वेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे ही त्यांच्या सोबत होते.
बाळासाहेबांना आक्रमकता पसंद होती. आपल्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या या महिलांचे रणरागिणी रूप बघून ते जाम खुश झालेत व त्यांनी दुसऱ्या दिवशी ११ वाजता या सगळ्या आंदोलनकर्त्यांना मातोश्री वर बोलावले.
दुसऱ्या दिवशी दिलेल्या वेळी या महिला मातोश्री वर गेल्या.
तेव्हा तिथे आधीच मोठा गोंधळ सुरु होता. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली राजीनामा द्यावे लागलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांना तिकीट द्या व देवून नका असे दोन ग्रुप प्रचंड ताकदीने मातोश्री वर आलेले. खूप सारे आमदार बाहेर प्रतीक्षेत बसले होते. प्रतिभा शिंदे व इतर आदिवासी आंदोलक महिलांनी मातोश्री वर प्रवेश केला असता बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत धुळे जिल्ह्यातील धरमचंद चौरडिया यांच्याशी कुठल्याशा विषयावर चर्चा करत होते.
प्रतिभा शिंदे सांगतात, बाळासाहेबांनी आमच्या प्रत्येक आदिवासी नेत्यांची अत्यंत आस्थेवाईक रित्या चौकशी केली. प्रत्येकाला नाष्टा करायला लावला प्रश्न समजून घेतलेत आणि नारायण राणेंना प्रश्न सोडवण्यासाठी अनेक आदेश दिले( निवडणुकीच्या धामधुमीत प्रश्न प्रलंबित राहिले व पुढे सरकार गेले) या वेळी ते मला म्हणाले,
“पोरी तू ज्या विचारधारेची आहेस ना त्यांनी काय दिले येथल्या सामान्य माणसाला? मी इथल्या साळी- माळी – कोळी अश्या बारा बलुतेदार जातींना राज्यकर्ती जमात बनवलं आमदार केले, तुझ्या विचारांचे समाजवादी आणि काँग्रेस (आत्ता काँगेस आणि आपल्या विचारांची?) तुम्हाला फक्त टाचा घासून मारून टाकतील तू इकडे ये मी तुझा योग्य सन्मान करतो.”
प्रतिभा शिंदे त्यांना अत्यंत नम्र पणे म्हणाल्या,
“साहेब काही लोकांचा जन्म टाचा घासून मरण्या साठीच असतो आणि त्याचा मला सार्थ अभिमान ही आहे.”
त्यांनी अत्यंत प्रसन्न पणे शिंदे यांच्या बोलण्याला दाद दिली आणि सांगितले,
ह्या निडर वागण्याचे कौतुक आहे मला कधीही अडचण आली की ये भेटायला.
बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांना या सर्व आंदोलक कार्यकर्त्यांना बाहेर पर्यंत सोडायला सांगितले. त्या वेळेच्या वर्तमानपत्रात ही बातमी हेड लाईनमध्ये आली होती.
हे ही वाच भिडू.
- दस का दम : बाळासाहेबांचे असेही दहा किस्से !
- बाळासाहेब म्हणाले, नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.
- या व्यक्तीने सर्वात पहिल्यांदा पवारांची ओळख बाळासाहेब ठाकरें सोबत करुन दिली होती
- भंगारात निघणाऱ्या युद्धनौकेचं बाळासाहेबांमुळे युद्ध स्मारकात रुपांतर होवू शकलं..