सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीने या गोष्टींना बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं आहे…

देशात आणि महाराष्ट्र काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा त्यांच्यावर सरकारच्या प्रकल्पांना आणि योजनांना केवळ गांधी घराण्याची नाव देत असल्याची टिका सातत्यानं व्हायची. सध्या अशाच टीकांना राज्यात शिवसेनेला सामोरं जावं लागतं आहे. कारण सरकारच्या प्रकल्पांना आणि योजनांना शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा सुरु असलेला धडाका.

सध्या नवी मुंबईच्या विमानतळाची अजून एक वीट पण रचलेली नाही, सगळं अजून कागदावरचं आहे. पण तरी आतापासुनचं या विमानतळाला नाव कोणाचं द्यायचं यावरून वाद सुरु आहे. 

सिडकोकडून या विमानतळासाठी ‘शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे’ यांचं नाव देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तसा ठराव देखील राज्य सरकारकडे पाठवला आहे. कालचं नगरविकास मंत्री यांनी देखील स्पष्ट केलं कि विमानतळाला ‘बाळासाहेब ठाकरे’ यांचचं नाव असणार आहे. 

पण दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवर मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध होतं असून या विमानतळाला भूमिपुत्र असलेले आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी होतं आहे. सोबतचं या आधी बऱ्याच मोठ्या प्रकल्पांना आणि योजनांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात आलं असल्याची टिका देखील स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

याच सगळ्या वादाच्या आणि स्थानिकांकडून होतं असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीकडून नेमकं कोणकोणत्या गोष्टींना दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं आहे हे पाहणं महत्वाचं ठरतं.

१. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग  

नागपूर ते मुंबई समृद्धी मार्गाबाबत १९९५ पासून चर्चा सुरू होती. त्यानंतर २०१४ साली सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प प्रत्यक्षात आणायचे नियोजन केले. त्यानुसार २०१६ साली याबाबत अधिसूचना निघाली.

या दरम्यान फडणवीसांनी या महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याची घोषणा केली होती. मात्र देशातील पहिल्या वहिल्या मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढ बाळासाहेब ठाकरे यांनी रोवली होती. त्यांच्या योगदानाचा आणि दूरदृष्टीचा सन्मान व्हावा यासाठी समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली होती.

त्यानुसार २०१९ साली सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. सध्या नागपूर ते शिर्डी हा प्रवास दृष्टीपथात आला आहे.

२. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय

जून २०१७ मध्ये नागपूरमधील गोरेवाडा इथं आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय उभारण्यास मान्यता मिळाली. त्यासाठी जवळपास ५६४ हेक्टर जमीन केंद्र सरकारच्या वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडून देण्यास मान्यता मिळाली.

पुढे काम सुरु होऊन जानेवारी २०२१ मध्ये हे काम पूर्ण झाले.

त्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून १९ जानेवारी रोजी या प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. एका आठवड्यानंतर म्हणजे २६ जानेवारी २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते या प्रकल्पाचं उदघाटन करण्यात आलं.

३.  चिपी विमानतळ सिंधुदुर्ग – प्रस्तावित 

साधारण २००९ मध्ये राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादीची आघाडी सरकारच्या काळात सिंधुदुर्गचे तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाचं भूमिपूजन केले होते. त्यानंतर त्याचं काम सुरु झालं. पुढे युती सरकार सत्तेत आल्यानंतर देखील या प्रकल्पाचं काम सुरु होते.

अखेरीस २०१९ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि कोकणचे दिग्गज नेते सुरेश प्रभू यांच्या हस्ते या विमानतळाचं लोकार्पण देखील झालं. 

पण अजूनही हे विमानतळ वाहतूक सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र याच सगळ्या दरम्यान या विमानतळाला देखील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची चर्चा सुरु आहे. किंबहुना स्थानिक नेते, शिवसेनेचे प्रखर विरोधी असलेले भाजप आमदार नितेश राणे यांनीच या प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली आहे.

सोबतच स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी नेते बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्याची मागणी देखील होत आहे. त्यामुळे आता या प्रस्तावित नावावर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे येत्या काळात पाहावं लागेल.

४. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून सप्टेंबर २०२० मध्ये घेण्यात आला होता. त्यासाठी १२५ कोटी रुपये लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

महाराष्ट्रातील रस्त्यावर झालेल्या अपघातामधील व्यक्तींना ३० हजार रुपयांपर्यंतच्या मोफत उपचार केले जातील असं सांगण्यात आल होतं. यात भले मग ही व्यक्ती कोणत्याही राज्य, देशाची असली तरी देखील त्यांना या योजेनचा लाभ मिळेल असं देखील सांगितलं होतं.

यासाठी ७४ उपचार पद्धती ठरवण्यात आल्या होत्या. यात अतिदक्षता विभाग व वॉर्डामधील उपचारासह अगदी भोजनाचा देखील समावेश होता.

५. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना

राज्यातील कायम वास्तव्यास असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्तेचा कर, घरपट्टी माफीच्या ‘बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेची’ सुरुवात ऑक्टोबर २०२० मध्ये करण्यात आली आहे.

संरक्षण दलातील शौर्यपदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना नागरी भागातील घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्याची तरतूद नगर विकास विभागानं केली होती. त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागानं देखील ग्रामीण भागातील अशा माजी सैनिकांच्या विधवांना एकच निवासी इमारतीस करातून माफी देण्याची तरतूद केली होती.

मात्र, नागरी व ग्रामीण क्षेत्रातील सर्वच सैनिकांना मालमत्ता करातून सवलत देण्याची तरतूद नसल्याने अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार राज्य सरकारकडून या बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेची सुरुवात केली होती. 
६. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) योजना 

बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) योजनेची सुरुवात जानेवारी २०२० मध्ये सरकारकडून करण्यात आली आहे. त्यासाठी त्यावेळी २१०० कोटींची तरतूद देखील करण्यात आली होती.

या स्मार्ट प्रकल्पांतर्गत कृषी मालाच्या पणन विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

यामध्ये शेतमाल बाजार प्रवेशाच्या नोंदी, प्रतवारी, गुणवत्ता तपासणी, संगणकीकृत शेतमाल लिलाव पद्धती, साठवणूक सुविधा, निर्यात सुविधा निर्मिती, अस्तित्वातील सुविधांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्या व खाजगी बाजार समित्यांना ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकीकृत बाजार नेटवर्कद्वारे जोडण्याची सुविधा यांचा समावेश करण्यात आला होता.

७. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजना

कृषी मालाचे ब्रॅण्डिंग करून तो शहरातील ग्राहकांना विकण्यासाठी सरकारकडून मे २०२० मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती.

त्यावेळी सरकारकडून सांगण्यात आलं होतं की,

टाळेबंदीमध्ये काही शेतकऱ्यांनी स्वत: शेती उत्पादन विक्रीचे प्रयोग केले व ते यशस्वी झाले आहेत. पण आता याच उत्पादनाला ब्रॅण्डिगची जोड दिली तर नक्कीच शेतीमालाला जास्त दर मिळतील. त्यामुळे या योजनेची सुरुवात करण्यात येत आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.