अजान सुरू झाली अन बाळासाहेबांनी आपलं भाषण थांबवलं….

राज्यात सद्या मशिदीवरच्या भोंग्यांचा मुद्दा पेटलाय. जेंव्हा जेंव्हा राज्यात हिंदू मुस्लिम वाद निर्माण होतात तेंव्हा तेंव्हा विरोधक सत्ताधारी शिवसेनेच्या विचारधारेवर बोट ठेवतात. त्याच वरून भाजप नेते आणि राज ठाकरे देखील मशिदीवरच्या भोंग्यांचा वाद उकरून काढत शिवसेनेला डिवचत आहेत.  

जसं सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आघाडीत सामील झाली तसं शिवसेनेवर टीका होतेय की, सेनेने हिंदुत्ववादी बाणा सोडला, सेना आता सेक्युलर बनत चालली वैगेरे वैगेरे.

आता अजानच्या मुद्द्यावरून विरोधक सेनेला बाळासाहेबांची अजानच्या बाबतीत असणाऱ्या भूमिकेची आठवण करून देत आहेत.  

काय होती बाळासाहेबांची भूमिका ?? याबाबतीचा एक किस्सा सर्व काही सांगून जातो.

या किस्स्याच्या आधी हे समजून घेतलं पाहिजे की, शिवसेनेने १९८५ पासूनच अधिकृतपणे हिंदुत्ववाद स्विकारला. १९८७ साली विलेपार्लेत विधानसभेची पोटनिवडणूक  ‘गर्व से कहो हम हिंदू है’ !!! असं म्हणत शिवसेनेने पहिल्यांदा हिंदुत्वाच्या मुद्यावरुन लढवली आणि जिंकली सुद्धा.

तर किस्सा होता २००५ च्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यानचा. या दरम्यान नुकताच राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादीचं सरकार आलेलं. त्यामुळे औरंगाबादची महानगरपालिका आपल्यालाच मिळावी या हेतूने सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रयत्न सुरु केले. 

काहीही करून कसेही करून औरंगाबादचा गड राखायचा सेनेने ठरवलं तर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. कारण त्याच्या आधी १५ वर्षांपासून औरंगाबाद मध्ये शिवसेनेची सत्ता होती. या महानगरपालिकेवर शिवसेनेचे एकहाती वर्चस्व होतं. तरीदेखील सेनेच्या मनात काहीशी भीती होती की आपला गड राखला जाईल की नाही…

सेना आणि भाजपची युती होती. युतीने तर थेट बाळासाहेबांनाच प्रचारामध्ये उतरवलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून बाळासाहेबांची प्रचार सभा औरंगाबाद मध्ये आयोजित करण्यात आली होती. 

औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा आयोजित केली गेली. सभा यशस्वीपणे पार पाडावी यासाठी सेनेने जोर लावला. सर्वजण या सभेकडे लक्ष ठेवून होते. ही सभा नेमका काय बदल घडवू शकते, वातावरण फिरवू शकते का याबाबतीत, राजकीय वर्तुळातून कित्येक आडाखे बांधले जात होते. 

ठरल्याप्रमाणे सभेतील बाळासाहेबांचं भाषण सुरू झालं. बाळासाहेब आपल्या भाषणात नेहेमीचे मुद्दे मांडत होते. त्यांच्या एका – एका वाक्यावर सांस्कृतिक मंडळाचं मैदान अक्षरशः टाळ्यांनी दुमदुमून गेलं.

अचानक बाजूच्या मशीदीत आजान सुरु झाली. 

आजान आवाज ऐकताच बाळासाहेब भाषण करता करता थांबले. सगळ्या मैदानात एकच सन्नाटा पसरला. काही सेकंदात आजान बंद झाली आणि बाळासाहेबांनी एक पॉज घेतला आणि पुन्हा भाषण सुरु केलं.

अजान चा धागा पकडत बाळासाहेबांनी नेहमीच्या आपल्या स्टाईलने एक हात वर करून औरंगाबादच्या जनतेला उद्देशून एक प्रश्न विचारला…..

हे.. याचसाठी विचारतोय… तुम्हाला औरंगाबाद हवंय की संभाजीनगर???

बस्स्स…..मैदानात टाळ्यांचा कडकडाट झाला. मैदानातला हर एक शिवसैनिक बाळासाहेबांच्या नावाने घोषणा द्यायला थकत नव्हता. 

बाळासाहेबांचा हाच एक प्रश्न निर्णायक ठरला आणि सगळं वातावरणच फिरलं. निवडणुका व्हायच्या आणि निकाल लागायच्या आधीच बाळासाहेबांच्या विजयाच्या घोषणा दिल्या जात होत्या.

प्रतिष्ठेच्या बनवलेल्या या औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत युतीला सेनेमुळे त्यातल्या त्यात बाळासाहेबांचा या सभेमुळे यश आलं. औरंगाबादचे शिवसैनिक आजही या सभेच्या आठवणी सांगतात.

औरंगाबाद – संभाजीनगर हा मुद्दा शिवसेनेने सुरुवातीपासूनच कळीचा मुद्दा बनवला.

१९८८ च्या निवडणुकीच्याही आधी बाळासाहेबांनी औरंगाबाद मध्येच घोषणा केली होती की, औरंगाबाद चे नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावं. १९८८ च्याही निवडणुकीमध्ये याच मुद्द्याचा शिवसेनेला फायदा झाला अन सेनेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. मग काय सेनेने हा मुद्दा वारंवार लावून धरला.

१९९५ ला जेंव्हा शिवसेना – भाजप युतीचं सरकार आलं तेंव्हा सेनेच्या पुढाकाराने कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात आलं होतं. २००५ मध्ये देखील या सभेच्या निमित्ताने सेनेच्या वतीने संभाजीनगर हा मुद्दा पुन्हा समोर आणला आणि याही निवडणुकीत सेनेला त्याचा फायदा झाला. 

हा निवडणुकीचा मुद्दा झाला…. 

पण बाळासाहेब म्हणायचे “आम्हाला प्रत्येक धर्म प्यारा आहे. त्यात राष्ट्रीयत्व असायला पाहिजे. जे मुस्लीमधर्मीय राष्ट्रीयत्व मानतात ते आमचे आहेत”.

मातोश्रीवर शिवसेनाप्रमुखांनी मुस्लीम जोडप्याला नमाज पढण्याची परवानगी दिली होती हे सर्वच जण जाणून आहेत. 

आणखी एक म्हणजे, बाळासाहेबांचे मानसपुत्र  साबीर शेख हे जन्माने मुस्लीम होते. साबीर भाईंचे शिवछत्रपतींवरील प्रेम, अभ्यास बघून बाळासाहेबांनी त्यांना शिवभक्त ही उपाधी दिली होती. बाळासाहेब ठाकरे मुस्लीमविरोधी आहेत असे चित्र त्याकाळच्या माध्यमांनी रंगवलं. पण त्यांचे हे किस्से बरंच काही सांगून जातात.

तेच २०२० ची घटना तर यात भर घालते. दरम्यान मुंबईमधील शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लीम मुलांसाठी ‘अजान पठण’ स्पर्धा आयोजित केली होती. त्यावर भाजपने बरीच टीका केली होती. 

बाळासाहेबांची भूमिका असो वा सद्या चालू असलेला वाद असो..हे आधी लक्षात घेतलं पाहिजे की, “अजानला विरोध नाहीये तर लाऊडस्पीकरवरून अजान पढली जाते त्याला विरोध आहे”

हे हि वाच भिडू :

  

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.