बाळासाहेब म्हणाले, “तुम्हाला राष्ट्रपती केलं पण माझी दोन कामे तुम्ही केलीच नाहीत..”

सालं होतं. 2007. केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर होता. तर डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते.  राष्ट्रपती डाॅ. ए,पी. जे अब्दुल कलाम यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपत आला होता. राष्ट्रपती पदासाठी देशात निवडणूक होणार होती. भाजप आणि एनडीए पक्षाकडून पुन्हा एकदा डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना उमेदवारी देण्यासाठी चर्चा सुरू होती.

मात्र काही कारणास्तव अब्दुल कलामाचं नाव मागं पडलं आणि एनडीए पक्षाने आपला राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांचं नाव आघाडीवर घेतलं.

इकडं काँग्रेस आणि युपीएमध्ये राष्ट्रपती पदासाठी नावाची चाचपणी सुरू होती.

काँग्रेसने गृहमंत्री शिवराज पाटील, जेष्ठ निष्ठावंत काँग्रेस नेते डॉ. करण सिंह याची नावे विचारात घेतली. मात्र या नावावरून युपीएमध्ये सहमती झाली नाही. या नेत्यांच्या नावाला डाव्या पक्षांनी विरोध केला.

त्यानंतर सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी डाव्या नेत्यांना पुन्हा चर्चेसाठी बोलवलं. डाव्यांनी मोतीलाल व्होरा आणि अर्जुन सिंग यांची नावं सुचवली. मात्र तब्येतीची कारणं देत काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळला. जर पुरूष उमेदवारावर एकमत होत नसेल तर महिला उमेदवाराचं नाव विचारात घ्यावं, असा सल्ला या बैठकीत भाकपचे डी. राजा यांनी दिला.

प्रतिभाताई पाटील त्या वेळी राजस्थानच्या राज्यपाल होत्या.

गांधी घराण्यांच्या निष्ठावान म्हणून त्यांची ओळख होती. चारवेळा त्या महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. राज्याच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात त्यांनी विविध विभागाच्या मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता.

1985 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती. राज्यसभेच्या उपसभापतीपदाची महत्वाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. 2004पासून त्या राजस्थानच्या राज्यपालपदी होत्या.

पक्षासाठीच त्यांचं योगदान संसदीय कामाचा अनुभव यामुळे काँग्रेसने राष्ट्रपती पदासाठी प्रतिभाताई पाटील याचं नाव निश्चित केलं. युपीएच्या घटकपक्षांनी आणि डाव्यांनीही या नावाला पाठिंबा दिला.

14 जून 2007 रोजी युपीएच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रतिभाताईंचं नाव निश्चित करण्यात आलं. तर एनडीएने उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांची उमेदवारी जाहीर केली.

त्यावेळेस शिवसेना हा भाजपप्रणीत एनडीएचा घटकपक्ष होता. त्यांचा पाठींबा कोणाला असेल याबद्दल उत्सुकता होती.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपच्या भैरोसिंह शेखावत यांच्या ऐवजी प्रतिभाताईंना पाठिंबा जाहीर केला. ते म्हणाले,

“जर मराठी व्यक्ती राष्ट्रपतीपदावर विराजमान होत असेल तर ती अभिमानाची गोष्ट आहे, त्यामुळे आमचा पाठिंबा प्रतिभाताईंना असेल.”

बाळासाहेबांच्या या निर्णयानंतर भाजपचे अनेक दिग्गज नेते बाळासाहेब ठाकरेंना भेटले. कित्येकजण म्हणाले कि काँग्रेस बरोबर शिवसेनेची काही तरी डील झालेली आहे. अडवाणींच्या पासून गोपीनाथ मुंडेपर्यंत अनेकांनी बाळासाहेबांचं मन वळविण्याचा प्रयत्न केला. शिवसेना आपली भूमिका बदलते की काय याबद्दल चर्चा सुरु होती पण तसं घडलं नाही.

अखेर प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती बनल्या. युपीएचा भाग नसूनही टीकेची पर्वा न करता शिवसेनेने केलेली मदत प्रतिभाताईंसाठी खूप महत्वाची ठरली. या बद्दल त्या नेहमी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल कृतज्ञ राहिल्या.

प्रतिभाताई पुढे जेव्हा निवृत्त झाल्या तेव्हा त्या बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीसाठी व प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मातोश्रीवर आल्या.

त्या जेव्हा बाळासाहेबांना भेटल्या तेव्हा त्यांनी पहिलाच सवाल केला,

माझी तुम्ही दोन कामे केली नाहीत.

आजूबाजूला लोक होते. सगळ्यांचे कान टवकारले. पूर्वीपासून चर्चा सुरु होतीच की प्रतिभा ताईंना पाठिंबा देण्याच्या बदल्यात बाळासाहेबांनी काही तरी मागणी केली असणारच. प्रतिभाताईंवरील केलेले उपकार त्यांनी फेडावे अशी बाळासाहेब अपेक्षा करतात कि काय असच तिथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना वाटत होतं.

प्रतिभाताईंना सुद्धा थोडासा धक्काच बसला होता. त्या बाळासाहेबांना म्हणाल्या,

“कोणती दोन कामे?”

बाळासाहेब काय बोलतात या बद्दल सगळ्यांची उत्सुकता ताणली. ते म्हणाले,

“एक काम अफझल गुरूला फाशी दिली नाही आणि दुसरं काम सुलोचना दीदींना फाळके पुरस्कार दिला नाही.”

मातोश्रीमध्ये हजर असलेले सगळेजण भारावून गेले. बाळासाहेबांनी स्वतःसाठी काही मागितले नव्हते. त्यांनी भूखन्ड किंवा कोणत्याही संस्था मागवल्या नव्हत्या. हि दोन कामे महाराष्ट्राची होती, देशाची होती. तरीही बाळासाहेबांनी उल्लेख करताना माझी दोन कामे असा उल्लेख केला. अफझल गुरूला फाशी देणे हे स्वतःचे काम मानले तसेच सुलोचना दीदींना फाळके पुरस्कार देणे हे देखील स्वतःच काम मानलं.

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हि आठवण सांगितली आहे. ते म्हणतात, बाळासाहेबांच्या मोठ्या स्वभावाचा, दिलदारपणाचा असा दुसरा पुरावा असू शकत नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.