नगरसेवकांना सांगितलं,” आयुक्तांना अडचणी आणल्या तर वेळ पडल्यास ठाणे पालिका बरखास्त करू”

एखादा डॅशिंग आयएएस ऑफिसर आपल्या जिल्ह्यात आला आणि त्यांनी आपल्या जिल्ह्याचं सगळं रुपडं पालटून टाकलं, सगळीकडे कसे स्वच्छ, रुंद रस्ते, असं सगळं चित्र आपण एक तर इमॅजिन करू शकतो नाही तर मग एखाद्या साउथ च्या मुव्हीत दिसतो.

रिअल मध्ये पाहायला गेलं तर असे खूप कमी ऑफिसर आहेत पण शेवटी त्यांना कोणत्या न कोणत्या राजकारणी नेत्यामुळे बदलीला सामोरं जावं लागतं नाही तर गपगुमान आपलं आपलं काम करावं लागतं.

पण आज अशा एका आयएएस ऑफिसर बद्दल आपण बोलणार ज्याची नियुक्तीच एका बड्या नेत्याने केली होती ठाणे शहर ‘स्वच्छ’ करायला …

ज्येष्ठ आयएएस अधिकारी टी. चंद्रशेखर यांची ठाणे येथे बदली झाली तीही बाळासाहेबांच्या इच्छेनुसार.

मुंबईत युतीचं शासन आलं आणि आता ठाणे महापालिकेचा आयुक्त कोण होणार हा मोठा चर्चेचा विषय होता. 

अनेक मोठ्या मोठ्या नावांची चर्चा होती, तेवढ्यात एका रात्री आठ च्या सुमारास चंद्रशेखर यांना  मंत्रालयातून फोन आला आणि त्यांना कळले कि त्यांना ठाणे महापालिकेचा आयुक्त म्हणून नेमण्यात आले. तेंव्हा ते रत्नागिरीचे जिल्ह्याधिकारी म्हणून कार्यरत होते. तेंव्हा तिथे चंद्रशेखर यांच्यासोबत महाराष्ट्र टाइम्स चे प्रतिनिधी जयप्रकाश प्रधान हे हि उपस्थित होते.

तेंव्हा त्यांनी प्रधान यांना ठाणे पालिकेत माझीच निवड का केली याबाबतीतची हकीकत सांगितली. “ठाणे शहराचा विकास व्हावा म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची फार इच्छा आहे म्हणून त्यांनी माझ्यावर तो विश्वास दाखवत माझे नाव सुचवले आहे”.

विशेष म्हणजे चंद्रशेखर यांनी बाळासाहेबांना एक अट घातली कि,

“मी जरी इथे नियुक्त झालो आणि ठाण्याच्या विकास कामे ज्या धडाडीने मी करेल जसे कि, अतिक्रमण, रस्ता रुंदीकरण, परंतु हे स्थानिक मंत्री, नगसेवक, पदाधिकारी यांना ते रुचणार नाही. मग ते माझ्या बदलीसाठी प्रयत्न करतील हे तर ठरलेलेच आहे. परंतु माझी आयुक्तपदाची कारकीर्द पूर्ण होईपर्यंत म्हणजेच तीन वर्ष माझी ठाण्यातून बदली होणार नाही असं आश्वासन मला तुमच्याकडून मिळत असेल तरच मी इथे येण्यास मान्य होईल”.

विशेष म्हणजे बाळासाहेबांनी ते मान्य केलं. याबाबतीत त्यांनी एका मुलाखतीत सांगितलंही होतं.

दुसऱ्या दिवशी सगळीकडे याची बातम्या छापून आल्या. पण महाराष्ट्र टाइम्सला मात्र या बातमीमागची गोष्ट सांगण्यात आली, कि स्वतः बाळासाहेबांनी ठाण्याच्या विकासासाठी चंद्रशेखर यांनी नियुक्ती करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांना केल्या होत्या.

आणि या बातमीमुळे सगळीकडेच अगदी शासनात, महापालिकेत आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील चर्चा झाली कि, खुद्द मोठ्या साहेबांनी या अधिकारयाची नियुक्ती केली. 

