बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, यापुढे माझ्यावर प्रचाराला फिरायची वेळ आणू नका

बाळासाहेब ठाकरे म्हणजे धडाडती तोफ. त्यांच्या भाषणांनी समोरच्या व्यक्तींमध्ये अंगार फुलायचा. त्यांच्याच भाषणांनी मुंबईत मराठी जनतेला बळ मिळालं. यातूनच शिवसेना नामक वादळाचा जन्म झाला. अगदी महानगरपालिकेपासून ते महाराष्ट्राच्या विधिमंडळावर शिवसेनेचा भगवा झेंडा झळकला तो फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रचारसभांमुळे.

बाळासाहेबांचे विचार रोखठोक होते. ते टीका करताना जितके आक्रमक असायचे तितकेच ते विरोधकांचं कौतुक करताना दिलदार असायचे.

विशेषतः नव्वदच्या दशकात बाळासाहेबांनी बाबरी मशीद पडल्यानंतर हिंदुत्वाची ढाल बुलंद केली. इतर नेते जेव्हा बाबरीच्या पतनापासून आपलं अंग चोरत होते तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी माझ्या शिवसैनिकांनी जर बाबरी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे असं जाहीर सभेत सांगितलं.

बाळासाहेबांच्या या घणाघाती भाषणांमुळे मुंबईपुरती मर्यादित असणारी शिवसेना महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कानाकोपऱ्यात पोहचली. 

साल १९९५, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका होत्या. काँग्रेसचे शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. या निवडणुकांना मुंबई दंगली, ९३ चे बॉम्बस्फोट,  किल्लारी भूकंप अशा अनेक घटनांची पार्श्वभूमी होती. खुद्द शरद पवारांचे पुलोद सरकार वगळता महाराष्ट्रात आजवर कधी बिगर काँग्रेसी सरकार आलं नव्हतं. आपापसात भांडायचे पण शेवटी मुख्यमंत्री काँग्रेसचाच व्हायचा.

त्या वेळी मात्र परिस्थिती तशी नव्हती. शिवसेना भाजप या विरोधी पक्षांनी यंदा विधानसभेवर भगवा फडकवायचाच !

शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे जोरदार आरोप होत होते. दाऊदशी मैत्री असल्यापासून ते परदेशी एन्रॉनला महाराष्ट्र विकल्यापर्यंत टीकेची फैरी झडत होती. मुंबई महानगरपालिकेचे गो.रा.खैरनार यांच्या पासून ते अण्णा हजारेंपर्यंत अनेकजण यात आघाडीवर होते.

भाजपच्या गोपीनाथ मुंडेंनी संपूर्ण राज्यात संघर्ष यात्रा काढून जोरदार रान उठवलं होतं.

निवडणुका आल्या आणि त्यांच्या व बाळासाहेब ठाकरेंच्या सभांची गर्दी वाढू लागली. ग्रामीण भागात देखील युतीच्या गाजणाऱ्या प्रचारसभा पाहता  शरद पवारांची खुर्ची डळमळीत होत आहे असं बोललं जात होतं. पण पवार मुरलेले राजकारणी होते. पंतप्रधानपदाची तयारी करणारे पवार मुख्यमंत्रीपद इतक्या सहजासहजी सोडतील असं वाटत नव्हतं.

निवडणुका झाल्या. राजकीय पंडितांचा अंदाज खरा ठरला. काँग्रेसचे शिवाजीराव निलंगेकर पाटील, छगन भुजबळ, पतंगराव कदम, विलासराव देशमुखांसारखे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. काँग्रेसच्या ६१ जागा कमी झाल्या.

भाजप-शिवसेना युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या भाजप–सेनेच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले व राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी तर उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांचा १४ मार्च १९९५ रोजी शपथविधी झाला.

शिवाजी पार्कमध्ये लाखोंच्या जनसमुदायासमोर झालेल्या शपथविधीवेळी खुद्द बाळासाहेब ठाकरे देखील हजर होते. या शपथ दिल्यानंतर राज्यपालांचं प्रयाण झालं आणि बाळासाहेब व्यासपीठावर आले. बाळासाहेब म्हणाले, 

‘आता यापुढे मला प्रचारासाठी फिरायला लावू नका. महाराष्ट्रासाठी इतकं चांगलं काम करा की लोक पुढच्या वेळी तुम्हालाच डोक्यावर घेतील.’ 

बाळासाहेब थकत चालले होते. त्यांनी अनेकांचा आग्रह असूनही युती सरकारचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलं नव्हतं. शिवसेना भाजपचे सरकार हे हिंदुत्वातून निर्माण झाले आहे व ते त्याच निष्ठेने काम करेल असा त्यांना विश्वास होता. मनोहर जोशींना त्यांनी तशी कामगिरी करण्याबद्दल बजावलं होतं.

पण दुर्दैवाने तस घडलं नाही. शिवसेना भाजप युती सरकार देखील इतर सरकारांप्रमाणे राजकारणात अडकले. त्यांनी काही चांगली कामे केली मात्र बहुतांश योजना योग्यरितीने अंमलात आणता आल्या नाहीत. बाळासाहेबांनी मुख्यमंत्री बदलला, नारायण राणे यांची मनोहर जोशी यांच्या जागी नियुक्ती केली. पण तरीही १९९९ सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचा पराभव झाला.

हे ही वाच भिडू.

Webtitle: Balasaheb thackeray : Balasaheb Thackeray said to Manohar joshi that from today people should vote you because of your work not because of me.  

Leave A Reply

Your email address will not be published.