बाळासाहेब राणेंना परत घेत होते, मात्र उद्धव ठाकरेंनी मातोश्री सोडून जाण्याची धमकी दिली…

शिवसेनेत आजवर चार मोठी बंड झाली, पहिलं छगन भुजबळ यांनी केलं, दुसरं नारायण राणेंनी, तिसरं राज ठाकरेंनी आणि चौथं म्हणजे एकनाथ शिंदेंचं बंड.

एकनाथ शिंदेंनी बंड केलं, तेव्हा सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना भावनिक आवाहन केलं होतं, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही ‘शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, फक्त बंडखोर आमदारांनी २४ तासात परत यावं’ असं वक्तव्य केलं होतं.

पण तसं काही घडलं नाही आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.   

एक नाव मात्र असं होतं, ज्यांना शिवसेना सोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न खुद्द बाळासाहेबांनी केला होता, ते नाव होतं नारायण राणे.

राणे म्हणजे शिवसेनेतले फायरब्रॅन्ड नेते, साधा शिवसैनिक ते राज्याचा मुख्यमंत्री असा प्रवास राणेंनी केला. मात्र जसजसं उद्धव ठाकरेंचं शिवसेनेतलं वर्चस्व वाढू लागलं, तसा राणेंचा असंतोष उफाळू लागला. उद्धव यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यावर या असंतोषानं टोक गाठलं होतं.

त्यात नारायण राणेंनी शिवसेना सोडल्याचं आणखी एक निम्मित ठरलं ते म्हणजे उद्धव ठाकरेंचा सव्वालाखाचा मासा… हा किस्सा तुम्ही बोल भिडूवर वाचू शकताय…

सव्वा लाखाचा मासा मेल्याच्या दु:खामुळं उद्धव ठाकरेंनी आमदाराला भेटायचं टाळलं होतं…

तर हा, जुलै २००५ मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडली. कोकण, मुंबई अशा महत्त्वाच्या भागांवर वर्चस्व असणारा नेता शिवसेना सोडून गेला. पुढं राणे काँग्रेसमध्ये गेले, त्यांनी राजीनामा दिल्यानं मालवणमध्ये पोटनिवडणूक लागली. सेनेनं ठरवलं होतं, की काहीही झालं, तरी राणेंना पाडायचं.

या निवडणुकीची सूत्रं स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या हातात घेतली, तब्येत बरी नसताना बाळासाहेबांनी मालवणमध्ये प्रचारसभा घेतली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीही आपली ताकद लावली. जोरदार धुरळा उडाला.

निकालाचा दिवस आला, शिवसेनेच्या परशुराम उपरकर यांना आपलं डिपॉझिटही वाचवता आलं नाही आणि राणे प्रचंड मताधिक्यानं विजयी झाले. राणेंच्या डावपेचांमुळं शिवसेनेवर बाळासाहेबांनी प्रचार करुनही पराभवाची नामुष्की ओढवली.

आजही कोकणात राणेंनी आपला गड राखलाय, त्यात राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं झालेला राडा आणि अटकसत्रही सर्वश्रुत आहेच.

पण हे सगळं झालंच नसतं, कारण दस्तूरखुद्द बाळासाहेब ठाकरेंनीच नारायण राणेंना शिवसेनेत थांबवण्याचा प्रयत्न केला होता.

झालं असं की, २ जुलैला नारायण राणेंनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आणि म्हणाले, ”पक्षातले वरिष्ठ माझ्यावर किंवा माझ्या कामावर खुश नसल्याचं जाणवल्यानं मी पदाचा राजीनामा देत आहे. मात्र मी शिवसैनिक आहे आणि अखेरपर्यंत शिवसैनिकच राहील.”

त्याच दिवशी संध्याकाळी बाळासाहेबांनी राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी करत असल्याचं जाहीर केलं. ”त्यानं शिवसेनेला दगा दिला, त्याला स्वाभिमान असेल, तर त्यानं आमदारकीचा राजीनामा द्यावा. असलं गँगस्टरीझम मी माझ्या शिवसेनेत खपवून घेणार नाही.”

मात्र त्याआधी घडलेल्या काही घटना महत्त्वाच्या होत्या…

राणेंनी आपल्या समर्थकांना सांगितलेलं की, “आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही, राजकारणातून संन्यास घेणार आहोत.”

यानंतर राणे परदेश दौऱ्यावर गेले आणि इकडं माध्यमांमध्ये राणे सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये जाणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. जाण्याआधी त्यांनी बाळासाहेबांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यातही आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याचं सांगितलं होतं. माध्यमांमधल्या बातम्या बघून राणेंनी बाळासाहेबांना भेटायचं ठरवलं.

राणे-बाळासाहेब भेट झाली, राणेंनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा आणि शिवसेनेचा राजीनामा बाळासाहेबांकडे दिला.

यावेळी बाळासाहेबांनी राणेंची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.खुद्द बाळासाहेब समजवतायत म्हणल्यावर राणेंचा निर्णय बदलण्याची पूर्ण शक्यता होती. मात्र या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंच्या कानावर पोहोचल्या.

तेव्हा उद्धव यांनी बाळासाहेबांना पेचात टाकलं, नारायण राणे सांगतात, ”बाळासाहेबांनी त्यावेळी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला.पण जेव्हा हे उद्धवना समजलं; तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीसह मातोश्री सोडून जाण्याची धमकी दिली. बाळासाहेबांनी एक मुलगा आधीच गमवला होता, दुसरा त्यांच्यापासून दुरावला होता. साहजिकच उद्धवच्या धमकीमुळं बाळासाहेबांना माझं मन वळवण्याचा प्रयत्न सोडावा लागला.”

बाळासाहेबांचा प्रयत्न यशस्वी झाला असता, तर आज कदाचित शिवसेनेचं चित्र वेगळं दिसलं असतं…

संदर्भ: ठाकरे विरुद्ध ठाकरे, धवल कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.