रुग्णालयात भेटायला आलेले बाळासाहेब फडणवीसांच्या काकूंना म्हणाले, “डाळ कमी खा !”

नव्वदच्या दशकातली गोष्ट. पहिल्यांदाच महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालं होतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले होते. बाळासाहेबांच्याच भाषेत सांगायचं झालं तर भगवा झेंडा विधिमंडळावर फडकला होता आणि मंत्रालयात सेनेची नवी शाखा उघडली होती.

मुख्यमंत्री मनोहर जोशी असले तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल मंत्रालयात नसून मातोश्री बंगल्यातून चालायचा. 

बाळासाहेबांचा स्वभाव बेधडक होता. चांगलं काम केलं तर आपल्या सहकाऱ्यांचं ते कौतुक करायचे पण एखादी चूक झाली तर प्रसंगी कान उपटण्यास देखील ते मागे पुढे बघायचे नाहीत.

दोन्ही पक्षातील नेत्यांना सत्ता व प्रशासन चालवण्याचा अनुभव नव्हता. अपक्षांच्या टेकूवर स्थापन झालेले सरकार सुरवातीच्या गोडगुलाबी दिवसानंतर करुबरु लागले. नव्या सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न विरोधी पक्षांपेक्षा युतीचेच नेते करत आहेत हे स्पष्ट होत होते.

मनोहर जोशींच्या सरकारला वेगवेगळ्या पातळीवर संघर्ष करावा लागला. त्यांना सगळ्यात मोठा फटका मात्र अण्णा हजारेंच्या आंदोलनावेळी बसला.

शरद पवार यांच्या सरकारवेळी जेव्हा अण्णांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांची फैरी झाडली होती तेव्हा युतीचे नेते अण्णांच्या पाठीशी उभे होते. तेव्हा अण्णांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चांगले संबंध होते. पुढे सत्ता आल्यावर युतीच्या मंत्र्यांविरुद्ध काही तक्रार असेल तर अण्णा मातोश्रीवर जाऊन भेटत होते. एकदा तर पत्रकार परिषदेमध्ये अण्णा म्हणाले होते की,

शिवसेनाप्रमुख हाच आता आशेचा किरण आहे. केवळ तेच हा सर्वव्यापी भ्रष्टाचार मोडून काढण्याचे धाडस दाखवू शकतात. अन्य कोणातही हिंमत नाही.

पण लवकरच हे संबंध विकोपाला जाऊ लागले. युती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात २० नोव्हेंबर १९९६ रोजी अण्णांनी सुरू केलेले उपोषण सुरू केलं. हे उपोषण १२ दिवस चालले. युती सरकारमधील महादेव शिवणकर व शशिकांत सुतार या दोन मंत्र्यांचा राजीनामा घेऊनच अण्णांचे उपोषण संपले.

सत्ता स्थापनेपासून पहिल्यांदाच मनोहर जोशी यांच्या सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले होते.

पण अण्णांची आंदोलने थांबली नाहीत. युती शासनातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे मोठमोठे आरोप होतच राहिले. अण्णा हजारे व सरकार यांच्यातील संघर्ष आणखी गडद होऊ लागला.

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे युती शासनातील आणखी एका मंत्र्याची विकेट पडली, त्या होत्या अन्न व पुरवठा मंत्री शोभाताई फडणवीस.

शोभाताई फडणवीस या मूळच्या विदर्भातल्या. अनेक पिढ्यांपासून जनसंघ आणि भाजप या पक्षांशी त्यांचं कुटूंब कार्यरत होते. त्यांचे दीर गंगाधरपंत फडणवीस हे नागपूर येथे अनेक वर्ष विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्या स्वतः चंद्रपूर इथल्या एका मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांचे पुतणे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे पुढे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण त्यांच्या पूर्वी फडणवीस घराण्याच्या राजकारणाची सूत्रे आणि गंगाधरपंतांचा वारसा शोभाताईंकडे चालत आला होता.

अशा या शोभाताई फडणवीस यांच्यावर १९९७ साली शोभाताई फडणवीस रेशनमधील तूर डाळीच्या घोटाळ्याचे आरोप झाले. विरोधकांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं. पार्टी विथ डिफरन्स म्हणून म्हणवल्या जाणाऱ्या भाजपसाठी हा मोठा धक्का होता. 

कितीही मोठा नेता असो भ्रष्टाचार मुळात खपवून घेतला जाणार नाही अशी बाळासाहेबांची भूमिका होती. त्यांनी भाजपच्या नेत्यांवर तसा दबाव आणला. अखेर डाळ घोटाळ्यामुळे शोभा ताईंना अन्न व पुरवठा खाते सोडायला लागले.

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कणखर व्यक्तिमत्वाचे होते. मात्र कितीही बाका प्रसंग आला तरी त्यांच्यातील तीक्ष्ण विनोदबुद्धी शाबूत असे. याचाच अनुभव शोभा ताई फडणवीस यांना आला. त्यांच्या राजीनाम्यानंतर लगेच झालेली हि घटना,

झालं असं होतं एकदा काही कारणामुळे शोभाताई फडणवीस यांना मुंबईत रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची तब्येत थोडी बिघडली होती. शोभाताईंच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे तिथे आले. त्यांनी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. सगळी विचारपूस केली. थोड्या वेळाने मिश्किल हसत बाळासाहेब म्हणाले,

 ‘काय ताई, डॉक्टरांनी काही पथ्य सांगितली असतील ना, डाळ वगैरे टाळा.’

शाब्दिक कोटी करण्यात बाळासाहेब मोठे तरबेज होते. त्यांनी मिश्कीलपणे शोभाताई फडणवीस यांच्यावर झालेल्या डाळ घोटाळ्याच्या आरोपावरून ही टिप्पणी केली होती. त्यांचा ठाकरी बाणा हा रोखठोक तर होताच मात्र त्याला मिश्किल विनोदाची झालर देखील होती..

हा किस्सा शिवसेनेचे माजी आमदार सुरेश नवले यांनी एके ठिकाणी सांगितला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.