बाळासाहेबांनी साध्या कागदावर जागावाटप केले आणि अर्ध्या तासात शिवसेना भाजप युती झाली…

सध्या महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तेत आहे.. मात्र अनेक कारणांवरून या सरकारमध्ये सध्या कुरबुरी सुरु असल्याची कुजबुज सुरु असते. बऱ्याचदा कुरबुरीचं मुख्य कारण असतं, जागावाटप.

कुणीतरी काहीतरी वक्तव्य करतं, वादाची ठिणगी पडते. मग शिंदे गटाच्या आमदारांकडून आणि भाजपच्या नेत्यांकडून याबाबत सारवासारव केली जाते.

पण सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षात आज भाजप पक्ष मोठा भाऊ ठरलाय तर शिवसेना छोटा भाऊ, त्यामुळे जरी दोन्ही पक्षाने जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला तरी जास्त जागा या भाजपच ठेवणार अशी शक्यता आहे.

पण कधीकाळी असं नव्हतं. राज्यात शिवसेना मोठा भाऊ होती तर भाजप छोटा भाऊ. शिवसेनेच्या मदतीने भाजपने राज्यात हातपाय पसरले. तेंव्हाच्या या काळात बाळासाहेब युतीच्या जागा ठरवत असायचे आणि भाजप निमूटपणे त्यांची अंमलबजावणी करत असत.  त्याचा इतिहास पाहायचा झाला तर…

त्यासाठी खूप वर्ष आधी जावे लागेल. साधारण १९६६ मध्ये मराठी माणसाच्या प्रश्नांसाठी बाळासाहेब ठाकरेंनी बेरोजगार तरुणांना एकत्र करून मुंबईत शिवसेनेची स्थापना केली. खर तर या पक्षाला काँग्रेसच्या काही नेत्यांचा आतून पाठिंबा होता. मुंबईत वाढलेल्या कम्युनिस्ट कामगार चळवळीवर वचक राहावा यासाठी शिवसेना वाढेल याकडेच त्यांचे प्रयत्न असायचे.

सुरवातीपासून बाळासाहेबांनी उजव्या विचारसरणीचा थेट पुरस्कार केला होता. हिंदुत्व त्यांच्यासाठी तेव्हा अग्रक्रमाचा विषय नव्हता पण शिवरायांनी स्थापन केलेली हिंदूपदपातशाही आपण परत आणणार याचा पुनरुच्चार ते आपल्या भाषणातून करायचे. डाव्या संघटनाशी थेट भिडायचा आदेश त्यांनी आपल्या शिवसैनिकांना दिला होता. यानिमित्ताने उजव्या विचारसरणीच्या जनसंघ, हिंदू महासभा यांची शिवसेनेप्रती आपुलकी दिसून येऊ लागली.

युती या शब्दाचा पहिला उल्लेख बाळासाहेबांनी जून १९७० साली दैनिक मराठाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केला.

झालं असं होत की संघाचे तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी एके ठिकाणी वक्तव्य केलं होतं की,

” बाळासाहेब ठाकरे हे जनसंघ व शिवसेना एकत्र यावी यासाठी मला भेटले होते.”

याच संदर्भाला धरून एका प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनाप्रमुख म्हणाले,

“गोळवलकर गुरुजी यांनी दिलेल्या मुलाखतीत तथ्य नाही. गुरुजी मुंबईत आले असताना त्यांनी प्रबोधनकारांची त्यांच्या आजारपणात भेट घेतली होती. मी दोन वर्षापूर्वी नागपूर येथे गेलो तेव्हा त्यांची सहज भेट घेतली होती. या भेटीत राजकीय “युती” चा उल्लेख नव्हता. आम्हा दोघांची सर्वसाधारण राजकीय परिस्थिती वर बोलणी झाली होती. युती व्हायची ती जाहीरपणे होईल. त्यात घाबरण्याचे कारण काय?”

इथून पहिल्यांदा युतीची चर्चा सुरु झाली. या मुलाखतीमध्ये सुद्धा कळेल की अगदी पहिल्यापासून बाळासाहेबांनी जनसंघावर(पूर्वाश्रमीचा भाजप) वजन ठेवूनच बोलणी चालू ठेवली होती.

याच वर्षी कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा खूनानंतर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत पहिल्यांदा शिवसेना उमेदवाराला  पाठिंबा दिला. ही निवडणूक जिंकून वामनराव महाडिकांच्या रूपाने शिवसेनेचा पहिला आमदार विधानभवनात गेला. ही युती फारकाळ टिकली नाही.

पण पुढचा काळ शिवसेना आणि काँग्रेस यांच्या छुप्या युतीचाच होता. इंदिरा गांधींच्या आणीबाणीचे तर शिवसेनेने खुले समर्थन केले. तर जनसंघ आणीबाणी विरोधातल्या जनता पक्षात सहभागी झाला होता.

