बाळासाहेब म्हणलेले, “UPA ला पाठिंबा देणे काळाची गरज आहे, कोणी आम्हाला गृहीत धरू नये “

सध्या देशाच्या राजकारणात सर्वात मोठी बातमी काय असेल तर ती म्हणजे शिवसेना आता युपीएत दाखल होणार आहे. एनडीएची साथ सोडल्यानंतर हे जवळपास निश्चित झालंय. आणि युपीए मध्ये सहभागी होण्याचा त्यांचा मुहूर्तदेखील ठरलाय.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बहुतेक हा मुहूर्त असावा. 

आणि हे सगळं वृत्त आहे ते सूत्रांच्या हवाल्याने. शिवसेना यूपीएत जाणार हे आता जरी ठरलं असलं तरी त्याची बीज २०१२ सालच्या बाळासाहेब ठाकरेंच्या एका वक्तव्यात आढळतात. ते म्हंटले होते की,

भाजपने कायम आपल्याला गृहीत धरू नये.

हे घडलं होत २०१२ सालच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवेळी. आज शिवसेना अधिकृतपणे यूपीएत सामील होईल पण हा किस्सा दुर्लक्षित करून चालणार नाही. 

शिवसेनेने प्रसंगानुरूप वेळोवेळी आपली लाईन बदलली आहे. आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नसून राष्ट्रीयत्वाला धरुन असल्याचे वेळोवेळी सांगत आपला मित्र पक्ष असणाऱ्या भाजपवर टीका करायला ही शिवसेनेने कधी मागे पुढे पाहिलं नाही.

२००७ साली प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यूपीएच्या उमेदवार होत्या. त्यावेळी मराठी उमेदवारास पाठिंबा देण्याची भूमिका घेत एनडीएच्या विरोधात जाऊन बाळासाहेबांनी प्रतिभाताईंना पाठिंबा दिला होता.

२०१२ साली पण अशीच परिस्थिती उद्भवली. 

काँग्रेसप्रणित UPA चे उमेदवार प्रणव मुखर्जी हे होते. तर  भाजपप्रणित NDA ने पी. ए. संगमा यांना राष्ट्रपतिपदासाठी निवडणुकीत पाठिंबा दिला होता.

राष्ट्रपतिपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांनी आपली राष्ट्रपतीपदी बिनविरोध निवड व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले. याचाच एक भाग म्हणून त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना फोन करून पाठिंबा द्यावा अशी मागणी केल्याची चर्चा तेव्हा जोर धरू लागली.

२००७ साली शिवसेनेने एनडीएपासून दूर जाऊन काँग्रेस उमेदवार प्रतिभा ताईंना जो पाठिंबा दिला होता तो संदर्भ लक्षात घेऊन प्रणवदांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घ्यायचं ठरवलं. 

पण त्याआधीच भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या निवासस्थानी आयोजित एनडीएच्या बैठकीसाठी खासदार संजय राऊत दिल्लीला गेले होते. मात्र ते बैठकीत सहभागी झाले नव्हते. याचं कारण मुखर्जींनी शिवसेनाप्रमुखांना केलेला फोन.

त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रणव मुखर्जी यांना घेऊनच थेट मातोश्रीवर गेले आणि बाळासाहेबांचा पाठिंबा मिळवला. आणि NDAच्या निर्णयापासून वेगळे राहत शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहिली, ज्यांना बाळासाहेब प्रेमाने ‘प्रणवबाबू’ म्हणायचे.

हा पाठिंबा जाहीर केल्यानंतर काँग्रेस-सेनेच्या वाढत्या मैत्रीबाबत भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाच थेट जाब विचारण्याची तयारी काही भाजप नेत्यांनी चालवली.

त्यावेळी ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीला धूळ चारण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेशी हातमिळवणी केली. त्यानंतर भिवंडी महानगरपालिकेमध्येही तशाच पद्धतीने काँग्रेस व सेना युती झाली. पाठोपाठ राष्‍ट्रपतीपदासाठी सेनेने सलग दुसऱ्यांदा यूपीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने ही नवी मैत्री आणखी घट्ट होत चालली आहे काय, अशी काळजी भाजपला लागली.

कोणत्या मुद्द्यावर सेनेने प्रणवदांना पाठिंबा दिला, हा प्रश्न भाजपला भेडसावायला लागला. २००७ साली मराठी उमेदवार म्हणून प्रतिभाताईंना पाठिंबा दिला होता. २०१२ ला मुखर्जींना पाठिंबा द्यायचे कारण सेनेने स्पष्ट केल नाही, असे भाजपचे एक ज्येष्ठ नेते त्यावेळी म्हंटले होते.

यावर बाळासाहेबांनी कठोर भूमिका घेत म्हंटल की,

युपीएच्या उमेदवाराला पाठिंबा देणे ही काळाची गरज आहे आणि भाजपने कायमच आम्हाला गृहीत धरू नये.

हा मुद्दा तेव्हा मिटला होता. मात्र आता बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरे UPA त सहभागी होत असताना ही काळाची गरज असल्याचीच त्यांची भूमिका आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.