अशाप्रकारे चंद्रशेखर जॉईन झाले आणि त्यांनी कामाचा धडाकाच सुरु केला.

पहिलं काम हातात घेतलं रस्तारुंदीकरणाचं, जसं कि हे काम फार सोपं नव्हतं. कारण अनधिकृत इमारती, हॉटेल्स,दुकानं यात जाणार होती त्यामुळे साहजिकच त्यांचा विरोधही पत्करावा लागणार होता.

बाळासाहेबांच्या नावामुळे चंद्रशेखर यांना विरोध करण्याची हिंमत हि कुणी करत नव्हतं.

यामुळे याचा पुरेपूर फायदा चंद्रशेखर यांनी करून घेतला. त्यांनी ठाणे -मुलुंड हद्दीमधील प्रचंड मोठे अनधिकृत बार, रात्रीचे डान्सबार, इमारती तोडल्या. यात तर राजकारण्यांचे करोडो गुंतले होते त्यामुळे फोनाफोनी होणारच होती हे ते जाणून होते त्यामुळे त्यांनी एक आयडिया केली,

तोडफोड चालू व्हायची आणि चंद्रशेखर आपला मोबाईल बंद करून ठेवायचे. त्यामुळे ‘कारवाई थांबवा’ असा कुणाचा फोन घ्यायची वेळच यायची नाही. आणि अशाप्रकारे तेथील लांबलचक पट्टा बेकायदेशीर बांधकामातून मोकळा झाला होता.

परंतु हळूहळू वातावरण बदलू लागलं. चंद्रशेखर आता सर्वांनाच नकोसे होऊ लागले. बाळासाहेबही त्यांच्यावर काही आक्षेप घेत नव्हते.

शेवटी बाळासाहेबांचा विरोध डावलून ठाणे महापालिकेने चंद्रशेखर यांच्यावर अविश्वासाचा ठरावच समंत झाला. आणि मग चंद्रशेखर आणि ठाणे महापालिका यांच्यातले भांडण वाढले. मग याच संदर्भात महाराष्ट्र टाइम्स ने बाळासाहेबांची मुलाखत घ्यायची ठरवली आणि अनेक गोष्टी समोर आल्या.

त्या मुलाखतीमध्ये बाळासाहेबांनी अर्थातच कुठलाही आडपडदा न ठेवता अगदी स्पष्ट इशारा दिला कि,

ठाण्यातले नगरसेवक महापालिका आयुक्तांना काम करण्यास अडचणी आणत असतील तर, मला याची गंभीर दाखल घ्यावी लागेल आणि वेळ पडल्यास ठाणे महापालिका बरखास्त करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. 

ते पुढे असंही म्हणाले , ठाण्याच्या विकास कामाची गती कायम ठेवण्यासाठी अशाच कार्यक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे आणि मी अशा अधिकाऱ्यांना सहकार्य करीत राहील. आणि इतर कुणी सहकार्य करत नसेल तर मग महापालिका बरखास्तीशिवाय दुसरा पर्याय माझ्झ्याकडे राहणार नाही त्यामुळे गोष्टी त्या थराला जाऊ नये याची काळजी नगरसेवकांनी घ्यावी.

चंद्रशेखर हे आमच्या पाठिंब्या शिवाय ठाण्यात काहीही करू शकले नसते, त्यामुळे मी तसे मुख्यमंत्र्यांनाही स्पष्ठपणे सांगितले होते. आणि ज्या नगरसेवकांनी या ठरावात सहभाग घेतला त्या नगरसेवकांच्या पुढच्या वेळेस तिकीट देतांना काळजी घटली जाणार असंही ते म्हणाले.

अशाप्रकारे बाळासाहेबांच्या सपोर्टमुळे चंद्रशेखर यांनी ठाण्यात केलेली विकासकामे ठाणेकरांच्या नेहेमीच लक्षात राहतील हे नक्कीच.

संदर्भ : बातमी मागची बातमी, जयप्रकाश प्रधान.

हे ही वाच भिडू

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.