१९८२ च्या गिरणी संपात पहिल्यांदा कामगार मैदानात सभा घेऊन बाळासाहेबांनी आपण काँग्रेसबरोबरची मैत्री तोडत आहोत अशी घोषणा केली.

तो पर्यंत जनता सरकारचा प्रयोग फसला होता. जनसंघ त्यातून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा आणि शिवसेना एकत्र लढली. पण इंदिरा गांधींच्या हत्येवेळी आलेल्या लाटेत या दोन्ही पक्षांची वाताहत झाली. पुढच्या विधानसभा निवडणुकीत दोघांनी एकमेकांची साथ सोडली.

बाळासाहेब म्हणाले,

“कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या!!”

या निवडणुकीपर्यंत दोन्ही पक्षांनी हिंदुत्व हा मुख्य मुद्दा केलाच नव्हता. पण वारंवार येणारा पराभव बघता जनतेची नस पकडण्यासाठी येत्या काळात याच मुद्द्याची कास धरावी लागेल हे त्यांनी ओळखल.

यात आघाडीवर होते लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन.

विश्वहिंदूपरिषदेने सर्वप्रथम रामजन्मभूमीचा प्रश्न हाती घेऊन हिंदुत्वाला देश पातळीवर नेले. पाठोपाठ १९८७ च्या विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणुकीवेळी पहिल्यांदाच अधिकृतरीत्या शिवसेनेने हिंदुत्वाची शाल पांघरली. भाजप त्यांच्या विरुद्धच लढला. पण शिवसेनेने केलेल्या आक्रमक हिंदुत्वाच्या प्रचारापुढे सगळेच विरोधक उडून गेले. शिवसेनेचा विजय झाला.

याच निवडणुकीनंतर प्रमोद महाजनांनी दिल्लीतल्या आपल्या श्रेष्ठींना महाराष्ट्रात शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मिळवलेले यश आणि त्यांच्याशी सहकार्य करून युती करण्याबद्दलचा मुद्दा समजवायला सुरवात केली. राज्यभर कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन शिवसेनेशी युती करायची की नाही हे प्रश्न थेट विचारले.

अखेर जून १९८९ मध्ये हिमाचलप्रदेश येथील पालमपूर येथे झालेल्या भाजपच्या चिंतन बैठकीत दोन महत्वाचे निर्णय झाले.

एक होता की विश्वहिंदू परिषदेच्या रामजन्मभूमीला पाठिंबा आणि महाराष्ट्रात शिवसेनेशी युती !!

भाजपने तर निर्णय घेतला पण अजून बाळासाहेब ठाकरेंची संमती मिळायची होती. त्यासाठी प्रमोद महाजनांना मोहिमेवर पाठवण्यात आलं. महाजन अटलजी अडवाणी यांचा संदेश घेऊन मुंबईत मातोश्रीवर आले. असं म्हणतात कि फक्त अर्धा तास बैठक चालली.

बाळासाहेबांनी एका साध्या कागदावर काही तरी आकडा लिहून दिला आणि महाजनांना तो कोणतीही खळखळ न करता मान्य करावा लागला. प्रमोद महाजन त्या दिवशी युती करूनच मातोश्रीमधून बाहेर पडले.

भावाभावाचा हा संसार सुरु झाला.

त्यावर्षी झालेली लोकसभा निवडणुक युतीची अधिकृत पहिली मोठी निवडणुक ठरली. यावेळी भाजपचे खासदार २ वरून ८५ ला पोहचले. शिवसेनेला या निवडणुकीत मिळालेली मते काँग्रेसला भविष्यात डोकेदुखी करणार हे स्पष्ट दिसू लागले होते.

फक्त प्रमोद महाजन होते म्हणून युती शक्य झाली. त्यांचा सगळ्यांना घेऊन जाण्याचा समजूतदार स्वभाव, प्रसंगी एक पाऊल मागे घेण्याची धूर्त भूमिका यामुळे १९९५ साली युतीचा झेंडा विधानसभेवर फडकला. मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री अशी वाटणी झाली. पुढे प्रत्येक निवडणुका अशाच लढल्या गेल्या. भांडणे झाली पण वितुष्ट आले नव्हते.

पण प्रमोद महाजन, बाळासाहेब अशा जुन्या नेत्यांच्या निधनानंतर कुरबुरी वाढत गेल्या आणि आज अशी परिस्थिती आहे की एकमेकांसोबतचा संसार मोडावा लागला. आता पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र आलेत मात्र २०२४ च्या जागावाटपावरून दोघात वितुष्ट पडणार का काही सांगता यायचं नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.