शिवसेनेनं हिंदू समजून राज्यसभेची खासदारकी दिली अन् ते ख्रिश्चन निघाले..!!!

बाळासाहेब ठाकरे म्हणजे कडाडती तोफ. त्यांची मुलाखत घेणे म्हणजे त्याकाळच्या पत्रकारणासमोर आव्हानच असायचे. विशेषतः हिंदी इंग्रजीचे पत्रकार थोडेसे दबकूनच असायचे. तरीही मातोश्रीच्या गुहेत जाऊन बाळासाहेब ठाकरे या वाघाची मुलाखत घेणारे जे काही मोजके पत्रकार होते त्यात शेखर गुप्ता हे नाव महत्वाचं आहे.

शेखर गुप्ता यांनी एकेकाळी बाळासाहेबांची माफिया म्हणून संभावना केली होती. शेखर गुप्ता जेव्हा मुलाखतीसाठी गेले तेव्हा त्यांना वाटलं की बाळासाहेब आधी आपल्याला खूप रागावतील. ते शिव्या खाण्याच्या तयारीनेच गेले होते. पण बाळासाहेब काही बोलले नाहीत उलट त्यांनी त्यांचं कौतुकच केलं.

अगदी हातात वाईनचा ग्लास आणि सिगार घेऊन हि मुलाखत पार पडली. मुलाखती संपल्यावर बाळासाहेबांनी त्यांना डिनरच आमंत्रण दिलं. ते जेव्हा जेवणाची वाट बघत होते तेव्हा तिथे बाळासाहेबांचा छोटा नातू खेळत होता. ते आदित्य ठाकरे होते. 

आदित्य ठाकरे यांनी डब्ल्यू डब्ल्यू एफच्या (आजचे डब्ल्यू डब्ल्यू ई) रेसलरचा फोटो असलेला टीशर्ट घातला होता. बाळासाहेब सहजच आदित्यला म्हणाले,

“हा कसला त्या इडियट प्रितीश नंदाचा फोटो असलेला टीशर्ट घातला आहेस.”

शेखर गुप्ता यांना आश्चर्य वाटलं. ते बाळासाहेबांना म्हणाले,

“इडियट? पण प्रितीश नंदा तर तुमच्या शिवसेना पक्षाचे राज्यसभेचे खासदार आहेत?”

प्रितीश नंदा हे लेखक, पत्रकार,सिनेमा व सिरीयलचे प्रोड्युसर वगैरे आहेत. ते मूळचे बंगालचे. त्यांची आई तिथल्या शाळेत मुख्यध्यापिका होती. वयाच्या सतराव्या वर्षी नंदी यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. इंग्रजी मधील एक उत्तम लेखक कवी म्हणून त्यांना तेव्हा पासून नावाजलं गेलं. अगदी लहान वयात पदमश्री पुरस्कार मिळवणारे लेखक म्हणून त्यांचं कौतुक देखील करण्यात आलं.

जवळपास दहावर्षे टाइम्स ऑफ इंडिया मध्ये त्यांनी पत्रकारिता केली होती. पुढे प्रितीश नंदी कम्युनिकेशन लिमिटेड या नावाने कंपनी स्थापन करून दूरदर्शनसाठी काही कार्यक्रम बनवले. 

नव्वदच्या दशकात प्रितीश नंदी हे नाव मोठं झालं होतं. मनेका गांधी यांच्या सोबत स्थापन केलेली पीपल्स फॉर अनिमल्स हि संस्था त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ओळखली जात होती. 

राज्यसभेत शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी एक हुशार व इंग्रजीवर प्रभुत्व असणारा माणूस बाळासाहेबांना हवा होता. म्हणूनच त्यांनी १९९८ साली नंदी यांना राज्यसभेवर पाठवलं. जवळपास सहा वर्षे ते सेनेचे खासदार होते. तिथे त्यांनी संसदेच्या संरक्षणविषयक, परराष्ट्र धोरण विषयक समित्यांमध्ये काम केलं.

 इतकं असूनही बाळासाहेब ठाकरे आपल्याच खासदारावर का चिडले आहेत हे शेखर गुप्ता याना कळत नव्हतं. त्यांनी नंदी यांना इडियट का म्हणाला हा प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांना विचारला. ते म्हणाले,

” तो इडियट नाही, खरा इडियट तर मीच आहे. त्याने माझ्याकडून राज्यसभेची खासदारकी घेतली आणि खूप उशिरा मला कळलं कि तो हिंदू नाही तर ख्रिश्चन आहे.”

खासदार झाल्यावर पहिल्या मुलाखतीपासून प्रितीश नंदी यांनी आपण शिवसेना पक्षात प्रवेश केला नाही व हिंदुत्वाशी आपलं कोणतंही नातं नाही हे सांगायचे.

गांधीवादी सेक्युलॅरिज्म हीच आपली विचारधारा असल्याचं त्यांनी नेहमीच सांगितलं होतं. शिवसेनेने त्यांना तिकीट तर दिल खरं पण त्याआधी त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली नव्हती याची बाळासाहेबांना आयुष्यभर खंत राहिली.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.