राणेंनी सेना सोडलेली तरी बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंचे पुस्तक त्यांना भेट म्हणून पाठवले…

नारायण राणे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वादळी व्यक्तिमत्व. कोणताही राजकीय वारसा नसताना अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या राणेंची सुरवात रस्त्यावर लढणारा शिवसैनिक म्हणून झाली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा लाडका शिवसैनिक. शिवसेनेच्या सत्तेच्या प्रत्येक टप्प्यावर बाळासाहेबांनी राणेंना अनेक पदे दिली. राणेंनी देखील हा विश्वास सार्थ करून दाखवला. बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे नगरसेवकापासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली. पुढे सत्ता गेल्यावर ते विरोधी पक्ष नेता देखील बनले.

नेमक्या याच काळात शिवसेनेत नवीन नेतृत्वाचा उदय होत होता. ते होते उद्धव ठाकरे.

उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे सुपुत्र जरी असले तरी त्यांच्याकडे तो राजकीय करिष्मा नव्हता. त्यांना वडिलांप्रमाणे जबरदस्त वक्तृत्वाची देणगी लाभली नव्हती. त्यांची काम करण्याची स्टाईलच वेगळी होती. त्यांनी आक्रमक शिवसेनेला वेगळं रूप देण्यास सुवात केली. संघटना नव्याने बांधणी करण्यास सुरवात केली. या नव्या स्वरूपामुळे नारायण राणे यांच्यासारखे जुने नेते नाराज झाले.

२००३ साली उद्धव ठाकरेंना पक्षाचा कार्याध्यक्ष करण्यात आलं. राणेंची नाराजी वाढतच गेली. त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण नारायण राणे यांची नाराजी दूर झाली नाही. २००५ साली त्यांनी आपल्या समर्थक आमदारांसह पक्ष सोडला.

एकेकाळी शिवसेनेत पक्ष सोडणे म्हणजे गद्दारी समजली जायची. बाळासाहेब ठाकरे सोडा साधे शिवसैनिक देखील या गद्दारांना माफ करायचे नाहीत. 

१९९१ साली भुजबळांनी पहिल्यांदा शिवसेना पक्ष फोडला आणि त्यांनी सर्व शिवसैनिकांचं वैर अंगावर घेतलं. भुजबळांवर चिडलेले शिवसैनिक त्यांच्या जीवावर उठले होते. कित्येक दिवस भुजबळांना अंडर ग्राउंड व्हावं लागलं होतं. एकदा तर त्यांच्यावर हल्ला देखील झाला होता. यातून कसेबसे छगन भुजबळ वाचले. 

पण नारायण राणेंवर अशी वेळ आली नाही. त्यांनी उजळ माथ्याने पक्ष सोडला. काँग्रेसमध्ये गेले. इतकंच नाही तर बाळासाहेब ठाकरेंची भावनिक प्रचारसभा होऊनहि त्यांनी कणकवलीमधून पोटनिवडणूक जिंकली.

बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंची संभावना कोंबडीचोर म्हणून केली. पण राणेंनी भुजबळांप्रमाणे त्यांच्यावर पलटवार केला नाही. बाळासाहेबांचे उपकार कधीही विसरणार नाही असं सांगत ते आपल्या पक्ष सोडण्याचं दूषण उद्धव ठाकरेंना देत राहिले .

पुढे नारायण राणे काँग्रेसमध्ये रमले. पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपद दिल नाही पण राणेंनी मिळेल ते मंत्रिपद घेऊन आपला लढा चालूच ठेवला.मधल्या काळात त्यांचा बाळासाहेब ठाकरेंशी संपर्क पूर्णपणे तुटला.

बाळासाहेब ठाकरे हे दिलदार स्वभावाचे होते. त्यांचा स्वभाव फटकळ होता. राग आला तर ते समोरच्याचा मुलाहिजा ठेवायचे नाहीत. पण आयुष्यभर शत्रुत्व जपायचं नाही हे तत्व त्यांनी आवर्जून पाळलं. विशेषतः पहिल्या फळीतील शिवसैनिकांबद्दल तर त्यांना प्रचंड जिव्हाळा होता. 

राणेंनी पक्ष फोडला याबद्दल ते नाराज होते मात्र पुढच्या काळात त्यांनी राणेंना माफ देखील केलं होतं.

नारायण राणे सांगतात पक्ष सोडल्यानंतर त्यांचे दोन वेळा शिवसेनाप्रमुखांशी संभाषण झालं होतं. स्वतः राणेंनी याबद्दलची आठवण एकेठिकाणी सांगितली आहे.

ते म्हणतात, ‘‘उद्धव ठाकरे यांचे ‘पाहावा विठ्ठल’ हे पुस्तक शिवसेनाप्रमुखांनी मला भेट म्हणून पाठवले होते. त्यासोबत असलेल्या पत्रात प्रतिक्रिया कळवावी, असे नमूद केले होते. त्या पुस्तकावर आपण पुस्तक आवडल्याची प्रतिक्रिया पत्र पाठवून कळवली. ती प्रतिक्रिया आपण अत्यंत मनापासून दिली होती. ते पत्र वाचल्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी फोन केला,’’

एवढंच नाही एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणेंनी टीका केली होती. त्यानंतर ते कणकवलीला गेले तेव्हा बाळासाहेबांचा फोन आला. ‘राजकारण जरूर करा. पण उद्धवबरोबर वैरभाव ठेवू नका’ असे ते म्हणाले.

नारायण राणे आजही भी आठवण आवर्जून सांगतात. त्यांच्यातील व उद्धव ठाकरेंच्यातील वैर कधी कमी झाले नाही उलट ते  बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर जास्तच चिघळले. पण कितीही झालं तरी बाळासाहेबांच्या दिलदारपणा तुलना महाराष्ट्राच्या राजकारणात तरी होऊ शकत नाही हेच खरं,.

  हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.